आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच राहणार असल्याचा दावा आमदार बच्चू कडू यांनी केला… शिंदे-फडणवीसांनी तातडीने चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला… शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची राळ उठवली… शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या आजच्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला… कोल्हापूरचा विकास रखडल्याने शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी ठाकरे गटाने केली… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
“शिवसेनेचा निकाल शिंदेंच्याच बाजूने लागणार”
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याचा निकाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच बाजूने लागणार, असा विश्वास शिंदेसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला. ‘धनुष्यबाण’ पेलण्याची ताकद फक्त एकनाथ शिंदे साहेबांकडेच आहे. त्यांच्याशिवाय धनुष्यबाण कोणालाही पेलवणार नाही हे न्यायालयालाही माहिती आहे. शेवटी न्यायालयही आमच्याच बाजूने निकाल देईल, असेही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाची संपूर्ण राज्यात जोरदार चर्चा रंगली आहे. २०२२ मध्ये एकसंध शिवसेनेत फूट पडल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह शिंदेसेनेला दिले होते. त्याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सध्या या प्रकरणाची अंतिम सुनावणी होत असून ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल हे युक्तिवाद करत आहेत. त्यामुळे या सुनावणीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागून आहे.
मनोज जरांगे यांचा शिंदे-फडणवीसांना इशारा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने आपली चूक सुधारावी, अन्यथा कधी न बघितलेले दिवस बघावे लागतील, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणे आणि नंतर ते रद्द करणे हे काय चालले आहे. जातपडताळणी समितीने आदेश दिला व्हॅलिडिटी द्यावी. याला काय म्हणतायचे? तुम्ही मराठ्याचे वाटोळ करताय का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेले जरांगे पाटील यांनी ठिकठिकाणी इशारा बैठकाही घेण्यास सुरुवात केली आहे. राजकीय पक्षांतील सर्वच आमदार आणि खासदारांनी मराठ्यांच्या लेकरांच्या पाठीशी उभे रहावे. तुमच्या नाकावर टिच्चून चंद्रशेखर बावनकुळे यांनी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश काढला आहे. आता जागे न झाल्यास तुम्हाला समाज कधीच माफ करणार नाही, असा इशाराही जरांगे पाटील यांनी दिला आहे.
शिवसेना ठाकरे-शिंदेंच्या खासदारांमध्ये जुंपली
शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्के आणि शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोपांची राळ उठवण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांच्याविरोधात तक्रारी देण्यात म्हस्केच पुढे होते आणि त्यांची अनेक पत्र आपल्याकडे असल्याचा दावा राऊत यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर म्हस्के यांनी तीव्र संताप व्यक्त केला. शिंदे यांच्याविरोधात लिहिलेले एक तरी पत्र दाखवा असे खुले आव्हानच त्यांनी राऊत यांना दिले. तसेच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून राऊत यांनीच बैठका घेतल्या होत्या, असा प्रतिदावाही म्हस्के यांनी केला आहे. वरिष्ठ म्हणून तुमचा आदर ठेवतो. झाकली मूठ आहे. मला कितीवेळा कॉल यायचे, तुम्ही काय काय बोलत होता हे जाहीर करायला लावू नका असा इशारा नरेश म्हस्के यांनी संजय राऊतांना दिला. शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटाच्या दोन खासदारांमध्ये रंगलेल्या या आरोप प्रत्यारोपाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
सिब्बल यांचा न्यायालयात जोरदार युक्तिवाद
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत शिवसेना ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या त्रुटींवर बोट ठेवताना पुन्हा एकदा जोरदार युक्तिवाद केला. देशातील सर्व राजकीय पक्षांची नोंदणी, त्यांची रचना आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीवर देखरेख ठेवण्याची जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगाची आहे. असे असतानाही पक्षाची घटना आयोगाच्या अधिकृत दफ्तरी उपलब्ध नाही, असे तकलादू कारण आयोग कसे काय देऊ शकते? संबंधित पक्षाची रचना ही हुकूमशाही पद्धतीची होती, या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी निवडणूक आयोगाकडे कोणताही ठोस आधार किंवा पुरावा नव्हता, असे सिब्बल यांनी न्यायालयात सांगितले. एकनाथ शिंदे यांनी तर थेट उद्धव ठाकरे यांनाच पक्षातून बाहेर काढले, मग अशा वेळी आम्ही त्यांना शिस्तभंग समितीसमोर नेऊन पक्षातून कसे काढणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. निवडणूक आयोगाला एका विशिष्ट निष्कर्षावरच पोहोचायचे होते. म्हणूनच त्यांनी २०१८ च्या शिवसेनेच्या सुधारित घटनेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले, अशी टीकाही त्यांनी केली. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी होणार आहे.
शिंदेसेनेच्या आमदाराच्या राजीनाम्याची मागणी
कोल्हापूरचा विकास रखडल्याने शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाने केली. गेल्या १२ वर्षांच्या कालावधीत क्षीरसागर यांनी कोल्हापूर शहराच्या विकासाचा एकही प्रश्न धडपणे सोडवलेला नाही. परिणामी नागरी व विकासाचे प्रश्न प्रलंबित राहिल्याने शहराची दुरावस्था होऊ लागली आहे. त्यामुळे नागरिकांचा भ्रमनिरास झाला असल्याने त्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आमदारकीचा राजीनामा द्यावा, असे ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार, सह संपर्कप्रमुख विजय देवणे यांनी म्हटले आहे. कोल्हापूर शहरासाठी १०० कोटीच्या रस्ते प्रकल्पातील किती रक्कम खर्च झाली, त्याची काय अवस्था आहे, याचे उत्तर राजेश क्षीरसागर यांनीच द्यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या या आरोपांना आता शिंदेसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर नेमके काय उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
