णे : बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही केवळ कारखान्याची निवडणूक न राहता राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या भविष्यातील राजकीय वाटचालीची नांदी ठरणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर या पक्षाचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत पहिल्यांदाच बंडखोरी झाली आहे. या बंडखोरांना थारा मिळणार की घरचा रस्ता दाखविला जाणार, हे या कारखान्याच्या निवडणुकीच्या सोमवारी (१२ ऑक्टोबर) होणाऱ्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. बंडखोरांना यश मिळाल्यास आगामी काळात ‘राष्ट्रवादी’साठी ही धोक्याची सूचना असणार आहे. बंडखोरांना अपयश आल्यास बंडखोरीच्या पावित्र्यात असलेल्या अन्य पदाधिकाऱ्यांना वेगळा निर्णय घेतल्यास तो राजकीयदृष्ट्या आत्मघातकीपणा होईल, याची जाणीव करून देणारा ठरणार आहे.

या कारखान्याच्या  निवडणुकीत दोन्ही ‘राष्ट्रवादी’ समोरासमोर उभ्या राहिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे ‘सोमेश्वर शेतकरी विकास पॅनेल’ असून, त्याचे नेतृत्त्व युवा नेते युगेंद्र पवार यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ‘श्री सोमेश्वर विकासपुरुष अजितदादा पवार पॅनेल’ असून, प्रचार आणि नियोजनाची धुरा युवा नेते जय पवार यांनी सांभाळली. भाजपने ‘राष्ट्रवादी’त फूट पाडून कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली बंडखोर गटाचा पाठिंबा घेत ‘लोकनेते अजितदादा सोमेश्वर विकास पॅनेल’ निवडणुकीच्या रिंगणात उतरविले. त्यामुळे या निवडणुकीत तिरंगी लढत झाली असून, सोमवारी निकाल जाहीर होणार आहे.

बारामतीसह पुरंदर आणि फलटण या तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत अनेक घडामोडी झाल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात पहिले बंड झाले आहे. या कारखान्याचे गेली १३ वर्षे अध्यक्ष असलेले पुरुषोत्तम जगताप यांनीच बंडखोरी करून भाजपच्या साथीने स्वतंत्र पॅनेल उभे केले. त्यांचे बंड यशस्वी होणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. जगताप यांच्या पॅनेलला यश मिळणार की नाही, यावर आगामी काळातील ‘राष्ट्रवादी’चे भवितव्य ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

जगताप यांनी बंड केल्यानंतर निवडणुकीत प्रचारात अजित पवार यांच्या नावाचा आणि त्यांच्या छायाचित्राचा वापर केला. अजित पवार यांचे नाव आणि छायाचित्र वापरण्यास उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आक्षेप घेत त्यांना पक्षातून निलंबित केले. युवा नेते युगेंद्र पवार यांनी माळेगाव सहकारी साखर कारखाना तोट्यात असल्याचा आरोप केला. या कारखान्याच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार या आहेत. त्यामुळे युगेंद्र पवार आणि जगताप यांच्या आरोपांना आणि राजकीय खेळींना प्रत्युत्तर देण्याची वेळ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षावर आली.

वाणेवाडी गटाच्या निकालाकडे लक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात बंडखोरी केलेले पुरुषोत्तम जगताप हे वाणेवाडी येथून निवडणूक लढवित आहेत. त्यामुळे या गटाच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी (अजित  पवार) पक्षाकडून विक्रम भोसले आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडून राजेंद्रकुमार जगताप हे निवडणूक लढवित आहेत.