महाराष्ट्रातील आजच्या राजकीय बातम्या : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील नऊपैकी सहा खासदार फुटल्याची चर्चा सुरू असून त्यांनी संसदेत वेगळा गट स्थापन केल्याचे सांगितले जाते… ऑपरेशन टायगरमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद वाढणार असून भविष्यात ते मुख्यमंत्री होतील, असा मोठा दावा शिंदेसेनेच्या आमदाराने केला… एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे म्हणत ठाकरेंनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला भाजपाच्या नेत्याने दिला… उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वापर होत असून ‘ऑपरेशन टायगर’ हे भाजपाचेच षडयंत्र असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला… ‘ऑपरेशन टायगर’ नाही ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे लोकंच ठरवतील, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
उद्धव ठाकरेंचे सहा खासदार फुटले?
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पुन्हा एकदा फूट पडल्याची चर्चा रंगली. ठाकरे गटाचे नऊ पैकी सहा खासदार फुटले असून त्यांनी संसदेत आपला वेगळा गट स्थापन केल्याचे सांगितले जाते. या फुटीर खासदारांमध्ये धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर, वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा समावेश असल्याचे कळते. या सर्व सहा खासदारांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांची दिल्लीत भेट घेऊन आपण स्वतंत्र गट स्थापन करत असल्याचे पत्र त्यांना दिले. त्यानंतर लोकसभा अध्यक्षांनी या स्वतंत्र गटाला मंजुरी दिली. हा गट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, ठाकरे गटाने खासदार फुटीचा दावा फेटाळून लावला असून सर्व खासदारांना व्हिप जारी केला आहे. तसेच पक्षाच्या संसदीय मंडळाची गुरुवारी (१८ जून) बैठक बोलावण्यात आली आहे. त्यामुळे या बैठकीला कोणकोण हजर राहणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार?
ऑपरेशन टायगरमुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ताकद वाढणार असून भविष्यात ते मुख्यमंत्री होतील, असा सनसनाटी दावा शिंदेसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी माध्यमांशी बोलताना केला. “ठाकरे गटातील प्रत्येक खासदाराला १५ कोटी रुपये देऊन फोडण्याचा प्रयत्न केला जातोय,” या संजय राऊतांच्या आरोपांचेही त्यांनी खंडन केले. मला वाटते की १५ कोटींच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. भविष्यात संजय राऊत हेदेखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत येतील, असा टोलाही भोंडेकर यांनी लगावला. संजय राऊत आणि इतरांनीही त्यांच्या पक्षातील नेत्यांबरोबर समन्वय ठेवायला पाहिजे होता. ठाकरें यांच्याकडील दुसऱ्या फळीतील नेत्यांची टीम चांगली नाही. आगामी काळात त्यांचा पक्षातील आमदारही आमच्याकडे यातील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगले राज्य चालवत असले तरीही भविष्यात शिंदेच मुख्यमंत्री होतील. फडणवीस यांच्यात देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असल्यामुळे ते केंद्रात जातील आणि शिंदेंना मुख्यमंत्री करतील, असेही नरेंद्र भोंडकर यांनी म्हटले आहे.
ठाकरेंनी आत्मचिंतन करावे – भाजपाचा सल्ला
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरशी आमचा कोणताही संबंध नसल्याचे म्हणत उद्धव ठाकरे यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्ला भाजपाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. “ठाकरेंचे खासदार कुठे जातात याच्याशी भाजपाचा काहीही संबंध नाही. त्यांचे खासदार किंवा आमदार त्यांना का सोडत आहेत हे ठाकरेंनाच कळायला हवे. त्यांच्या पक्षातील नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे जात असतील तर ती त्यांच्याशी संबंधित बाब आहे. आमच्या मुख्यमंत्र्यांचा किंवा आमच्या कोणत्याही नेत्याचा याच्याशी संबंध नाही. यात भाजपाला का ओढायचे,” असेही बावनकुळे म्हणाले. ठाकरे गटातील प्रत्येक खासदाराला १५ कोटी रुपये देऊन फोडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला. त्यावर बोलताना केवळ पैशांसाठी खासदार किंवा आमदार आपली भूमिका बदलतात, असा आरोप करणे योग्य नाही. एखादा आमदार किंवा खासदार पक्ष का सोडतो, याची चौकशी व्हायला हवी. याचा भाजपाशी काहीही संबंध नाही, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
“ऑपरेशन टायगर’ हे भाजपाचेच षडयंत्र”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वापर होत असून ‘ऑपरेशन टायगर’ हे भाजपाचेच षडयंत्र असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माध्यमांशी बोलताना केला. ठाकरे गटातील सहापैकी एका खासदाराला मंत्रीपदाची आणि १०० कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. अंजली दमानिया म्हणाल्या की, आज जे घडले आहे, ते पाहून राग आला आहे. मी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची समर्थक नाही. तरीसुद्धा हे पाहून माझे मन अस्वस्थ झाले आहे. राज्यातील नागरिकांनी मतदान केले तरी कशाला असा प्रश्न पडतो आहे. धाराशिवचे खासदार ओम राजे निंबाळकर हे एका हॉटेलमध्ये बसून ही सगळे दिलेली मत विकतात हे अतिशय वाईट गोष्ट आहे. ज्या व्यक्तींना उद्धव ठाकरे यांनी खासदार केले, ते जर लोकशाही विकत असतील तर हे खूप चुकीचे आहे. एकनाथ शिंदे यांचा वापर होत असून हे त्यांना कळत नाही. भाजपाने रचलेले हे एक षडयंत्र आहे. लोकसभेत बिलं मंजूर करण्यासाठी त्यांचा हा खटाटोप आहे, अशी टीकाही दमानिया यांनी केली.
पक्षफुटीवरून आमदार रोहित पवारांचा संताप
उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील नऊ पैकी सहा खासदार फुटल्यानंतर शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला. लग्न एकासोबत करायचं आणि भलत्याचाच हात धरून पळून जायचं… हा अत्यंत किळसवाणा राजकीय व्यभिचार असून संविधान व लोकशाही मोडून हुकूमशाहीकडे वाटचाल सुरु असल्याचं हे लक्षण आहे. याला ‘ऑपरेशन टायगर’ नाही ‘ऑपरेशन बाजार’ म्हणावं लागेल आणि हा ‘ऑपरेशन बाजार’ लायकीचा, माणसांचा की विचारांचा हे लोकंच ठरवतील. एकेका खासदाराचा रेट ८५ कोटी..? एवढे पैसे द्यायला संबंधित पक्षाकडं पैसे येतात तरी कुठून? शिवसेना, राष्ट्रवादी, आप, तृणमूल काँग्रेस आणि आता पुन्हा शिवसेना.. देशात हे असंच सुरू राहिलं तर एक दिवस लोकंच रस्त्यावर उतरून पळून जाणाऱ्यांना आणि पळवून नेणाऱ्यांना चोपल्याशिवाय राहणार नाहीत, असे रोहित यांनी समाजमाध्यमांवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले.
