पुणे : बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व २१ जागा घेत बारामतीत ‘राष्ट्रवादी’च ‘दादा’ असल्याचे दाखवून दिले. बंडखोरी केलेले कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यांच्या माध्यमातून ‘मिशन बारामती’ मोहिमेला पुन्हा सुरुवात करण्याचे भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या पॅनेललाही शून्य जागा मिळाल्याने बारामतीचे युवा नेतृत्त्व म्हणून स्थान बळकट करण्यात युगेंद्र पवार हे तिसऱ्यांदा निष्प्रभ ठरले.

या कारखान्याच्या निवडणुकीसाठी ८४.२५ टक्के मतदान झाले.  कारखान्याच्या २१ जागांसाठी ८३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सोमवारी (१२ ऑक्टोबर) निकाल जाहीर करण्यात आला. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ला सर्व २१ जागा मिळाल्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या आणि बंडखोर उमेदवार पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनेलला एकही जागा मिळू शकली नाही.

बारामतीचे नवे नेतृत्त्व होण्याची युगेंद्र पवारांनी संधी गमावली

या कारखान्याच्या निवडणुकीत दोन्ही ‘राष्ट्रवादी’ एकमेकांसमोर उभ्या राहिल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ होते. त्याचे नेतृत्त्व युवा नेते युगेंद्र पवार यांनी केले. बारामतीतील युवा नेतृत्त्व म्हणून प्रतिमा निर्माण करण्याची युगेंद्र पवार यांची तिसऱ्यांदा संधी गेली. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही युगेंद्र पवार यांच्या नेतृत्त्वाखाली लढविण्यात आली. मात्र, त्या कारखान्याच्या निवडणुकीतही पक्षाला एकाही जागा मिळवता आली नव्हती. आता सोमेश्वर कारखान्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्याकडे नेतृत्त्वाची जबाबदारी देण्यात आली. त्याद्वारे बारामतीचे नवीन नेतृत्त्व होण्याची संधी त्यांनी गमावली.

भाजपची रणनीती फोल

महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला बारामतीत उघड आव्हान देण्याऐवजी भाजपने कारखान्याचे १३ वर्षांपासूनचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांना हाताशी धरून पडद्यामागून ‘मिशन बारामती’ मोहीम पुन्हा राबविण्याची रणनीती आखली. त्यासाठी जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. मात्र, भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले.

जगताप यांनी मुरुम-वाल्हा गटातून निवडणूक लढविली. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून विक्रम भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून राजेंद्रकुमार जगताप हे उमेदवार होते. विक्रम भोसले यांनी पुरुषोत्तम जगताप यांचा ६४९० मतांनी पराभव केला. भोसले यांना १३ हजार ८५४ मते मिळाली, तर पुरुषोत्तम जगताप यांना ७३६४ मते मिळू शकली.

‘मिशन बारामती’ काय आहे?

भाजपने २०१९ मध्ये ‘मिशन बारामती’ या मोहिमेला सुरुवात केली. तेव्हा भाजपने ‘मिशन ४५’ अंतर्गत राज्यातील ४८ लोकसभेच्या जागांपैकी ४५ जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले. त्यामध्ये बारामती लोकसभा मतदार संघाचा समावेश होता. तेव्हा खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात भाजपने आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना उमेदवारी दिली. त्यांच्या प्रचारासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची बारामतीत सभा घेतली. मात्र, भाजपला यश मिळाले नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने भाजपने प्रचाराची धुरा आमदार कुल यांच्यावर सोपविली आहे. त्या निवडणुकीतही भाजपला अपयश आले. आता दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर भाजपचा प्रत्यक्ष रणांगणात उतरण्याऐवजी जगताप यांच्या माध्यमातून बारामतीत शिरकाव करण्याचा प्रयत्न होता. बारामतीकरांनी ही रणनीती फोल ठरविली.