नागपूर : सार्वजनिक ठिकाणी दिवसभर ‘ महायुती-महायुती’चा जप करायचा आणि कार्यकर्त्यांना स्वबळाच्या तयारीला लागा असे सांगायचे, या भाजप नीतीला ओळखून शिंदे सेनेने भाजपमागे फरफटत न जाता जिल्ह्यातील नगरपालिका, नगर पंचायतींच्या निवडणुकीसाठी इतर मित्र पक्षांच्या मदतीने स्वतंत्र वाटचाल सुरू केली आहे.

शिवसेनेचे आमदार कृपाल तुमाने यांनी राष्ट्रवादीसह (अजित पवार) अन्य मित्र पक्षाच्या नेत्यांसोबत केलेली जागा वाटपाबाबतची चर्चा असो किंवा इच्छुकांच्या घेतलेल्या मुलाखती. या शिंदे सेनेच्या स्वतंत्र वाटचालीच्या निदर्शक ठरल्या आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीपासून तर त्या जाहीर झाल्यानंतरही नागपूर जिल्ह्यातील भाजप नेत्यांच्या तोंडी महायुती एकत्रितपणे लढणार अशीच भाषा होती आणि आहे. विशेषत: पालकमंत्री चंद्रशेखर बावकुळे हे आत्ताही (अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावरही) महायुतीचीच भाषा करतात , मात्र त्याच वेळी ते ‘ कार्यकर्त्यांचा आग्रह स्वबळाचा आहे’ हे सांगायला विसरत नाही. त्यामुळे भाजपच्या मनात नेमके काय आहे, हे मित्र पक्षाला कळेनासे झाले. त्यामुळे शिंदे सेनेच्या स्थानिक नेत्यांनी भाजप मागे फरफटत जाण्यापेक्षा स्वतंत्रपणे वाटचाल सुरू केल्याचे सध्याचे चित्र आहे.

नागपूर जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार आहेत, त्यापैकी रामटेकचे आमदार आशीष जयस्वाल हे राज्यमंत्री असून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू मानले जातात. दुसरे कृपाल तुमाने हे विधान परिषद सदस्य आहेत. रामटेक लोकसभा मतदारसंघातून ते एकसंघ शिवसेनेकडून दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले आहे. जयस्वाल यांची भूमिका ही भाजपला अनुकूल आहे तर तुमाने हे या पक्षापासून अंतर ठेवून स्वतंत्रपणे निर्णय घेणारे आहेत.

शिवसेनेचा रामटेक, कळमेश्वर, हिंगणा तालुक्यातील काही पट्ट्यात जोर आहे, त्यामुळे त्याच प्रमाणे राष्ट्रवादी अजित पवार यांच्या गटाची ग्रामीण भागात काही प्रमाणात ताकद आहे. दोन्ही मित्र पक्षाच्या प्रभाव क्षेत्रात भाजपला आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मदत होऊ शकते, पण भाजपने स्वबळाच्या विचारामुळे अद्याप मित्रपक्षाला नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकीसाठी विश्वासात घेतले नाही. त्यामुळे शिवसेनेचे आमदार व नेते कृपाल तुमाने यांनी स्वतंत्रपणे वाटचाल सुरू केली आहे.

राष्ट्रवादीसोत बैठक

मागील आठवड्यात आ. कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वात अजित पवार गटासोबत बैठक झाली. या बैठकीत दोन्ही पक्षांनी युती करण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे भाजपला न विचारताच ही बैठक झाली, बैठकीतील निर्णय भाजपला कळवण्यात येणार आहे, त्यांना मान्य झाले नाही तर सेना-राष्ट्रवादी इतरांना सोबत निवडणूक लढणार असल्याचे सेनेच्या गोटातून सांगण्यात आले.

इच्छुकांच्या मुलाखती

एकीकडे मित्रपक्षासोबत जागा वाटपाची बोलणी करतानाच दुसरीकडे तुमाने यांनी नगरपालिका, नगर पंचायतीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. चर्चे दरम्यान कार्यकर्त्यांच्या मनाचा कल जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. स्थानिक पातळीवर शिवसेनेने आपली ताकद दाखवल्या शिवाय भाजप आपली दखल घेणार नाही, असा संदेश देण्यात आला.

भाजपला संदेश

स्वतंत्रपणे मुलाखती घेऊन, मित्रपक्षासोबत बैठक घेऊन शिवसेना शिंदे गटाने भाजपला संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे, आम्ही तुमच्या शिवायही निवडणुका लढवू शकतो हे या संदेशामागचा उद्देश आहे. भाजप याला कशा पद्धतीने घेते यावरच पुढच्या काळातील महायुतीचे राजकारण अवलंबून असणार आहे.