आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : देवेंद्र फडणवीस त्यांचा राजकीय वारसदार म्हणून एकनाथ शिंदे ऐवजी सुनेत्रा पवारांची निवड करतात की काय, असे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवत असल्याचे विधान खासदार संजय राऊत यांनी केले… शिवसेना ठाकरे गटाच्या प्रभावशाली नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी नारीशक्ती वंदन मोहिमेला समर्थन दिल्यामुळे त्या भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली… कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या या भावनेला पूर्णविराम देत प्रत्येकाला सन्मान दिला जाईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपली पुढील रणनीती स्पष्ट केली… अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजपाच्या नेत्या नवनीत राणा यांनी समाजमाध्यमांवर केलेल्या एका पोस्टमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले… कर्जत-जामखेडच्या लोकांनी रोहित पवार यांची शिकार करू नये, याची काळजी त्यांनी घ्यावी आणि बाकीच्यांना सल्ले देण्याच्या भानगडीत त्याने पडू नये, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
फडणवीस सुनेत्रा पवारांना मुख्यमंत्री करणार?
राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सध्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. यादरम्यान सुनेत्रा पवार मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी इच्छा मंत्री अदिती तटकरे यांनी एका कार्यक्रमात बोलून दाखवली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केले. अजित दादांना मुख्यमंत्री होता आले नाही, जर सुनेत्रा पवारांना भाजपा मुख्यमंत्री करणार असेल तर तो त्यांचा मोठेपणा असेल. देवेंद्र फडणवीस त्यांचा राजकीय वारसदार म्हणून एकनाथ शिंदे ऐवजी सुनेत्रा पवारांची निवड करतात की काय, असे त्यांच्या बोलण्यातून आपल्याला जाणवत असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानाची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
ठाकरे गटाच्या प्रभावशाली नेत्या भाजपाच्या वाटेवर?
शिवसेना ठाकरे गटाच्या प्रभावशाली नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी ‘मिस्ड कॉल’ देत भाजपाच्या नारी शक्ती या उपक्रमाला पाठिंबा दिला. त्यामुळे त्या भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शरद पवारांना संधी देण्यात आली. ठाकरे गटाचे संख्याबळ जास्त असल्याने ही जागा पक्षाला मिळावी आणि तिथे प्रियांका यांना उमेदवारी मिळावी, अशी भूमिका आदित्य ठाकरेंनी मांडली होती. यादरम्यान चतुर्वेदी यांनी आपल्या मोबाईलवरून भाजपाला मिस्ड कॉल देताच भाजपाच्या नेत्या आमदार चित्रा वाघ यांनी तातडीने त्यांचे निवासस्थान गाठून त्यांना पुष्पगुच्छ दिला. राज्यातील भाजपाच्या सर्वोच्च नेत्यांकडून ‘ग्रीन सिग्नल’ न मिळाल्याने चतुर्वेदी यांच्या हाती अद्याप कमळ आलेले नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
आणखी वाचा : मुख्यमंत्रिपदावरून भाजपामध्येच अस्वस्थता? नितीश कुमार यांच्यानंतर बिहारची सूत्रे कोणाकडे?
प्रत्येकाला सन्मान देणार : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायच्या या भावनेला पूर्णविराम देत प्रत्येकाला सन्मान दिला जाईल, अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आपल्या पक्षाची पुढील रणनीती स्पष्ट केली. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार म्हणून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ नारळ फोडून करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पक्ष संघटनेत बदलाचे संकेत दिले. बारामतीची पोटनिवडणूक ही ऐतिहासिक जबाबदारी माझ्यासह बारामतीकरांवरदेखील आहे. अजित दादांच्या निधनानंतर महिला म्हणून पक्षाची जबाबदारी मी पार पाडू शकेल का, असा संशय अनेकांना होता. मात्र, दादांच्या आशीर्वाद रुपाने ही जनता माझ्यामागे उभी राहिली आणि मला लढण्याचे बळ दिले, असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाल्या. यावेळी वातावरण भावुक झाल्याचे पाहायला मिळाले.
माजी खासदार नवनीत राणा यांची सूचक पोस्ट
अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांना राज्यसभेची संधी न मिळाल्याने त्या भाजपाच्या पक्षश्रेष्ठींवर नाराज असल्याची चर्चा आहे. त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली नसली, तरी त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये समाज माध्यमांवर संवाद साधताना सूचक शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ताज्या पोस्टमधूनही त्यांनी भावनिक मुद्दे मांडले आहेत. या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. समाज माध्यमांवरील पोस्टमध्ये नवनीत राणा यांनी हिंदी भाषेतून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘कहते है ना, आपको हम जैसे हजारों मिलेंगे, पर उन हजारों मे हम नही मिलेंगे. ये कुछ एैसे लोगो के लिए है… समझदारों को इशारा काफी है.., असे त्यांनी म्हटले आहे. त्यांचा रोख कुणाकडे आहे, यावर आता राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा : अजित पवारांचा विक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोडणार?
गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांना सल्ला
आमदार रोहित पवार यांनी राजकारणात कसे टिकावे याची काळजी घेतली तर बरे होईल. कारण त्यांचा पक्ष आता खूपच छोटा झाला आहे. खूप मोठा घास घेण्यात आणि उंटाचा मुका घेण्यात काही अर्थ नाही, असा सल्ला भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला. कर्जत-जामखेडच्या लोकांनी रोहित पवारांची शिकार करू नये, याची काळजी त्याने घ्यावी, बाकीच्यांना सल्ले देण्याच्या भानगडीत त्याने पडू नये, असा सणसणीत टोलाही त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना लगावला. भाजपाकडून लवकरच महायुतीतील एका मित्रपक्षाची शिकार केली जाणार असल्याचे सूचक विधान रोहित पवार यांनी केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना गोपीचंद पडळकर यांनी हा टोला लगावला आहे.
