scorecardresearch

Premium

राज्यात सत्ता संसार, परभणीत सत्तासंघर्ष

परभणीतील सत्तासंघर्ष स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

Parbhani
परभणीत शिवसेना आणि राष्ट्रवादी आमनेसामने

आसाराम लोमटे

परभणी राज्यात सत्ता संसार करणाऱ्या महाविकास आघाडीतील शिवसेना व राष्ट्रवादीतला परभणीतील सत्तासंघर्ष स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. लोकसभा निवडणुकीत सातत्याने राष्ट्रवादीचा पराभव होत असतानाही शिवसेनेशी लढण्याकरता सुरुवातीला विजय भांबळे त्यानंतर राजेश विटेकर यांना राष्ट्रवादीने बळ दिले आहे. लोकसभा निवडणुकीत पराभूत होणारा राष्ट्रवादीचा उमेदवार हा शिवसेनेचा कट्टर राजकीय विरोधक मानला जातो. सध्या या संघर्षाचे स्वरूप खासदार संजय जाधव विरुद्ध राजेश विटेकर असे असल्याने राज्यातील सत्तासंसार परभणीत सत्तासंघर्षात परिवर्तित होताना दिसतो आहे.

eknath-shinde-aditi-tatkare
आदिती तटकरेंच्या मतदारसंघात निधीचा ओघ, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता
ajit pawar jayant patil
“अर्थखातं कधीपर्यंत टिकेल सांगता येत नाही”, अजित पवारांच्या वक्तव्यावर जयंत पाटील म्हणाले…
email
लोकमानस : राजकारण लांडग्यांचा खेळ झाला आहे का?
KC Venugopal
“संसदेच्या जुन्या वास्तूत दोष होता?” महिला आरक्षण विधेयकावरून काँग्रेसचा थेट पंतप्रधान मोदींना प्रश्न

काय घडले काय बिघडले?

जिल्ह्यात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस असा सत्तासंघर्ष कायम सुरू असतो. दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध असतात. गाव पातळीवर दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते परस्परांविरुद्ध आपल्या नेत्यासाठी झगडत असतात. स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचा वरचष्मा असतो आणि लोकसभेला शिवसेनेचा भगवा फडकतो. अनेक वर्षांपासून ही परंपरा आहे. नुकतीच मुदत संपलेली जिल्हा परिषद राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. राष्ट्रवादी काँग्रेसकडे २४, शिवसेनेचे १३, काँग्रेसचे ६, भाजपचे ५, घनदाट मित्रमंडळ १, रापस ३ आणि अपक्ष १ असे जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल होते. तसा परभणी जिल्ह्यात पक्षनिष्ठा हा अधूनमधून चर्चा करण्याचा विषय आहे. जिल्ह्यातील सर्वपक्षीय मातब्बर राजकारणी पक्षनिष्ठा गुंडाळून एक दुसऱ्याला सहकार्य करत असतात. कोणी, कुठे सहकार्य करायचे आणि त्याबदल्यात कोणते हितसंबंध सुरक्षित राहतील याचे अलिखित करार अगदी ठरलेले आहेत. त्यानुसारच सर्व राजकीय तडजोडी पार पाडल्या जातात.

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर जिल्ह्यात सत्तेचा लंबक राष्ट्रवादीकडे असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. महायुतीच्या काळात शिवसेनेचे गुलाबराव पाटील पालकमंत्री होते. महाविकास आघाडीत राष्ट्रवादीचे नवाब मलिक पालकमंत्री झाले. त्यांच्यामागे ‘ईडी’चा ससेमिरा लागल्याने आता पालकमंत्री पदाची सूत्रे धनंजय मुंडे यांच्याकडे आहेत. विधानसभेची गणिते आणखी वेगळी आहेत. हा संघर्ष शिवसेना विरुद्ध कॉंग्रेस असा आहे. आजच्या महाविकास आघाडीतले राजकीय पक्ष स्थानिक पातळीवर गेल्या अनेक वर्षांपासून परस्परांच्या विरोधात झुंजत आहेत. परभणी विधानसभा मतदारसंघ गेल्या तीन दशकांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे. शिवसेनेचा सामना करताना काँग्रेस पक्षाने आजवर अनेक प्रयोग केले मात्र काँग्रेसला सेनेचा हा बालेकिल्ला भेदता आला नाही. काँग्रेसने मुस्लिम उमेदवार दिल्यानंतर जे धार्मीक ध्रुवीकरण होते तेव्हा शिवसेनेच्यावतीने ‘खान हवा की बाण’ असा प्रचार केला जातो. या प्रचाराला रोखण्यासाठी काँग्रेसने हिंदू उमेदवारही दिले पण निवडणूकीच्या रिंगणात एखादा प्रभावी मुस्लिम उमेदवार उभा करण्याची खेळी अनेकदा शिवसेनेकडूनही होते. गेल्या एका निवडणुकीत सेना-भाजपचे उमेदवार स्वतंत्र लढले तरी शिवसेनेने आपला बालेकिल्ला राखला.

संभाव्य राजकीय परिणाम

महाविकास आघाडीच्या सरकारनंतर जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मंडळ हे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे आले ही बाब खासदार संजय जाधव यांच्या जिव्हारी लागली होती. त्यातूनच त्यांनी आपला राजीनामा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठवून दिला होता. प्रत्यक्षात हा राजीनामा म्हणजे केवळ पक्षनेतृत्वाला नाराजी कळावी आणि नेतृत्वाचे लक्ष वेधले जावे एवढ्यासाठी केलेला प्रयत्न असल्याचे स्पष्ट झाले. मुदत संपलेल्या जिल्ह्यातील बाजार समित्यांवर प्रशासक मंडळ नियुक्तीवरून महाविकास आघाडीतील राजकीय पक्षांचाच कलगीतुरा सुरू झाला. विशेषतः शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात जोरदार रस्सीखेच चालली. सेलू, जिंतूर येथील बाजार समित्यांच्या प्रशासक मंडळावरून पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांच्यात अंतर्गत संघर्ष सुरू झाला होता. राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यातला खडखडाट पुन्हाही उफाळून येऊ शकतो. भविष्यात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना या संघर्षाची आणखी काही रूपे पहायला मिळण्याची शक्यता जास्त आहे. महाविकास आघाडीचे सरकार अस्तित्वात आले तरी जिल्ह्यात राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र नांदण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. लोकसभेला या दोन्ही पक्षातले हाडवैर टोकाला जाते असा आजवरचा इतिहास आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Shivsena and ncp are the part of maha vikas agadi but they are having conflicts in parbhani

First published on: 28-05-2022 at 10:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×