संतोष प्रधान, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबई : माजी मंत्री व विदर्भातील काँग्रेस नेते शिवाजीराव मोघे यांची अखिल भारतीय आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती करून पक्षाने त्यांना राष्ट्रीय पातळीवर काम करण्याची संधी दिली आहे. परंतु वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेले शिवाजीराव कितपत सक्रिय राहू शकतात याबाबत साशंकता व्यक्त केली जाते. तसेच आदिवासी समाजावर पकड असलेला नेता अशीही त्यांची प्रतिमा नसल्याने या पदावर काम करताना त्यांच्यासमोर मोठे आव्हान असेल.

हेही वाचा >>>ओबीसी लोकसंख्या कमी झाल्याने त्यातून आरक्षण देण्याची मराठा समाजाची मागणी

मोघे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. अनेक वर्षे त्यांनी राज्य मंत्रिमंडळात काम केले. शांत व संयमी अशी प्रतिमा असलेले मोघे हे काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ. इंदिरा गांधी, राजीव गांधी व सोनिया गांधी या तत्कालीन पक्ष नेतृत्वाशी ते कायमच एकनिष्ठ राहिले. १९८०, १९८५, १९९५, १९९९, २००९ मध्ये विधानसभेवर निवडून आलेल्या मोघे यांच्याकडे पक्षाने महत्त्वाची जबाबदारी सोपविली होती.

हेही वाचा >>> हिमाचल प्रदेशात भाजपाला धक्का, खिमी राम यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

मोघे हे यवतमाळ जिल्ह्यातून निवडून येत असत. यवतमाळ जिल्हा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जायचा. या जिल्ह्यातून काँग्रेसचा उमेदवार डोळे झाकून निवडून यायचा. शिवाजीराव मोघे, वसंत पुरके हे दोन आदिवासी समाजाचे नेते याच जिल्ह्यातून निवड़ून यायचे. काँग्रेस नेतृत्वाशी एकदम एकनिष्ठ या एकाच निकषावर शिवाजीरावांची पक्षात चलती असायची.

यवतमाळ या काँग्रेसच्या एकेकाळच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसची अवस्था दारूण झाली आहे. शिवाजीराव मोघे यांचा लागोपाठ दोन निवडणुकांमध्ये पराभव झाला. पक्षाने आदिवासी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी मोघे यांची नियुक्ती केली असली तरी जिल्ह्याबाहेर आदिवासी समाजावर त्यांचा फारसा कधीच प्रभाव पडला नाही. राज्यातील आदिवासी समाजाचे नेते अशीही त्यांची कधी प्रतिमा नव्हती वा आदिवासी समाजाचे नेतृत्व करण्याचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाही. पालघर, जव्हार, धुळे, नंदुरबार या आदिवासीबहुल भागातही कधी शिवाजीराव मोघे यांनी आदिवासी समाजाचे नेते म्हणून दौरे केल्याचेही फारसे अनुभवास आले नाही. अगदी विदर्भातील गडचिरोलीमध्येही त्यांना मानणारा तेवढा मोठा वर्ग नाही.

हेही वाचा >>> कथा दोन बैठकांची; एक झालेल्या आणि दुसरी न झालेल्या बैठकीची

आदिवासी समाजातील एक ज्येष्ठ नेते एवढीच काय ती मोघे यांची ओळख. या बळावरच काँग्रेसने त्यांची पक्षाच्या आदिवासी विभागाच्या अध्यक्षपदी निवड केली. वयोपरत्वे शिवाजीरावांवर काहीशी बंधने आली आहेत. आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने त्यांना आदिवासी समाजाचे प्राबल्य असलेल्या भागांमध्ये देशभर दौरे करावे लागतील. मोघे हे हाडाचे कार्यकर्ते असले तरी भाषणांमधून समाजाला आपलेसे करतील अशीही त्यांची प्रतिमा नाही.

हेही वाचा >>> राज्यातून द्रौपदी मुर्मू यांना ७० टक्क्यांपेक्षा अधिक मते मिळणार

आदिवासी समाज हा पारंपारिकदृष्ट्या काँग्रेसला साथ देत असे. पण लोकसभेच्या गेल्या दोन निवडणुकांमध्ये आदिवासी समाजावर भाजपने वर्चस्व प्रस्थापित केल्याचे चित्र बघायला मिळाले. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या बहुतांशी जागा भाजपने जिंकल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजाला पुन्हा पक्षाच्या प्रवाहात आणण्याचे आव्हान मोघे यांच्यासमोर असेल.

हेही वाचा >>> सत्तेत असो किंवा नसो पिंपरीत पवारांचीच ‘दादा’ गिरी

पक्षाने त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपविली असली तरी या पदाला ते कितपत न्याय देऊ शकतील याबाबत पक्षातच साशंकता व्यक्त केली जाते. याआधी नागपूरचे नितीन राऊत हे पक्षाच्या अनुसूचित जाती विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. मोघे यांच्या रूपाने विदर्भाला पक्षाने पुन्हा एकदा नेतृत्व दिले आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivajirao moghe appointed as president of all india tribal congress prd
First published on: 13-07-2022 at 20:40 IST