पालघर : लोकसभा निवडणुकीत मतांच्या मोठया फरकाने पराभवाचा सामना कराव्या लागलेल्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने पालघर जिल्ह्यातील ग्रामीण पट्टयात नव्याने संघटनात्मक बांधणीला सुरुवात केली आहे. भाजप पाठोपाठ या संपूर्ण पट्टयात हितेंद्र ठाकूर यांचा बहुजन विकास आघाडी हा पक्ष गेल्या काही काळापासून बऱ्यापैकी ताकद राखून आहे. लोकसभा निवडणुकीत मात्र उद्धव सेनेने ठाकूर यांच्या पक्षावर आघाडी घेत पालघर, डहाणू, बोईसर, विक्रमगड या पट्टयात भाजपला बऱ्यापैकी लढत दिली. हे लक्षात घेऊन आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर या पक्षाने पालघर जिल्ह्यातील पालघर, डहाणू तसेच बोईसर, विक्रमगड या दोन संघटनात्मक भागांच्या जिल्हाप्रमुखपदी नव्याने नेमणुका केल्या असून सह संपर्कप्रमुख पदी देखील नव्या नेमणुका केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीपासून पक्षांमध्ये असणाऱ्या अंतर्गत वाद विवादांच्या अनुषंगाने हे बदल झाले असून विधानसभा निवडणुकीला अवघ्या महिना दीड महिन्याचा अवधी असताना विस्कटलेल्या पक्ष संघटनेची घडी बसवण्याचे आव्हान नवीन पदाधिकाऱ्यांसमोर आहे. शिवसेनेत फूट झाल्यानंतर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शिवसेनेच्या तत्कालीन प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश घेतला. परिणामी कार्यकर्त्यांची मोठी फळी असताना देखील शिवसेनेच्या स्थानीय पातळीवर नेतृत्व करण्यासाठी अडचणी समोर आल्या. दीड वर्षांपूर्वी पालघर विभागाच्या जिल्हाप्रमुख पदी विकास मोरे तर बोईसर विभागाच्या जिल्हाप्रमुख पदी राजेंद्र पाटील यांची नेमणूक करण्यात आली होती. दरम्यानच्या कालावधीत शिवसेनेकडे मध्यवर्ती कार्यालय नसल्याने संघटनात्मक बैठका घेण्यासाठी कार्यकर्त्यांच्या घराचा अथवा पंचायत समिती कार्यालयातील सभागृहांचा आसरा घेण्यात येत असे. मात्र पक्ष संघटना मजबुतीकरण करण्यास तसेच नवीन कनिष्ठ पदाधिकारी यांच्या नेमणूक करण्यास वरिष्ठ पातळीवरून अपेक्षित पाठबळ तसेच सहकार्य मिळत नसल्याच्या कुरबूरी होत्या. दरम्यानच्या काळात स्थानीय नेतृत्वाने मतदान केंद्रनिहाय पक्षीय प्रतिनिधीच्या नेमणुका केल्या. त्याचा उपयोग लोकसभा निवडणुकीत झाला. लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीतर्फे शिवसेना ठाकरे गटाने तातडीने उमेदवाराची घोषणा केली. मात्र जिल्हाप्रमुखांना प्रचाराच्या आखणीत तसेच महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली नसल्याचे आरोप होऊ लागले. निवडणुकीच्या काळात उमेदवारांनी पक्षाला दिलेल्या वचनबद्धतेचे पालन केले नाही असे आरोप- प्रत्यारोप होत पक्षांमध्ये दुफळी माजल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला सुमारे चार लाख १८ हजार मत मिळवून देखील त्यांचा पराभव झाला. हेही वाचा.लाडक्या बहिणींकडून पैसे परत घेणार नाही; मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा निर्वाळा नव्याने नियुक्त्या या पराभवाचे खापर पक्षीय पदाधिकाऱ्यांवर फोडताना त्यांच्या कार्यपद्धतीच्या तसेच पक्ष संघटना मजबुती करण्याबाबत ठपका ठेवण्यात आला. त्यांच्यामार्फत पक्षाच्या कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याच्या तक्रारी होत्या. तसेच नागरिकांच्या समस्या सोडविणे, विरोधात असताना देखील आंदोलनात कमी पडत असल्याचे लक्षात येत होते. लोकसभेसाठी निवडणुकीची उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी आपल्याला विश्वासात घेण्यात आले नाही अशा तक्रारीही पक्षाचा एक मोठा गट करत होता. जून महिन्याच्या आरंभी निवडणूक निकाल लागल्यानंतर पक्षीय संघटनेत बदल करण्याचा सूतोवाच करण्यात आले होते. शिवसेनेच्या झालेल्या नेमणुका या विधानसभा निवडणुकीच्या संभाव्य उमेदवाराच्या अनुषंगाने, अनुकूलतेने झाल्याची चर्चा पक्षात असून उमेदवार निश्चित करण्यास अडथळा ठरू नये म्हणून आपल्याला वगळल्याचे जुन्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. पक्षांमधील वरिष्ठ नेत्यांमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येत असून कार्यकर्ते जोडण्याची कार्यपद्धती नवीन पदाधिकाऱ्यांना अवलंब करावी लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट पालघरसह बोईसर वसई या विधानसभा क्षेत्रांमध्ये उमेदवार उतरविण्याच्या विचारात असून या तीनही मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या वेळी महायुती उमेदवाराची पिछाडी भरून काढण्याचे आव्हान पक्षाला पेलावे लागणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या संपर्कप्रमुख व त्यांच्या सहकाऱ्यांनी ठिकठिकाणी सभांच्या आयोजनाचा धडाका लावला असून पक्षांमधील स्थानीय नेते मंडळी व कार्यकर्त्यांमधील मरगळ व नाराजी झटकून पुन्हा नवीन जोमाने निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी सुरू झाल्याचे चित्र आहे.