अलिबाग– रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांसाठी निवडणुक प्रक्रीय पार पडली. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या १६ जागा निवडून आल्या. २०१७ च्या तुलनेत यंदा चार जागा अधिक निवडून आणण्यात पक्षाला यश मिळाले. शिवसेना ठाकरे गटाशी आघाडी ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयात निर्णायक ठरली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या. मात्र चर्चा होत आहे ती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामगिरीची. या राष्ट्रवादी काँग्रेसची कामगिरी ही लक्षवेधी ठरली आहे. कारण महायुती मधील शिवसेना आणि भाजपच्या तुलनेत पक्षाची ताकद मर्यादीत आहे. तरी देखील पक्षाने चांगले यश संपादन केले आहे. जिल्ह्यात तीन आमदार असलेल्या भाजपला जमले नाही ते राष्ट्रवादी काँग्रेसने करून दाखवले आहे. भाजपच्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसची एक अधिक जागा निवडून आली आहे.
प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांची धुर्त चाल या कामगिरीस कारणीभूत ठरली आहे. कर्जत विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगले संघटन आहे. पण शिवसेना शिंदे गटाच्या मतदार संघातील प्रभावामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळत नव्हते. विधानसभा निवडणुकीत याचा प्रत्यय आला होता. तटकरे यांचे अत्यंत विश्वासू आणि जवळचे सहकारी सुधाकर घारे हे बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरले होते. मात्र अटीतटीच्या लढतीत. शिवसेनेच्या महेंद्र थोरवे यांचा विजय झाला होता. शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमधील मतविभाजन शिवसेना शिंदे गटाच्या पथ्यावर पडले होते. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही बाब अजूकपणे हेरली. त्यामुळे कर्जत खालापूर मतदारसंघात पक्षाने शिवसेना ठाकरे गटाची जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारले.
आधी नगर पालिका निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही पक्ष एकत्र आले. या आघाडीला परिवर्तन आघाडी असे नाव देण्यात आले. दोन्ही पक्षांना एकत्र आण्याची खेळी यशस्वी ठरली. त्यामुळे कर्जत नगरपालिकेवर सत्ता मिळाली. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुक एकत्र लढविण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला. शिवसेना शिंदे गटाची ताकद कमी करण्यासाठी कर्जत मध्ये भाजप शिंदे सेना युती होऊ नये यासाठीही पडद्यामागून प्रयत्न केले गेले. त्याचा अपेक्षित परिणाम निवडणुक निकालावर दिसून आला. कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातील दहा जिल्हा परिषदेच्या जागांपैकी तब्बल आठ जागांवर परिवर्तन आघाडीचे उमेदवार विजयी झाले. याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच तर शिवसेना ठाकरे गटाचे ३ उमेदवार विजयी झाले.
कर्जत मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ तर खालापूर मधून १ असे पाच उमेदवार निवडून आले. त्यामुळे उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेशी जुळवून घेण्याची तटकरे यांची खेळी कमालिची यशस्वी ठरली आहे. शिवसेना शिंदे गटाला जिल्हा परिषदेवर स्वबळावर सत्ता मिळवण्यापासून रोखण्यात या खेळीचे महत्वाचे योगदान ठरले आहे. मात्र आता जिल्हा परिषदेवर भाजप सोबत सत्ता स्थापन करतांना तटकरे शिवसेना ठाकरे गटाला सोबत घेणार का हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेवर सत्ता स्थापन करताना ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेण्यास भाजप अनुमती देणार का हे पहाणेही महत्वाचे असणार आहे.
