शिवसेना ठाकरे गटाने आपल्या सामना या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केले. त्यापाठोपाठ ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही केंद्रातील भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीवर तोंडसुख घेतले. त्यांच्या या टीकेला भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी चोख प्रत्युत्तर दिले. दोन्ही पक्षांनी केलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे महाराष्ट्राचे राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींवर नेमकी काय टीका केली? त्याला भाजपाच्या नेत्यांनी कसे प्रत्युत्तर दिले? त्याविषयीचा हा आढावा…
‘सामना’च्या अग्रलेखात नेमके काय?
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धाची झळ संपूर्ण जगाला बसली आहे. आखाती देशांमधील संघर्षामुळे मालवाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याने भारतातही गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू लागला आहे. एकीकडे केंद्र सरकारने गॅस सिलिंडरचे पुरेसे साठे उपलब्ध असल्याचे स्पष्टीकरण दिले असतानाच दुसरीकडे गॅस बुकिंगचा कालावधीही वाढवण्यात आला आहे. याच मुद्द्याला हाताशी धरून ठाकरे गटाने पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. आखाती युद्धाचा परिणाम भारतावर अजिबात होणार नसल्याचा दावा ‘मोदी’ सरकार वारंवार करीत होते; परंतु त्यांचा हा दावा फोल ठरला असल्याचा दावा ‘सामना’च्या अग्रलेखातून करण्यात आला. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहक बोटींना इराणने रोखून ठेवले आहे. चीन, रशिया वगळता इतर सर्व देशांच्या तेलवाहक बोटी तेथेच फसल्या आहेत. भारताचे विश्वगुरू आपल्या बोटी अद्यापि बाहेर काढू शकलेले नाहीत, असा टोलाही या अग्रलेखातून लगावण्यात आला.
गॅस सिलिंडरच्या टंचाईवरून भाजपाला चिमटे
गॅस सिलिंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईसारख्या शहरांतील ४० टक्के रेस्टॉरंट्स बंद पडली आहेत. त्याचा परिणाम लोकांच्या रोजगारावर होत आहे. सरकारने गॅसटंचाईवर तोडगा काढण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली. ही समिती नेमके काय करणार? गॅसटंचाईवर मार्ग शोधण्यासाठी या तीन सदस्यीय समितीला पुन्हा पंतप्रधान मोदी यांच्याच संशोधनाची मदत घ्यावी लागेल, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी नाल्यातून गॅसच्या निर्मितीबाबत विधान केले होते. त्यावरूनही ठाकरे गटाने भाजपाला चिमटा काढला आहे. सध्याच्या ऊर्जा व गॅस संकटांवर मार्ग काढण्यासाठी मोदी यांनी आधीच संशोधन केले आहे. नाल्यात पाइप टाकून गॅसनिर्मिती करता येईल आणि घरच्या चुली पेटवता येतील. या नव्या प्रकल्पाचा शोध मोदींनी भारतात लावला आहे आणि त्यामुळे जागतिक इंधन संकटावर मात करण्यासाठी पृथ्वीवर आता ‘नाले, गटारे व प्लास्टिक पाइप’ यांना महत्त्व प्राप्त होईल, असे ‘सामना’च्या अग्रलेखात म्हटले आहे.
संजय राऊत नेमके काय म्हणाले?
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नाल्यातून गॅस निर्मितीबाबतच्या विधानाचा दाखला दिला. भारतात सर्वत्र डबकी, नाले व नद्यांचेही नाले झालेच आहेत. त्यामुळे गॅस व इंधनाचा तुटवडा भासणार नाही. मुंबईत ‘गॅस’निर्मितीचा सर्वांत मोठा प्रकल्प मिठी नदीच्या तीरावर उभा करता येईल. या ‘गॅस’निर्मिती प्रकल्पाच्या उदघाटन सोहळ्यात मुंबईच्या महापौरांनी पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांना आमंत्रित करायला हरकत नाही. आखाती युद्धामुळे जगभरात इंधन व गॅस टंचाईच्या झळा बसल्या तरी मोदी यांच्या संशोधनामुळे भारतात नाल्यातून गॅस निर्मितीचे उद्दिष्ट गाठता येईल, असे राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले. फक्त जय श्रीराम सिलिंडर म्हणा, घरपोच सिलिंडर मिळणार आणि नमो नमो हा मंत्र जपल्यास पेट्रोल आणि डिझेलही तुमच्या दारात येणार, असा टोला राऊत यांनी हाणला. देशातील जनतेसमोर गंभीर संकट निर्माण झाले असतानाच पंतप्रधान मोदी त्याबाबत एकही चकार शब्द काढत नाहीत. ते केवळ निवडणुका जिंकण्यासाठी आणि त्यासाठी सरकारी तिजोरीचा अमाप खर्च करत आहेत. अशा प्रकारचे संवेदनशून्य पंतप्रधान लाभणे हे देशाचे दुर्दैव असल्याची टीकाही त्यांनी केली.
संजय राऊतांच्या टीकेला भाजपाचे प्रत्युत्तर
खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या टीकेचा भाजपाने चांगलाच समाचार घेतला. इराण-इस्रायल युद्धाचा फटका जगातील बहुतांश देशांना बसत आहे. मात्र, अशा परिस्थितीतही भारत सुरक्षित असल्याचे विरोधी पक्षांतील नेत्यांना पाहवत नसल्याची टीका भाजपाचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी केली आहे. संजय राऊत हे पत्रकार परिषदांमधून अफवा पसरवून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या वक्तव्यांमुळे देशाची बदनामी होत असल्याचा आरोपही बन यांनी केला आहे. गॅस सिलिंडरचे बुकिंग केल्यानंतर सुमारे २५ दिवसांत ग्राहकांच्या घरापर्यंत सिलिंडर पोहोचत असल्याचे बन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. काही ठिकाणी मर्यादित तुटवडा जाणवत असला तरी तशी परिस्थिती वितरकांकडून होत असलेल्या साठेबाजीमुळे निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
हेही वाचा : महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य विधेयकाची एवढी भीती का? नेमके काय आहे या विधेयकात?
संजय राऊतांवर केले गंभीर आरोप
केंद्र आणि राज्य सरकार या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचे सांगत घरगुती गॅस सिलिंडरची कमतरता भासू दिली जाणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नोंदवलेल्या प्रत्येक मागणीप्रमाणे नागरिकांच्या घरापर्यंत सिलिंडर पोहोचवण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वामुळे भारताकडे वाकड्या नजरेने बघण्याची कुणाची हिंमत होत नाही. मात्र, दुर्दैवाने संजय राऊत रोज आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने बघतात, अशी टीका बन यांनी केली. इराण आणि इस्राईल युद्धाचा फटका आपल्या देशाला बसायला हवा, अशी राऊतांची इच्छा आहे. गॅस, इंधन, ऊर्जा संकटाच्या नावाखाली देशात अराजक पसरवण्याचा घाणेरडा घाट राऊतांनी घातला आहे. परंतु, राऊतांचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. कारण- देशातील १४० कोटी जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यकर्तृत्वावर विश्वास आहे, असेही बन यांनी स्पष्ट केले आहे.
