scorecardresearch

बंडानंतरही रायगडात ठाकरे गटाचे अस्तित्व टिकून

जिल्ह्यात २४० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया नुकतीच पार पडली. या निवडणूकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने सर्वाधिक ७९ ग्रामपंचायती जिकत वरचष्मा राखला.

बंडानंतरही रायगडात ठाकरे गटाचे अस्तित्व टिकून
बंडानंतरही रायगडात ठाकरे गटाचे अस्तित्व टिकून

हर्षद कशाळकर

अलिबाग: तीन आमदारांच्या बंडानंतर रायगड जिल्ह्यात शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे अस्तित्व संपुष्टात येईल असा कयास बांधला जात होता. मात्र ग्रामपंचायतीच्या निकालांवरून तरी तसे दिसत नाही. उलट ठाकरे गटाला बऱ्यापैकी यश मिळाले आहे. उत्तर रायगडात पक्षाची ताकद पुन्हा एकदा दिसली आहे.

महाडचे आमदार भरत गोगावले, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी आणि कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे हे शिवसेनेचे तीनही आमदार बंडखोरी करत बाळासाहेबांच्या शिवसेनेत दाखल झालेत. त्यांच्या या बंडखोरी मुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. अनेक जुने जाणते सहकारी आमदारांच्या सोबत गेले आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे अस्तित्व संपुष्टात येईल, असे मानले जात होते.. मात्र मतदारांनी काही प्रमाणात का होईना हा अंदाज फोल ठरविला आहे.

हेही वाचा: माफीवरून खरगे यांनी भाजपला सुनावले

जिल्ह्यात २४० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया नुकतीच पार पडली. या निवडणूकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने सर्वाधिक ७९ ग्रामपंचायती जिकत वरचष्मा राखला. मात्र त्याच वेळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने २३ ग्रामपंचायती स्वबळावर जिकून दाखवल्या. यात उरण, मुरुड, म्हसळा, कर्जत, पाली, पनवेल, पोलादपूर, श्रीवर्धन, खालापूर मधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यावरून शिवसेनेच्या उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाने जिल्ह्यात आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राखल्याचे दिसून येत आहे. उरण, कर्जत आणि श्रीवर्धन विधानसभा मतदार संघात पक्षाची ताकद टिकून असल्याचे या निकालांवरून स्पष्ट होत आहे.

आत्ता तसेच दोन महिन्यांपुर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत उरण आणि कर्जत विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतीत शिवसेना उध्दव ठाकरे गटाने सातत्याने चांगली कामगिरी केली आहे. चांगले यश संपादीत केले आहे. आमदार महेंद्र थोरवे यांच्यासाठी ही धोक्याची घंटा असू शकते. महत्वाची बाब म्हणजे या शिवाय जवळपास ३९ ग्रामपंचायती मध्ये महाविकास आघाडीचे प्रयोग यशस्वी ठरले आहेत. यात प्रामुख्याने माणगाव आणि महाड मधील ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

हेही वाचा: दिव्या ढोले : कॉर्पोरेट क्षेत्रातून राजकारणाकडे

म्हणजेच या निकालातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा महत्वाचा वाटा आहे. ही महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यासाठी आगामी काळात चिंतेची बाब ठरू शकणार आहे. महाड पोलादपूर मध्ये सर्वाधिक जागा जिंकण्यात आमदार भरत गोगावले यांना यश आले असले तरी महाविकास आघाडीच्या यशाकडे त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही. एकूणच जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे निकाल हे बाळासाहेबांच्या शिवसेनेसाठी सुखावणारे असले तरी दिलासादायक नाहीत. त्याचवेळी शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी या निवडणूका आशेचा किरण ठरतील यात शंका नाही.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 21-12-2022 at 11:09 IST

संबंधित बातम्या