बाळासाहेब जवळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात गेल्या २५ वर्षांपासून श्रीरंग बारणे यांचे नाव केंद्रस्थानी आहे. पिंपरी पालिकेतील नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्षनेता, गटनेता, शहराध्यक्ष अशी विविध पदे त्यांनी भूषवली आहेत. चिंचवड विधानसभेत एकदा पराभूत झालेले बारणे, मावळ लोकसभेतून दोन वेळा विजयी झाले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना असा पक्षीय प्रवास केलेल्या बारणे यांनी, आता शिवसेना बंडखोरांच्या शिंदे गटात प्रवेश करून पक्षांतराचे एक वर्तुळ पूर्ण केले आहे.

मावळ मुळशीतील सहकारातील ज्येष्ठ नेते हिरामण बारणे यांचे श्रीरंग हे कनिष्ठ बंधू. वाकडलगतचे थेरगाव हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. १९९७ च्या महापालिका निवडणुकीत ते काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले. १९९९ मध्ये अतिशय चुरशीच्या निवडणुकीत ते स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवडून आले. पिंपरी पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा असतानाही काँग्रेसचे नेते रामकृष्ण मोरे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेतील विरोधी पक्षांची मदत घेऊन बारणे विजयी झाले होते. २००२ मध्ये तीन सदस्यीय प्रभाग पध्दतीत संपूर्ण पॅनेलसह बारणे निवडून आले. त्यानंतर, पिंपरी पालिकेचे विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी तीन वर्षे काम केले. काँग्रेसचे शहराध्यक्षपदही भूषवले. २००७ च्या पालिका निवडणुकीत ते पुन्हा निवडून आले. २००९ मध्ये त्यांनी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला. मावळ लोकसभेसाठी ते इच्छुक होते. परंतु, तेव्हा शिवसेनेने गजानन बाबर यांना उमेदवारी दिली. बाबर निवडूनही आले. पुढे, २००९ मध्ये बारणे यांना शिवसेनेने चिंचवड विधानसभेची उमेदवारी दिली. चुरशीच्या लढतीत तत्कालीन राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांच्याकडून बारणे पराभूत झाले. त्यानंतरच्या पालिकेच्या थेरगाव पोटनिवडणुकीत आणि २०१२ च्या सार्वत्रिक निवडणुकीतही बारणे पुन्हा निवडून आले. ते पालिकेत शिवसेनेचे गटनेते झाले. सलग पाच वेळा निवडून आलेल्या आणि विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या बारणे यांच्यावर विश्वास दाखवून शिवसेनेने २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत बाबर यांना नाकारून श्रीरंग बारणे यांना मावळची उमेदवारी दिली. तेव्हा बारणे यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी, शेकाप आणि मनसेची मदत घेऊन लोकसभा निवडणूक लढवली. मात्र, दीड लाखांहून अधिक मतांच्या फरकाने जगताप पराभूत झाले. तत्कालीन मोदी लाटेचा प्रचंड फायदा बारणे यांना झाला.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून रिंगणात असलेले राहुल नार्वेकर (सध्याचे विधानसभा अध्यक्ष) हे तेव्हा तिसऱ्या स्थानावर फेकले गेले होते. २०१७ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने बारणे यांना पुन्हा रिंगणात उतरवले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात आली होती. पवारांच्या प्रभावामुळे सुरुवातीला अटीतटीची वाटणारी ही निवडणूक नंतर एकदमच एकतर्फी ठरली. जवळपास सव्वा दोन लाखांच्या फरकाने बारणे विजयी झाले. याही वेळी बारणे यांना मोदी लाट आणि भाजपच्या राजकीय ताकदीचा खूपच फायदा झाला. याशिवाय, स्थानिक भूमिपुत्रांची एकजूट, लादलेला उमेदवार, राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह हे मुद्दे महत्त्वाचे ठरले होते. वर्षानुवर्षे अजित पवारांचे नेतृत्व स्वीकारलेल्या पिंपरी-चिंचवडकरांनी त्यांच्या मुलाला मात्र सपशेल नाकारले होते.

बारणे दुसऱ्यांदा खासदार झाले, तेव्हा प्रथमच लोकसभेवर निवडून आलेल्या श्रीकांत शिंदे यांच्याशी त्यांची मैत्री झाली. पुढे खासदार शिंदे व त्यांचे वडील एकनाथ शिंदे यांच्यातील बारणे यांचे संबंध दृढ झाले. शिंदेंच्या बंडानंतर सुरुवातीच्या काळात बारणे यांनी उघडपणे कोणतीही भूमिका घेतली नाही. किंबहुना, शिवसैनिकांच्या बैठका घेत ‘खचू नका, गोंधळून जाऊ नका, संघटनात्मक बांधणी करा”, असे आवाहन बारणे करत होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी मौनच राखले होते. मात्र, त्यांचे शिंदे परिवाराशी असलेले संबंध पाहता ते एकनाथ शिंदे यांच्यासोबतच जातील, असे तेव्हा खासगीत बोलले जात होते. बदलत्या राजकीय घडामोडीत राष्ट्रपती- उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने बारण यांनी शिंदे गटात प्रवेश केला आ

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena leader shreerang barne join eknath shinde group print politics news pkd
First published on: 20-07-2022 at 17:33 IST