Maharashtra Top 5 Political News: प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करण्याची मागणी करण्यात आली आहे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्याविरोधात मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. शिवसेनेचे मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपाच्या आमदाराने आंदोलन केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्याबद्दल वक्तव्य केले आहे. मराठी अनिवार्य करण्यात आल्याने रिक्षा व टॅक्सी चालकांकडून ४ मे रोजी संप पुकारण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर पाच महत्वाच्या घडामोडी जाणून घेऊयात.

प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन होणार?

राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आलेला असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत उमेदवारांविषयी अद्यापही निर्णय होऊ शकलेला नाही. प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांना शिवसेनेकडून उमेदवारी निश्चित झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यासाठी पक्षाचे शिवसेनेते विलीनीकरण करावे, अशी अट शिवसेनेच्या काही नेत्यांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसमोर ठेवण्यात आल्याचे समजते. पण, त्यावरून प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये मतांतरे दिसून आली आहेत. बच्चू कडू यांच्या नावावरूनही शिवसेनेच्या एका गटात नाराजीचा सूर आहे. बच्चू कडू यांचा शिवसेनेशी संबंध काय? असा थेट सवाल काही नेत्यांनी उपस्थित केला आहे. बच्चू कडू यांना जर शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी द्यायची असेल, तर त्यांनी आपला प्रहार जनशक्ती पक्ष शिवसेनेत विलीन करावा, अशी अट काही नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर ठेवल्याचे समजते. मात्र, या प्रस्तावावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही.

मराठीसक्ती विरोधात रिक्षा, टॅक्सी चालकांचा ४ मे रोजी संप

राज्यातील सर्व अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना एक मे पासून मराठी भाषा सक्ती करण्यात येणार आहे. याविरोधात परभाषिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी ४ मे रोजी संप पुकारणार असल्याचं आवाहन केलं. परिणामी महाराष्ट्रात मोठा वाद निर्माण झाला. त्यामुळे, आज परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मुंबईसह आजूबाजूच्या महानगरांतील रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांच्या शिष्टमंडळाबरोबर मंत्रालयात बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. बैठक संपल्यानंतर प्रताप सरनाईक म्हणाले, “महाराष्ट्रातील रिक्षा-टॅक्सी युनियनच्या नेत्यांबरोबर बैठक झाली. आमंत्रण देताना सांगितलं होतं की रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य आहे, ही राज्यशासनाची भूमिका आहे, या भूमिकेशी सहमत आहात का? त्यांनी सहमती दर्शवली आहे. प्रवासी मागे बसल्यावर ‘काय सेवा पाहिजे?’; ‘कुठे जायचं आहे?; ‘पैसे किती झाले’; इतकी जुजबी मराठी आली पाहिजे. भविष्यात ओला, उबेर रॅपिडोमध्येही याचा समावेश करणार. काहींनी तीन महिने, सहा महिने, एक वर्षाची मुदत मागितली आहे. विविध संघटनांनी विविध मुदत मागितली. या संघटनांबरोबर सकारात्मक चर्चा झाली. परिवहन मंत्री म्हणून मी भूमिका घेतली आहे, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर जुजबी मराठी यायलाच हवी, या भूमिकेशी सर्वांनी सहमती दर्शवली आहे, असंही प्रताप सरनाईक म्हणाले.

प्रताप सरनाईकांवर गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपाचे आंदोलन

परिवहनमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपचे मिरा भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांच्यामध्ये विस्तवही जात नसताना आता प्रताप सरनाईक यांना आणखी अडचणीत आणण्याचे काम मेहता यांच्याकडून सुरु झाले आहे. घोडबंदर येथील भाईंदरपाडा भागातील भूमिपूत्रांच्या २ हजार ४३९ चौ. मीटर क्षेत्रापैकी १ हजार २१९ चौ. मीटर जमीन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि त्यांच्या गुंडांकडून बळकावण्यात आल्याचा आरोप मेहता यांनी केला. सोमवारी तक्रार देण्यासाठी भाजपच्या मिरा भाईंदरच्या कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन त्यांनी ठाणे शहरातील कासारवडवली पोलीस ठाणे गाठले. तसेच गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. या प्रकरणानंतर महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. परिवहन मंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) नेते प्रताप सरनाईक आणि नरेंद्र मेहता यांच्यामधील वाद सर्वश्रूत आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणूकीत भाजप आणि शिंदे गटाने मिरा भाईंदरमध्ये एकमेकांविरोधात निवडणूक लढविली होती. या निवडणूकीत एकमेकांवर गंभीर आरोप केले होते. दरम्यान, आता पुन्हा एकदा नरेंद्र मेहता यांनी प्रताप सरनाईक यांच्यावर भूमिपुत्रांची जागा बळकावल्याचा आरोप केला आहे.

गडकरींकडून माजी पंतप्रधान राजीव गांधींचे कौतुक?

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच विरोधकांचाही सन्मान करतात. आता त्यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात माजी पंतप्रधान व काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव गांधी यांच्या कार्यकाळातील शिक्षणाच्या दर्जावर भाष्य केले. नागपुरात सिव्हिल लाईन येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात रविवारी सायंकाळी नवोदय विद्यालयाचा ४० वा वर्धापन दिन पार पडला. या कार्यक्रमात त्यांनी शिक्षण, त्याचा दर्जा व भविष्यातील सुधारणा यावर विचार मांडले. व्यासपीठावर दर्शन सिंग तसेच विविध क्षेत्रात नावलौकिक मिळवणारे नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते. गडकरी म्हणाले, देशात नवोदयची सुरुवात झाली. त्यावेळी राजीव गांधी पंतप्रधान होते. त्याकाळात शिक्षणाचा विस्तार करण्याचा विचार करण्यासोबत गुणवत्ताही कायम राहावी, यावर भर दिला जात होता, असे त्यांनी सांगितले.

पानसरेंविरुद्ध मरणोत्तर गुन्हा दाखल करा, संजय गायकवाडांची नवी मागणी

कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी  सुमारे ३७ वर्षांपूर्वी लिहिलेल्या आणि प्रशांत आंबी यांनी प्रकाशित केलेल्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झालेला वाद आमदार संजय गायकवाड यांच्या दिलगिरी नंतर आणि कोल्हापूर येथे ( अदखलपात्र का होईना ) गुन्हा दाखल झाल्याने शांत होईल असा अंदाज होता. मात्र तो साफ चुकीचा ठरलाय! बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी सोमवारी ( २७  एप्रिल)  जिल्हाधिकाऱ्यांना  निवेदन सादर केले.  यात लेखक दिवंगत गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर गुन्हा दाखल करण्यात यावा,  पुस्तकास  विदेशातून आर्थिक मदत मिळाली आहे का हे तपासावे, तसेच पुस्तक छापणाऱ्या, विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. तसेच महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख असलेल्या आणि लेखकाच्या मृत्युनंतर पुस्तक छापाई करणाऱ्या प्रकाशक प्रशांत आंबी याला अटक करावी, अशी मागणी करण्यातत आली आहे.