सतीश कामत

शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या कोकण विभागातील रायगड जिल्ह्यातून निवडून आलेले तिन्ही आमदार एकनाथ शिंदे यांच्या बंडामध्ये सामील झाले असले तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सेनेच्या ६ आमदारांपैकी फक्त योगेश कदम वगळता उरलेले सर्वजण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर राहिल्यामुळे येथील तटबंदीला फारसा धक्का बसलेला नाही.

pm modi in mamata banerjee turf
पंतप्रधान मोदी तीन वर्षांनंतर ममता बॅनर्जींच्या राज्यात, संदेशखाली प्रकरणावर बोलणार?
jalgaon politics marathi news, bjp mla mangesh chavan marathi news
जळगावमध्ये भाजप-शिंदे गटात कुरघोड्या सुरूच
मोहिते-पाटीलविरोधक उत्तम जानकर सोलापूर लोकसभेसाठी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये
arun dudwadkar
कोल्हापूरातील दोन्ही मतदारसंघ ठाकरे सेनेकडे; अरुण दुधवडकर यांच्या दाव्याने संभ्रम

रायगड जिल्ह्यातील महेंद्र दळवी (अलिबाग), भरत गोगावले (महाड) आणि महेंद्र थोरवे (कर्जत) या तिन्ही आमदारांनी बंडखोरी केली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेना पक्ष संघटनेच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते खासदार सुनील तटकरे आणि त्यांच्या मंत्री असलेल्या कन्या आदिती यांच्या बेलगाम कारभाराला पायबंद घातला जात नसल्याने  पक्षाचे अन्य पदाधिकारीही पक्षनेतृत्वावर नाराज आहेत. सत्तेत असूनही निधी मिळत नाही, विकास कामे होत नाहीत अशी त्यांची सतत ओरड आहे. तीनही आमदारांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमुखाने रायगडच्या पालकमंत्री बदला, अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली होती. मात्र या मागणीकडे फारसे लक्ष दिले नव्हते. माणगाव येथील आदित्य ठाकरे यांच्याही सभेत तिन्ही आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि तटकरे यांच्या विरोधात सूर लावला होता. पण आमदारांच्या नाराजीकडे दुर्लक्ष करत आदित्य यांनी तटकरे यांच्या घरी जाऊन पाहुणचार घेतला होता. या नाराजीतूनच पक्षनेतृत्वाविरोधात आमदारांनी बंडाचे निशाण फडकवल्याचे दिसून येत आहे. 

रत्नागिरी जिल्हा सेनेचा बालेकिल्ला मानला जातो. येथील विधानसभेच्या पाच जागांपैकी चिपळूण वगळता (आमदार शेखर निकम) उरलेल्या चारही ठिकाणी शिवसेनेचे आमदार आहेत. त्यापैकी पक्षाचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम अपेक्षेप्रमाणे शिंदे यांच्या तंबूत दाखल झाले आहेत. पण राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, माजी मंत्री भास्कर जाधव आणि ज्येष्ठ आमदार राजन साळवी हे तिघेही ज्येष्ठ नेते ठाकरेंबरोबर आहेत. विधिमंडळ राजकारणात तिघेही जण मुरलेले आहेत. तिघांमध्ये भास्कर जाधव सर्वांत ज्येष्ठ नेते आहेत.शिवसेना- राष्ट्रवादी काँग्रेस आणि गेल्या विधानसभा निवडणुकीपासून पुन्हा शिवसेना, असा त्यांचा राजकीय प्रवास झाला आहे. त्यांचा प्रभाव गुहागर-चिपळूण तालुक्यात आहे. सामंतांची, कारकीर्दीची पहिली १० वर्षे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता शिवसेना, अशी राजकीय वाटचाल आहे. या दोघांचे एकमेकांशी फारसे सख्य नाही.  साळवी पक्षाचे सर्वांत जुने, निष्ठावंत कार्यकर्ते आहेत.  तरी मंत्रिपद आणि संघटनात्मक पकड, या दोन्हीबाबत सामंत तिघांमध्ये वरचढ राहिले आहेत. ते ठाकरेंबरोबर राहिले तर रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेची ताकद बऱ्याच प्रमाणात शाबूत राहील, अशी परिस्थिती आहे. जिल्ह्यातील नगर परिषदा, जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना हे फार महत्त्वाचे ठरणार आहे.

कोकणात गद्दारी आवडत नाही – आमदार वैभव नाईक

सिंधुदुर्ग जिल्ह्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा दबदबा आजही कायम आहे. जोडीला त्यांचे चिरंजीव आमदार नितेश व माजी खासदार नीलेश शिवसेनेवर टीकास्त्र सोडण्यात कसूर ठेवत नाहीत. जिल्ह्यातील विधानसभेच्या तीन जागांपैकी उरलेल्या दोन ठिकाणी दीपक केसरकर (सावंतवाडी) आणि वैभव नाईक (मालवण) शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत. यापैकी केसरकर यांची भूमिका भाजपाशी युती करावी, अशी राहिली आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल भरंवसा देता येत नाही. नाईक मात्र सतत राणेंशी संघर्ष करत आले आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत दोनवेळा आमदारकी दिलेल्या पक्षाशी आपण गद्दारी करणार नाही, असे त्यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना स्पष्ट केले. तसे केलेल्या राणेंना येथील जनतेने पराभूत केले, असेही निदर्शनास आणून दिले. राणेंशी राजकीय सामना सुरूच राहणार का, असे विचारले असता, ते मुख्यमंत्री, महसूलमंत्री होते तेव्हापासून आम्ही संघर्ष करत आलो आहोत. त्यामुळे काही फरक पडत नाही, अशी प्रतिक्रिया आमदार नाईक यांनी दिली.