Sonia Gandhi Belonging Book : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांच्या आगामी पुस्तकाच्या भारतातील प्रकाशनावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या पुस्तकाचे प्रकाशक पेंग्विन रँडम हाऊस इंडिया (PRHI) यांच्या वकिलांनी सोनिया गांधीच्या बिलॉगिंग (Belonging) या पुस्तकातील अनेक प्रकरणांमध्ये बदल करण्याची आणि काही मजकूर वगळण्याची सूचना केली आहे, असे वृत्त ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे. या बदलांवरून लेखकांची टीम आणि प्रकाशक अशा दोन्ही बाजूंमध्ये जवळपास दोन महिने चर्चा झाली. मात्र, अखेर भारतातील प्रकाशनाचा करार पुढे जाऊ शकला नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला ही चर्चा सलोख्याने पार पडली. मात्र, शेवटच्या टप्प्यात मतभेद निर्माण झाले.
सोनिया गांधींच्या पुस्तकाचं पेंग्विन रँडम हाऊसच्या अल्फ्रेड ए. नॉफ या विभागाने जागतिक स्तरावर प्रकाशन केलं आहे. भारतात हे पुस्तक प्रकाशित आणि वितरित करण्याची जबाबदारी पेंग्विन रँडम हाऊस इंडियाकडे होती. ‘नॉफ’ने १० नोव्हेंबरला या पुस्तकाचे प्रकाशन होणार असल्याची घोषणा केली होती. तसेच पहिल्या आवृत्तीच्या एक लाख प्रती छापण्यात येणार असल्याचे नॉफने यापूर्वी जाहीर केले होते.
कोणत्या मुद्द्यांवर बदल सुचवले?
दी इंडियन एक्स्प्रेसला मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाशकाच्या वकिलांनी पुस्तकातील अनेक प्रकरणांमध्ये बदल करण्याच्या आणि काही भाग वगळण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या १२ वर्षांच्या राजकारभाराचा उल्लेख, आरएसएसची भूमिका, धार्मिक तेढ आणि दंगलींचे संदर्भ तसेच अल्पसंख्याकांच्या स्थितीशी संबंधित मजकुरावर आक्षेप घेण्यात आला.
सोनिया गांधी यांच्या वतीने राजीव गांधी यांच्या सहायकाच्या पत्नीने या पुस्तकावर काम केले. दुसरीकडे, पेंग्विन रँडम हाऊस इंडियाच्या संपादकीय टीममध्ये किमान तीन संपादक होते. त्यात सल्लागार संपादकांचाही समावेश होता.
सुरुवातीला दोन्ही बाजूंमधील चर्चा सौहार्दपूर्ण होती; मात्र पुढे या बदलांच्या मुद्द्यावर मतभेद वाढत गेले. जवळपास दोन महिने या विषयावर चर्चा सुरू होती. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, सुरुवातीच्या तुलनेत शेवटच्या टप्प्यात चर्चेचा सूर बदलला.
सोनिया गांधींच्या टीमने काय आक्षेप घेतला?
प्रकाशकांकडून सुचविण्यात आलेल्या बदलांना सोनिया गांधींच्या टीमने दोन प्रमुख कारणांवरून विरोध केला. प्रकाशकांचे वकील काही मुद्द्यांबाबत गरजेपेक्षा जास्त संवेदनशील होत आहेत, असा पहिला आक्षेप होता. तर दुसरा मुद्दा पुस्तकाच्या जागतिक आणि भारतीय आवृत्तीशी संबंधित होता. मोदींचा उल्लेख किंवा गलवानमधील भारत-चीन संघर्षासारख्या समकालीन घटनांशी संबंधित मजकूर वगळला किंवा बदलला, तर भारतात प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांच्या आवृत्ती आणि जगभर प्रकाशित होणाऱ्या आवृत्ती भिन्न असतील, असा युक्तिवाद सोनिया गांधींच्या टीमने केला.
अशा परिस्थितीत भारतातील वाचकांना जागतिक आवृत्ती आणि भारतीय आवृत्तीची तुलना करून नेमका कोणता मजकूर बदलण्यात आला किंवा वगळण्यात आला, हे शोधावं लागेल. त्यामुळे पुस्तकाच्या दोन वेगवेगळ्या आवृत्त्या तयार होणं योग्य ठरणार नाही, असं प्रक्रियेत सहभागी असलेल्या एका सूत्राने इंडियन एक्सप्रेसला सांगितले.
पुस्तकात नेमकं काय आहे?
पुस्तकाची रचना आणि संपूर्ण मजकूर याबाबत दोन्ही बाजूंनी फारशी माहिती सार्वजनिक केलेली नाही. मात्र, सूत्रांच्या मते, हे सोनिया गांधी यांच्या आयुष्यावरील सर्वांत सविस्तर आणि महत्त्वाचे आत्मकथन मानले जात आहे. पुस्तकाच्या शेवटच्या भागात भारतीय राजकारणाची दिशा आणि भविष्यातील राजकारणाबाबत सोनिया गांधींची मते त्यात मांडण्यात आली आहेत, अशी माहिती आहे. त्यामुळे पुस्तकातील राजकीय संदर्भांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रकाशकानं काय म्हटलं?
पुस्तक भारतात का प्रकाशित झाले नाही, शीर्षक का रद्द करण्यात आले, नेमके कोणते बदल सुचवण्यात आले होते, याबाबत ‘दी इंडियन एक्स्प्रेस’ने विचारलेल्या प्रश्नांना पेंग्विन रँडम हाऊसने थेट उत्तर दिलेले नाही. मात्र, सोमवारी जारी केलेल्या निवेदनात प्रकाशकाने स्पष्ट केले की, बाहेरून कोणताही दबाव नव्हता.
पेंग्विन रँडम हाऊस ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी कंपनी खूप उत्सुक होती. हे पुस्तक मिळविण्यासाठीही मोठ्या प्रयत्नांनंतर करार झाला होता. लेखकाच्या प्रतिनिधींसोबत चर्चेदरम्यान अनेक मुद्दे मांडण्यात आले. काही मुद्द्यांवर लेखकाच्या टीमने बदल मान्य केले, तर काही मुद्द्यांवर प्रकाशकाने लेखकाची भूमिका स्वीकारली. मात्र, एका महत्त्वाच्या मुद्द्यावर दोन्ही बाजूंमध्ये सहमती होऊ शकली नाही. त्यानंतर सोनिया गांधींच्या टीमने पुस्तकाचे प्रकाशन पुढे नेण्याची इच्छा नसल्याचे प्रकाशकाला कळवले. पेंग्विन रँडम हाऊस ऑफ इंडियानेही त्यांचा निर्णय मान्य केला.
करारातील गोपनीयतेच्या अटी आणि लेखकाच्या माहितीची गोपनीयता महत्त्वाची असल्याने मतभेदाचे नेमके कारण किंवा सुचवण्यात आलेले बदल सार्वजनिक करता येणार नसल्याचे प्रकाशकाने स्पष्ट केले.
या परिस्थितीत सध्या एक गोष्ट स्पष्ट आहे, सोनिया गांधींच्या पुस्तकातील मोदी सरकारचा कार्यकाळ, आरएसएस, धार्मिक दंगली आणि अल्पसंख्याकांशी संबंधित उल्लेखांवर बदल सुचवण्यात आले होते. मात्र, पुस्तकाचा भारतातील प्रकाशन करार नेमक्या कोणत्या एका मुद्द्यावर अंतिमतः मोडला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
