लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर व्हायला अवघे काही दिवस बाकी आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांकडून आपल्या मतदारसंघाचे दौरे सुरू आहेत. अशातच आता भाजपा नेत्या तथा केंद्रीय मंत्री स्मृती इराणीदेखील अमेठी लोकसभा मतदारसंघाचा चार दिवसीय दौरा करणार आहेत. महत्त्वाचे म्हणजे इराणी यांच्या दौऱ्यावेळीच राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रादेखील अमेठीत दाखल होईल.

हेही वाचा – ‘सडक पे स्कूल’ अभियान सुरू करणारे दलित नेते, ते हत्या प्रकरणातील दोषी; कोण आहेत मनोज मंझील?

२०२२ नंतर पहिल्यांदाच दोन्ही नेते एकाच वेळी अमेठीत दाखल होणार आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वीच राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. खरं तर अमेठी हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. १९८१ मध्ये राजीव गांधी यांनीही याच मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्यानंतर राहुल गांधी यांनीही अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. मात्र, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत स्मृती इराणी यांनी अमेठीमधून निवडणूक लढवत राहुल गांधी यांचा पराभव केला. राहुल गांधी यांनी जवळपास १५ वर्ष अमेठी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले.

दरम्यान, दोन वर्षांनंतर पहिल्यांदाच स्मृती इराणी आणि राहुल गांधी हे दोघेही एकाच वेळी अमेठीत असणार आहेत. यापूर्वी फेब्रुवारी २०२२ मध्ये दोघेही उत्तर प्रदेश निवडणुकीच्या प्रचारासाठी एकाच वेळी अमेठीत होते. आपल्या चार दिवसीय दौऱ्यात स्मृती इराणी अनेक गावांना भेटी देणार आहेत. तसेच त्या स्थानिकांशी संवाद साधतील. याशिवाय २२ फेब्रुवारी रोजी अमेठीत त्यांच्या घराचे वास्तुपूजनही आहे. २०१९ च्या निवडणूक प्रचारादरम्यान त्यांनी अमेठीत घर बांधून येथे स्थायिक होणार असल्याचे सांगितले होते.

हेही वाचा – समाजवादी पक्षाला आणखी एक धक्का! पाच वेळा खासदार राहिलेल्या सलीम शेरवानींनी दिला पक्षाचा राजीनामा; नेमकं कारण काय?

काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्राही याचदरम्यान अमेठीत दाखल होईल. यावेळी राहुल गांधी यांची अमेठीत जाहीर सभा होणार आहे. तसेच राहुल गांधी यांचा रोडशोदेखील आयोजित करण्यात आला आहे. यावेळी राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्याकडून एकमेकांकडून काय टीका-टिप्पणी केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.