मुंबई : मनसेला माहीमसह काही जागांवर पाठिंबा किंवा छुपे सहकार्य करण्यावरून महायुतीमध्ये पेच निर्माण झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे माहीममधून विधानसभेची निवडणूक लढवीत असून त्यांच्यासाठी माघार घेण्यास आमदार सदा सरवणकर तयार नाहीत. त्यामुळे यासह महायुतीचे उर्वरित जागावाटप व अन्य मुद्द्यांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिंदे यांच्या ह्य वर्षा ह्य निवासस्थानी झालेल्या बैठकीत चर्चा झाली असून ते मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.
राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्याशी मैत्री असल्याने व भाजपला त्यांनी मदत केल्याने त्यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांच्याविरोधात महायुतीने उमेदवार उभा करू नये, अशी मागणी मुंबई भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी शिंदे व फडणवीस यांच्याकडे केली आहे. भाजप व शेलार यांचे राज ठाकरे यांच्याबरोबर असलेले संबंध जपण्यासाठी महायुती माहीमचे आमदार सदा सरवणकर यांची उमेदवारी मागे घेणार का आणि मनसेला राज्यात अन्य काही जागांवर मदत करणार का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. शिवसेना (शिंदे गट) पक्षाकडून ए बी अर्ज मिळाल्याने सरवणकर सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पण त्यांनी अर्ज भरू नये, यासाठी दबाव असून त्यांच्याशी शिंदे – फडणवीस यांनी चर्चा केली.
काही जागांवर मदतीबाबत चर्चा
मनसेचे शिवडी येथून बाळा नांदगावकर, कल्याण ग्रामीणमधून राजू पाटील आणि अन्य काही मतदारसंघातून मनसेचे उमेदवार निवडणूक लढवीत आहेत. तेथे महायुती मनसेला छुपे सहकार्य करणार का, याविषयी शिंदे-फडणवीस यांच्यात चर्चा सुरू आहे. मनसेला सहकार्य केल्यास शिंदे गटातील उमेदवारांना बलिदान करावे लागणार आहे. भाजपसाठी त्याग करण्याची सरवणकर यांची तयारी नसून बंडाच्या वेळी सरवणकर यांनी साथ दिल्याने शिंदे यांना त्यांची उमेदवारी रद्द करणे अडचणीचे झाले आहे.
कोंडी फुटेना
मीरा-भाईंदरच्या अपक्ष आमदार गीता जैन या महायुतीच्या बाजूने असून त्यांना भाजपकडून उमेदवारी हवी आहे. ही जागा भाजपला देण्याची शिंदे गटाची तयारी नाही. भाजप नेते मुरजी पटेल हे अंधेरी पूर्वमधून निवडणूक लढविण्यास इच्छुक असून शिंदे गट ही जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे पटेल यांना शिंदे गटाकडून निवडणुकीत उतरविण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत. जागावाटपात अधिकाधिक जागा मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न असून जेथे जागा देण्यास शिंदे किंवा अजित पवार गटाचा विरोध आहे, तेथे त्या पक्षांकडे आपल्या नेत्यांना पाठवून उमेदवारी देण्याची भाजपची रणनीती आहे. बहुतांश जागावाटप झाले असल्याचा दावा महायुतीचे नेते करीत असले तरी अद्याप आठ-नऊ जागांवर शिंदे-फडणवीस यांच्यात चर्चा सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.