सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रणधुमाळीत महापालिकेवर पहिल्यांदाच मिळवलेली एकहाती सत्ता, जिल्हा परिषदेवर फडकवलेला भगवा आणि जिल्ह्यातील ११ पैकी आठ पंचायत समित्यांवर मिळवलेले वर्चस्व. कागदावर पाहिले तर सोलापूर जिल्ह्यात भाजपचा एकछत्री अंमल अभूतपूर्व वाटावा असाच आहे. नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीतही पक्षाने बाजी मारली. दुसरीकडे महाविकास आघाडीकडे लोकसभेचे दोन्ही खासदार आणि विधानसभेचे सर्वाधिक सहा आमदार असे भक्कम संख्याबळ असूनही यातील अनेक सत्ताधारी पक्षांच्या जवळ आहेत. एकीकडे सत्ता आणि पुन्हा विरोधकही विस्कळीत हे सध्या सोलापुरात भाजपच्या पथ्यावर पडत आहे.

संख्याबळात वरचढ असलेल्या विरोधकांना विकासनिधी, जिल्हा नियोजन समितीची कामे आणि प्रशासकीय पातळीवरील प्रलंबित फायलींच्या माध्यमातून निष्प्रभ करण्याचे चाणाक्ष तंत्र सत्ताधाऱ्यांनी अवलंबले आहे. त्यामुळे अनेक विरोधी आमदार सत्तेच्या परिघाभोवतीच पिंगा घालताना दिसतात. मोहिते-पाटील यांच्या मदतीने विधानसभेत पोहोचलेले माळशिरसचे आमदार उत्तम जानकर आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील विकासकामांच्या गरजेतून मोहिते-पाटलांपासून दुरावून भाजपशी सख्य राखून आहेत. सांगोल्याचे शेकाप आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या भूमिकेत दिवंगत गणपतराव देशमुखांच्या तत्त्वनिष्ठेऐवजी सत्तेशी जुळवून घेणारी ‘राजकीय लवचिकता’ जाणवत आहे; तर ‘विठ्ठल’ सहकारी साखर कारखान्यासाठी तब्बल ३५० कोटींचे कर्ज मिळवणारे माढ्याचे आमदार अभिजित पाटील कागदावर विरोधकांसोबत दिसत असले, तरी प्रत्यक्षात मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांशी त्यांचे संधान कायम आहे.

दुसरीकडे, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (डीसीसी) रणधुमाळीने भाजपमधील अंतर्गत धुसफूस उघडी पाडली आहे. सहकार कायद्यातील कलम ८८ अन्वये जुन्या संचालकांना बाद करण्याचा डाव टाकताना सलग दहा वर्षांच्या निकषामुळे थकबाकी नसतानाही माजी आमदार संजयमामा शिंदे यांना रिंगणातून बाहेर पडावे लागण्याची शक्यता निर्माण झाली. हा निर्णय पालकमंत्र्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे नेऊन त्यावर तोडगा काढण्याची शिंदे यांची आग्रही भूमिका भाजप आमदारांनी सोयीस्करपणे डावलल्याने नाराज आहेत. यावरूनच आमदार राजेंद्र राऊत आणि संजयमामा शिंदे यांच्यात उडालेली खडाजंगीची राजकीय क्षेत्रातही चर्चा आहे. शिवाय, अपात्रतेची टांगती तलवार असलेल्या काही बड्या नेत्यांनी कुटुंबातील सदस्यांना मैदानात पुढे करीत घराणेशाही कायम ठेवण्याची तयारी केली आहे. त्यामुळे, पूर्वी काँग्रेस-राष्ट्रवादीवर घराणेशाहीचा शिक्का मारणारा भाजप या नेत्यांपुढे आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याचे धाडस दाखवणार का, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

दरम्यान, दक्षिण सोलापूर तालुक्यातील १४ विकास सोसायट्यांच्या ठरावांवरून भाजप कार्यकर्त्यांनीच परस्परविरोधी आक्षेप नोंदवल्याने मतदारयादीच्या अंतिम टप्प्यात पक्षांतर्गत शीतयुद्ध देखील चव्हाट्यावर आले.

नदीपात्रातून वेळेत न सोडलेले पाणी, उसाचे नुकसान, दुष्काळ आणि वीज कपात यांवरून सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची आयती संधी विरोधकांसमोर होती; पण त्यांच्यातील विसंवादामुळे विरोधक निष्प्रभ ठरले. सोलापूर शहर व जिल्ह्यातील विविध प्रश्नांवर खासदार प्रणिती शिंदे आक्रमक भूमिका घेत असतानाच, आता उजनी धरण परिसरात प्रस्तावित ‘एआय डेटा सेंटर’, फ्लोटिंग सोलर आणि हायड्रोजन प्रकल्पावरून नव्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा येणार असल्याचा आक्षेप घेत खासदार धैर्यशील मोहिते-पाटील आणि माजी आमदार संजयमामा शिंदे या पारंपरिक राजकीय विरोधकांनी या प्रकल्पाबाबत मात्र विरोधाची भूमिका घेतली आहे.

नियोजन समितीच्या निधीवाटपावरून खासदार शिंदे व मोहिते-पाटील यांचा पालकमंत्र्यांशी संघर्ष सुरू असतानाच, विधान परिषदेचा कार्यकाळ संपल्यानंतर भाजपपासून दुरावलेले माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी मागील काही महिन्यांपासून थेट पालकमंत्री गोरे यांच्या सातारा जिल्ह्यातील माण-खटाव भागासह, सोलापूर जिल्ह्यात जुन्या लोकांच्या गाठीभेटी घेणे सुरू केले आहे. जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावरील या भेटीगाठी सत्ताधाऱ्यांसाठी डोकेदुखी वाढवणाऱ्या ठरतील काय, हे लवकरच स्पष्ट होईल. संख्याबळ असूनही विसंवादामुळे अडखळणारे विरोधक आणि सत्ता ताब्यात असूनही घराणेशाही, अंतर्गत कुरघोडी व पाण्याच्या वादात गुरफटलेली सत्ताधारी फळी, अशा पेचात सोलापूरचे सत्ताकारण सध्या हेलकावे खात आहे.