प्रसाद रावकर

सूरतमधील मुक्काम हलवून गुवाहाटीला रवाना झालेल्या बंडखोर आमदारांची संख्या हळूहळू वाढत असून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेऊन असलेल्या माजी नगरसेवकांमध्येही चलबिचल वाढू लागली आहे. महाराष्ट्रातील राजकीय समीकरणांमध्ये होणारे संभाव्य बदल लक्षात घेऊन माजी नगरसेवकही कुंपणावर दिसू लागले आहेत. आपल्या विभागातील आमदाराच्या पावलावर पाऊल टाकून माजी नगरसेवकही एकनाथ शिंदेंच्या बाजून जातात की अशी शंकेची पाल अनेकांच्या मनात चुकचुकू लागली आहे.

शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत वादामुळे युती संपुष्टात आली आणि २०१७ मध्ये पार पडलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत उभय पक्ष परस्परांविरुद्ध उभे ठाकले. निवडणुकीच्या प्रचारात उभयतांनी आरोपांची राळ उडवत परस्परांना आव्हान-प्रतिआव्हानेही दिली. या निवडणुकीत शिवसेनेचे ८४, तर भाजपचे ८२ उमेदवार विजयी झाले. अवघे दोन नगरसेवक कमी पडल्यामुळे भाजपला मुंबई महानगरपालिकेतील सत्तेपासून दूर राहावे लागले होते. शिवसेनेने सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर भाजपने पारदर्शकतेचे पहारेकरी बनून मुंबई महानगरपालिकेत विरोधी बाकांवर बसणे पसंत केले. त्याच वेळी विरोधी पक्षनेते पदाची धुराही भाजपने खांद्यावर न घेतल्यामुळे मुंबई महानगरपालिकेतील तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या काँग्रेसच्या पथ्यावर पडले. मुंबई महानगरपालिका विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसला मिळाले. गेल्या पाच वर्षांमध्ये पालिकेतील शिवसेनेच्या कारभारावर भाजप नगरसेवकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. अनेक प्रस्ताव रोखून धरले, काही प्रस्ताव शिवसेनेने संख्याबळ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने मंजूर केले. मुंबई महानगरपालिका सभागृहाची मुदत ७ मार्च २०२२ रोजी संपुष्टात आली आणि त्यानंतर प्रशासकाच्या हाती सूत्रे गेली. नगरसेवकपदाची मुदत संपुष्टात येण्यापूर्वी मातोश्रीचे अत्यंत विश्वासू आणि स्थायी समितीचे अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे यशवंत जाधव यांच्या घरावर आयकर खात्याचे छापे पडले. त्यामुळे शिवसेना वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची चिन्हे निर्माण झाली होती.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लवकरच अपेक्षित आहे. अनेक माजी नगरसेवक निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. महिलांसाठी आरक्षित झालेल्या प्रभागात पत्नी किंवा मुलीला उमेदवारी मिळावी यासाठी माजी नगरसेवक व्यूहरचना करीत होते. तेवढ्यातच शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारले आणि राज्यात राजकीय नाट्य सुरू झाले. या राजकीय नाट्यामुळे माजी नागरसेवक भांबावले आहेत. यशवंत जाधव यांच्या पत्नी आमदार यामिनी जाधव बंडखोरांच्या छावणीत दिसल्याने माजी नगरसेवकांमध्ये प्रचंड चलबिचल सुरू झाली आहे.

विधानसभा मतदारसंघात मुंबई महानगरपालिकेचे पाच – सहा किंवा त्याहूनही अधिक प्रभाग मोडतात. म्हणजे एका आमदाराच्या मतदारसंघात पाच-सहा नगरसेवकांची कुमक असते. नगरसेवकांनी केलेल्या कामांचा आमदाराला फायदा होत असतो. अनेक माजी नगरसेवक आमदारांचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. आमदार गुवाहाटीत दाखल झाल्यामुळे त्यांचे समर्थक असलेल्या माजी नगरसेवकांकडेही संशयाने पाहिले जात आहे. त्यामुळे शिवसेनेच्या माजी नगरसेवकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असले तरीही थांबा आणि वाट पाहा अशी भूमिका या मंडळींनी घेतली आहे.