पुणे : लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका झाल्यानंतर पुण्यात शिवसेना (ठाकरे) पक्षाने पक्षांतर्गत बदल करण्याचा निर्णय घेतला असून, नवीन शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी नेमण्यात आले आहेत. मात्र, मागील आठ वर्षांत पक्षश्रेष्ठी आणि ज्येष्ठ नेत्यांनी पुण्याकडे दुर्लक्ष केल्याने पदाधिकारी आणि कार्यकर्ते पक्षापासून दुरावले आहेत. अनेकांनी वेगवेगळ्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतल्याने पुण्यात कार्यकर्त्यांची वानवा आहे. त्यामुळे नवीन शहराध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांपुढे  पक्षाची नव्याने मोट बांधण्याचे आव्हान उभे राहिले आहे.

राज्यातील प्रमुख निवडणुका झाल्यानंतर आता शिवसेना (ठाकरे) पक्षाने खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील शहरप्रमुख आणि अन्य महत्त्वाच्या पदांची जबाबदारी ही आता नवीन पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आली आहे. त्यानुसार पुणे शहरप्रमुखपदी वसंत मोरे आणि पिंपरी-चिंचवड शहरप्रमुखपदी चेतन पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहरासाठी शहर समन्वयक म्हणून नगरसेवक नितीन गावडे यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. संजय मोरे आणि गजानन थरकुडे हे दोघे शहराध्यक्ष होते. त्यांच्या जबाबदारीमध्ये वाढ करून त्यांना सहसंपर्कप्रमुखपद देण्यात आले आहे. दोन्ही माजी शहराध्यक्षांकडे प्रत्येकी दोन विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहेत. मोरे यांच्याकडे पुरंदर आणि हडपसर विधानसभा मतदारसंघ, तर गजानन थरकुडे यांच्याकडे भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहेत. माजी आमदार गौतम चाबुकस्वार यांच्याकडे पिंपरी-चिंचवड शहराचे सहसंपर्कप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. २०२९ पर्यंत कोणतीही निवडणूक नसली, तरी नव्याने पक्षबांधणीसाठी बदल करण्यात आले आहेत. मात्र, या पदाधिकाऱ्यांपुढे कार्यकत्यांचा शोध घेणे, हे प्रमुख आव्हान उभे राहिले आहे.

पक्षाच्या नेत्यांकडून आजवर झालेल्या दुर्लक्षामुळे या पक्षातून अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अन्य पक्षाची वाट धरली. त्यामुळे आता शिलेदार बदलले असले, तरी नव्या कार्यकर्त्यांची फळी उभी कशी करायची, असा प्रश्न उभा राहिला आहे. वसंत मोरे हे मूळचे शिवसेनेचे आहेत. मात्र, मध्यंतरीच्या काळात ते मनसेमध्ये होते. आता पुन्हा ते शिवसेनेत आले आहेत. मात्र, महापालिकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

पक्ष दुभंगला, पदाधिकारी विखुरले

पुण्यात तत्कालीन शिवसेनेची ताकद होती. मात्र, पक्ष दुभंगल्यानंतर पदाधिकारीही विखुरले गेले आहेत. १९९५ मध्ये एकाच वेळी तीन आमदार आणि २००७ मध्ये पुणे महापालिकेत २० नगरसेवक निवडून आले हाेते. त्यानंतर या पक्षाची ताकद क्षीण होत गेली आहे. पुणे महापालिकेच्या २०१७ मधील निवडणुकीत तत्कालीन शिवसेनेचे दहा नगरसेवक निवडून आले होते. त्यांपैकी अविनाश साळवे हे काँग्रेसमध्ये गेले. विशाल धनवडे, बाळा ओसवाल, प्राची अल्हाट, पल्लवी जावळे, संगीता ठोसर, पृथ्वीराज सुतार, संजय भोसले हे माजी नगरसेवक भाजपमध्ये गेले. श्वेता चव्हाण या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात, तर प्रमोद ऊर्फ नाना भानगिरे हे शिवसेना (शिंदे) पक्षाकडे गेले. आता झालेल्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नितीन गावडे हे एकमेव नगरसेवक निवडून आले आहेत. नगरसेवकांबरोबर त्यांचे कार्यकर्तेही आपापल्या पक्षात गेल्याने सध्या पक्षाची मोट पुन्हा बांधण्यासाठी कार्यकर्ते एकत्र करणे, हे आव्हान असणार आहे.

खेड-आळंदीला झुकते माप

पुणे जिल्ह्यामध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाचे बाबाजी काळे हे एकमेव आमदार आहेत. खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले आहेत. या पक्षाने पुणे जिल्ह्यातही आता काही बदल केले आहेत. त्यानुसार याच मतदार संघातील रामदास धनवटे यांना जिल्हाप्रमुख म्हणून नेमण्यात आले आहे. सहसंपर्कप्रमुख पदावर नेमलेल्या सुरेश भोर यांच्याकडे खेड, आळंदी आणि शिरूर विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी असणार आहे. दिलीप बाम्हणे यांच्याकडे जुन्नर आणि आंबेगाव विधानसभा मतदारसंघ, तर केसरीनाथ पाटील यांच्याकडे चिंचवड आणि भोसरी विधानसभासंघ देण्यात आले आहेत. जुन्नर विधानसभा प्रमुखपदी आनंद रासकर आणि जुन्नर तालुकाप्रमुखपदी भास्कर घाडगे यांची निवड करण्यात आली आहे.