अनिकेत साठे

राजकीय इच्छाशक्ती आणि पाठबळाअभावी सुवर्ण त्रिकोणातील एक असणारे नाशिक शहर मागे राहिले. तुलनेत नागपूर व औरंगाबादसारख्या शहरांची भरभराट झाली. नाशिकच्या विकासासाठी हे राजकीय पाठबळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मिळविण्यासाठी त्यांच्या समवेत काम करण्याचा निर्णय घेतल्याचे ठाकरे गटाचे महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी सूचित केल्यामुळे राजकीय पटलावर वेगवेगळी चर्चा सुरू झाली आहे. मावळत्या महापालिकेत पाच वर्षे भाजपची एकहाती सत्ता होती. या काळात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर नाशिकला दत्तक घेतले होते. शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार आहेत. या स्थितीत नाशिक पिछाडीवर राहण्याचा उल्लेख करण्यामागील नेमके अर्थ काढले जात असून त्यामुळे भाजपमध्ये अस्वस्थता वाढली आहे.

Pimpri, Traders camp, Mahayuti,
पिंपरी : कॅम्पातील व्यापाऱ्यांचा महायुतीला पाठिंबा; महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरेंना धक्का
stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
alibag mother killed her two kids marathi news
माता नव्हे तू वैरीणी! विवाहबाह्य संबंधांत अडथळा ठरलेल्या २ चिमुकल्यांचा आईनेच घेतला जीव
two wheeler thieves enjoy at dance bar
नागपूर: वाहन चोरायचे अन् डान्सबारमध्ये पैसे उडवायचे…

हेही वाचा>>>महाविकास आघाडीचे शनिवारी मुंबईत शक्तिप्रदर्शन

खासदार, आमदारांच्या पक्षांतरानंतरही संघटनात्मक पातळीवर एकसंघ राहिलेल्या महानगर शिवसेनेला (ठाकरे गट) सुरुंग लावण्यात अखेर बाळासाहेबांची शिवसेना पक्षाला यश आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईतील वर्षा निवासस्थानी नाशिक महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांच्यासह १२ माजी नगरसेवकांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश करीत ठाकरे गटाला धक्का दिला. लवकरच आणखी काही माजी नगरसेवक, पदाधिकारी शिंदे गटात दाखल होणार असल्याचे बोरस्ते यांनी म्हटले आहे. मुंबईतील कार्यक्रमात त्यांनी पक्षांतरामागील भूमिका मांडली. सुवर्ण त्रिकोणातील नाशिक हे अन्य शहरांच्या तुलनेत बरेच पिछाडीवर राहिले. त्यामागे राजकीय पाठबळाचा अभाव होता. हे पाठबळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वरुपात मिळणार असेल तर नाशिककरांनी त्यांना पाठिंबा द्यायला हवा. विकासाला विरोध करून झारीतील शुक्राचार्य होण्यापेक्षा त्यांच्यासमवेत काम करण्याचा सर्वांनी निर्णय घेतल्याचे बोरस्ते यांनी सूचित केले.

हेही वाचा>>>मुस्लिम आरक्षणाच्या माध्यमातून ध्रुवीकरणाचे प्रयत्न, एमआयएमचा बुधवारी विधिमंडळावर मोर्चा

मुख्यमंत्री शिंदे यांनी देखील बोरस्ते यांच्या भूमिकेचे स्वागत केले. शिंदे गटात प्रवेश केलेल्या सर्व माजी नगरसेवकांच्या पाठिशी आम्ही खंबीरपणे उभे राहणार असल्याचे स्पष्ट केले. नाशिक शहरासाठी स्वतंत्र निधी देण्याचे मुख्यमंत्र्यांनी मान्य केले. तसेच स्थानिक प्रश्नांबाबत त्यांच्या उपस्थितीत लवकरच नाशिक येथे बैठक होणार असल्याचे शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेवकांनी म्हटले आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना (ठाकरे गट) फूट पडली असली तरी हा गट देखील भाजपच्या मार्गाने निघाल्याचे लक्षात येते. नाशिकचे पालकत्व आता विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्याचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचा प्रयत्न आहे. मागील निवडणुकीत भाजपने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नाशिकचे पालकत्व दिले होते. भाजप- शिवसेना (शिंदे गट) युतीत त्याची पुनरावृत्ती होण्याच्या मार्गावर आहे. शिंदे गटाच्या प्रवेश सोहळ्यात रखडलेली कामे, राजकीय पाठबळाची कमतरता हे मुद्दे उचलले गेल्याने भाजपची कोंडी होणार आहे. शहरातील तीनही मतदार संघात मागील आठ वर्षांपासून भाजपचे आमदार आहेत. महानगरपालिकेत पक्षाची सत्ता होती. स्थानिक राजकारणात भाजपने शिवसेनेला कधीही फारशी किंमत दिलेली नाही. गेल्या वेळी मनपाची निवडणूक भाजपने स्वबळावर लढविली. एकहाती यश मिळाल्यानंतर सेनेला सातत्याने डावलण्याचे धोरण ठेवले होते. याचा विचार करता आगामी महापालिका निवडणुकीत भाजप- शिंदे गटात युती होईलच, असे सध्यातरी सांगता येत नाही. कारण, सध्या शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या बोरस्ते यांच्यासह इतरांनी महापालिकेतील भाजपच्या कारभारावर वेळोवेळी टीका केलेली आहे. शहरातील खड्डेमय रस्ते, गुन्हेगारीत झालेली वाढ, यामुळे नाशिककरांमध्ये मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे. या पार्श्वभूमिचा विचार करुनच शिंदे गटाने आपले डावपेच आखण्यास सुरूवात केल्याचे चित्र आहे.