सतीश कामत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा मी कडवट शिवसैनिक आहे आणि मरेपर्यंत उध्दव ठाकरे यांचाच शिवसैनिक म्हणून राहीन, असे निःसंदिग्ध प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते आमदार राजन साळवी यांनी केले आहे.

आमदार साळवी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याचे वृत्त शुक्रवारी सकाळी समाजमाध्यमांद्वारे सर्वत्र वेगाने पसरले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही साळवी यांची भेट झाल्याची चर्चा सुरु होती. मात्र या वृत्ताचे खंडन करत,  बदनामी करण्यासाठी विरोधक  हा प्रयत्न करत असल्याचा आरोप आमदार साळवी यांनी केला. आपण अशा प्रकारे कोणाचीही भेट घेतलेली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, मला कोणी निष्ठा शिकवण्याची आवश्यकता नाही. ही बदनामी कोण करत आहे, हे मला माहीत आहे. पायाखालची वाळू घसरू लागल्यामुळे हा पर्याय त्यांच्याकडून अवलंबला गेला. याला मी भीक घालत नाही. शिवसेनेतून शिंदे गटात गेलेल्यांना पुढील निवडणुकीची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे ते सेनेच्या आमदारांना बदनाम करत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे हात अधिक बळकट करण्यासाठी मी आदित्य ठाकरे यांच्याबरोबर दौर्‍यात सहभागी झालो आहे आणि अखेरपर्यंत शिवसेनेतच राहणार आहे.

रोजगारासाठी रिफायनरी हवी: साळवी

दरम्यान राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाविषयी साळवी म्हणाले की, नाणार येथील रिफायनरी प्रकल्पाला विरोध करण्यात आला होता. मात्र त्यानंतर बारसु येथे या प्रकल्पाला जागा देण्यासंदर्भात तत्कालीन मुख्यमंत्री  उध्दव ठाकरे यांनी केंद्र शासनाला प्रस्ताव दिला होता. या ठिकाणी प्रकल्प आला तर राजापूर-लांजा मतदारसंघासह संपूर्ण जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मिळणार आहे. म्हणून हा प्रकल्प होण्यासाठी मी सकारात्मक आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena mla rajan salvi said till last breath i will be with uddhav thackeray and shivsena print politics news pkd
First published on: 20-08-2022 at 10:46 IST