सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या बेमुदत उपोषणाचा आज (मंगळवार) १७ वा दिवस आहे. दिल्लीतील जंतर मंतर मैदानात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ते आंदोलन करत आहेत. कॉक्रोच जनता पार्टीकडून हे आंदोलन केले जात आहे. नीट पेपर फुटल्याने अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. या निषेध करत सोनम वांगचुक व कॉक्रोच जनता पार्टीने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. ‘इंडियन एक्स्प्रेस हिंदी’ला वांगचुक यांनी मुलाखत दिली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना “लोकांचा आवाज” ऐकण्याचे तसेच या आंदोलनात “सर्व पक्षांच्या नेत्यांना” सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
प्रश्न: तुमच्या आंदोलनाला जे विरोध करत आहेत, त्यांचं म्हणणं आहे की नीट परीक्षा व्यवस्थेतच बदल हवा आहे. एका व्यक्तीने राजीनामा दिल्याने हा प्रश्न सुटेल असं तुम्हाला वाटतं का?
उत्तर: नक्कीच नाही. पण, यामुळे विश्वासार्हता निर्माण होईल. फक्त शिक्षण व्यवस्थेत बदल व्हावा म्हणून हे आंदोलन सुरू नाही. तर संपूर्ण भारतीय समाजात बदल होण्याची गरज आहे. जर परीक्षेचे पेपर फुटत असतील तर कोणत्या स्वरूपाचे डॉक्टर आपल्याला मिळतील? तेच डॉक्टर तुमच्या मुलांना तपासतील. नक्कल करून पास झालेले इंजिनियर तुमच्या इमारती उभ्या करतील. पर्यायाने त्या पडतील. अनेकांचे जीव जातील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिकपणाला आज देशात किंमत राहिलेली नाही. सगळं काही अप्रामाणिकपणावर सुरू आहे. परीक्षेच्या पेपर पासून ते मतांपर्यंत सगळं काही विकण्यासाठी ठेवलंय. अशा पद्धतीने एखादा देश प्रगती कसा करेल? विकसित देश बनण्याचे तर सोडूनच द्या, या ग्लोबल व्हिलेज (जागतिक पातळीवरील खेडे) ला आपण कसे सामोरे जाणार आहोत?
प्रश्न: आज (सोमवारी) तुमच्या उपोषणाचा १६ वा दिवस आहे. नरेंद्र मोदी सरकारने तुमच्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संपर्क साधला का?
उत्तर: नाही. त्यामुळे आम्ही आमचा आवाज आता आणखी वाढवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून तो आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचेल. जर आमचा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचला नाही तर हा सरकारचा दोष नसेल. हा दोष या देशातील लोकांचाही असेल. एका संवेदनशील मुद्द्यावर कोणी आवाज उठवत असताना आपण त्याला मदत केली नाही, हा दोष लोकांचा असेल. जेव्हा तुमच्या बाजूने कोणीच नसेल त्या क्षणाची तुम्ही आवाज उठवण्यासाठी वाट पाहत आहात का? जर लोकांनी बाहेर पडून आवाज उठवला तर सरकारकडे चर्चा करून मार्ग काढण्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नसेल. पण, सरकार खुपच असंवेदनशील नसेल अशी आम्हाला आशा आहे. येत्या एक दोन दिवसांत कदाचित ते या सगळ्यावर मार्ग काढतील.
प्रश्न: चर्चेसाठी दरवाजे खुले आहेत का? जर तुम्हाला चर्चेचं आमंत्रण देण्यात आलं तर तुम्ही फक्त राजीनाम्याचाच मुद्दा मांडणार आहात की आणखी व्यापक मुद्द्यावर चर्चा कराल?
उत्तर: एक राजीनामा किंवा विश्वासार्हता यांपासून सुरूवात होईल. त्यानंतरच चर्चेसाठी दरवाजे खुले होतील. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या मुद्द्यावर चर्चा झाली पाहिजे. व्यापक स्वरूपात बदल घडवून आणण्यासाठी सरकारने तरूणाई किंवा शैक्षणिक क्षेत्रातील माझ्यासारख्या तज्ज्ञांची मदत घ्यायला हवी.
प्रश्न: सोशल मीडियावर जो सपोर्ट मिळाला तो ग्राउंडवर मिळत नसल्याने तुमची निराशा झाली आहे का? मिळालेला प्रतिसाद हा तुलनात्मकदृष्ट्या कमी आहे. एक दिवस स्टेजवरून तुम्हाला लोकांना आवाहन करावं लागलं की थोडं साहस दाखवा.
उत्तर: जवळपास ५ ते ७ हजार लोक दिवसभरात येतात. हे आकडे कदाचित वाढले नसतील, पण चिंता वाटावी इतके कमीही ते नाहीत. लोकांनी एकजुटतेसाठी एक दिवस उपोषण करायला हवे. हा त्रास त्यांनी स्वत:ही घ्यायला हवा जेणेकरून सरकारला या परिस्थितीचे गांभीर्य कळेल.
प्रश्न: जर तुमचा उद्देश हाच आहे तर तुम्ही डाव्या विद्यार्थी संघटनांसोबत स्टेजवर का आहात, असा प्रश्न लोकांना पडला आहे. डाव्या विद्यार्थी संघटना AISF, SFI आणि AISA यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने दिसत आहेत. त्यामुळे काही लोक आंदोलनापासून दूर राहत आहेत.
उत्तर: आम्ही या आंदोलनात सहभागी होण्याचं निमंत्रण भाजपालाही दिलंय. मी वैयक्तिकपणे प्रत्येकाला आवाहन करतो की माझ्यासोबत स्टेजवर या. पण, संख्या अधिक असल्याने तसे शक्य होणार नाही. हा निर्णय मी आयोजकांवर सोडला आहे.
प्रश्न: विरोधी पक्षातील राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांसारख्या नेत्यांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आयोजकांना वाटते का?
उत्तर: सगळ्या पक्षातील नेते येतील अशी मला आशा आहे. जर ते नाही आले, तर त्यांची संकुचित मानसिकता दिसून येईल. परिणामी लोक त्यांना नाकारतील. या आंदोलनाला कोणताही राजकीय रंग नाही.
प्रश्न: कॉक्रोच जनता पार्टीशी जुळण्याआधी तुम्हाला काही संकोच वाटत होता का?
उत्तर: मी त्यांचा अभ्यास केला. त्यांच्याशी बोललो. ते स्वत:च्या वैयक्तिक फायद्यासाठी काही करत आहेत, असं मला वाटत नाही. भविष्याबाबत बोलायचं झाल्यास, राजकारणात उतरण्यासाठी प्रत्येक जण स्वतंत्र आहे.
प्रश्न: पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तुमचा संदेश काय असेल?
उत्तर: लोकांचा आवाज ऐकणं सरकारसाठी दीर्घकाळ फायद्याचं राहिल. त्यांनी (मोदींनी) संवेदनशील असलं पाहिजे. ताठर भूमिका घेऊ नये. लोकशाही सहानुभूती आणि करूणेवर चालत असते. कठोर भूमिकेवर नाही. मी त्यांना (मोदींना) वैयक्तिक कधीही भेटलेलो नाही.
