हर्षद कशाळकर शेकाप आमदार जयंत पाटील यांचा राग पुन्हा एकदा अनावर झाला आहे. आमदारांच्या विशेष अधिकाराचा दाखला देऊन पोलीस अधिकाऱ्यांना जयंत पाटील यांनी भर बैठकीत खुर्चीतून उठवल्याची बाब समोर आल्यानंतर त्यावरून वादंग सुरू झाला आहे. या घटनेचा महाराष्ट्र पोलीस बल संघटनेनी निषेध केला असून आमदारांनी माफी मागावी अशी मागणी केल्याने शेकापसमोर ऐन निवडणुकीच्या हंगामात प्रतिमेचा प्रश्न निर्माण झाला आहे. शेकाप आमदार जयंत पाटील पुन्हा एकदा वादात सापडले आहे. पेण येथील प्रांताधिकारी कार्यालयात एका बैठकी दरम्यान आमदार जंयत पाटील यांनी पोलीस निरीक्षकांना खुर्चीतून उठवले माझ्यासमोर बसायचे नाही. मी आमदार आहे. आमचे अधिकार आणि राजशिष्टाचार पाळले पाहिजेत. मी तुमच्यावर गुन्हा दाखल करतो असा इशाराही दिला. आमदार जयंत पाटील यांचा हा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाला. त्यानंतर आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. महाराष्ट्र पोलीस बल संघटनेने जयंत पाटील यांच्या या वागणुकीचा निषेध केला आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांनी आमदार जयंत पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांची माफी मागावी अशी मागणी केली आहे. अन्यथा आम्ही तुम्हाला शिष्टाचार खुर्ची भेट देऊ असा इशाराही दिला आहे. नागपूरमध्ये ‘आप’चा फायदा कोणाला, तोटा कोणाला? महापालिका निवडणुकीत प्रथमच उडी या टीकेनंतर जयंत पाटील यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला आहे. त्या बैठकीला पोलीस अधिकाऱ्यांनी येण्याचा संबंध नव्हता. ते आले. ते प्रांताधिकाऱ्यांच्या बाजूला बसले. मी त्याला आक्षेप घेतला. उद्या सभापतींच्या खुर्चीवर मी जाऊन बसू शकत नाही. कोणी कुठे बसावे याचे राजशिष्टाचारानुसार संकेत आहेत. नवीन अधिकाऱ्यांना त्याची जाणीव नसते. मी जागृत लोकप्रतिनिधी आहे. त्यामुळे मी त्यांना त्यांची चूक लक्षात आणून दिली. कायद्याने आणि नियमाने वागलात तर अपमान होणार नाही असे स्पष्टीकरण त्यांनी माध्यमांना दिले आहे. आमदार जयंत पाटील यांना राग अनावर होण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी पोलीस, महसुल विभागाच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागले आहे. अभिनेता शाहरुख खान याच्यावर गेट वे ऑफ इंडिया येथे बोटीत बसण्यावरून त्यांचा वाद झाला होता. यावेळीही ते शाहरुख खानच्या सुरक्षा रक्षकांवर प्रचंड भडकले होते. लोकसभा निवडणूक निकालानंतर राग अनावर झाल्याने ते पत्रकारावर धावून गेले होते.