scorecardresearch

रुपाली चाकणकर : आश्वासक नेतृत्व

राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की ज्यांना कसलीही पार्श्वभूमी नाही. या अशा काही तरूण, आश्वासक पहिल्या पिढीच्या सर्व पक्षीय राजकारण्यांचा परिचय करून देणारी ही विशेष मालिका.

रुपाली चाकणकर : आश्वासक नेतृत्व
रुपाली चाकणकर : आश्वासक नेतृत्व

अविनाश कवठेकर

पुणे: महिलांच्या प्रश्नांवर लढणाऱ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू समर्थ आणि खंबीरपणे मांडत विरोधकांना सडेतोड उत्तर देणाऱ्या महिला नेत्या ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची ओळख. विषयाचे अचूक आकलन आणि मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तरे देण्याचे कसब आदी गुणांमुळे महिला पुणे शहराध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष ते राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास त्यांचे वेगळेपण सिद्ध करणारा ठरला आहे. राजकारणातील एक आश्वासक नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. महिलांच्या प्रश्नांबाबतची त्यांची संवेदनशीलताही सुपरिचित आहे.

रुपाली चाकणकर यांचा राजकारणातील प्रवेश तसा अनपेक्षितच झाला. दौंडमधील बोराटे या शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मात्र त्यांचे शिक्षण पुण्यातच झाले. रयत शिक्षण संस्थेतील साधना महाविद्यालयात शिक्षण घेतल्यानंतर एमबीए अभ्यासक्रम पूर्ण केला. माहेरी कोणतीही राजकीय पार्श्वभूमी त्यांना नव्हती. प्रशासकीय सेवेत अधिकारी होण्याची त्यांची इच्छा होती. शिक्षण सुरू असतानाच त्यांचा विवाह झाला आणि त्या चाकणकर कुटुंबीयांत आल्या. त्यांच्या सासू रुक्मिणी चाकणकर सन २००२ मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. लग्नानंतर त्यांनी बचत गटाच्या कामाला सुरुवात केली. बचतगटांची स्थापना करून त्यांचा राजकारणाचा श्रीगणेशा झाला. बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे खासदार झाल्यानंतर त्यांच्याकडे खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यांच्या राजकारणाला खऱ्या अर्थाने २००८ पासून प्रारंभ झाला.

हेही वाचा: राहुल नार्वेकर : अभ्यासू व्यक्तिमत्त्वाला संधी

पक्षासाठी झोकून काम करण्याची कार्यपद्धती, महिला संघटन मजबुतीकरणासाठी केलेल्या त्यांच्या प्रयत्नांची पक्षाच्या वरिष्ठांनीही दखल घेत त्यांना महिला शहराध्यक्षपद दिले. त्यांच्याकडे महिला शहराध्यक्षपद असताना महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या विरोधात त्यांनी केलेली आंदोलने चर्चेचा विषय ठरली. महागाईविरोधात खासदारांच्या निवासस्थानासमोरील आंदोलन असो, की खेकड्यांनी धरण फोडले ते तत्कालीन जलसंपदामंत्री तानाजी सावंत यांच्या विधानाविरोधात केलेले अनोखे आंदोलन, आरोग्यप्रमुख पदभरती आणि जलपर्णीविरोधात आंदोलन करून नागरिकांचे प्रश्न मांडण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला. या आंदोलनामुळे संघटना बांधणीसाठीही त्यांना मदत झाली. विविध आंदोलने केल्याप्रकरणी डझनभर गुन्हे त्यांच्या नावावर दाखल आहेत.

हेही वाचा: श्रीशैल्य उटगे : ग्रामीण जनतेचा आवाज

सन २०१९ मध्ये खडकवासला विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची त्यांची इच्छा होती. महिला प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर पक्ष बांधणीसाठी त्यांनी राज्यभर झंझावाती दौरे केले.राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आले. राष्ट्रवादी काँग्रेसनेही ही महत्त्वाची जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्याकडे दिली. महिला आयोगाचे काम करताना महिलांसाठी दक्षता समिती, कायदेदूत अशा संकल्पनांचा त्यांनी प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा: समीर राजूरकर : ध्येयनिष्ठ कार्यकर्ता

अनिष्ट रूढी, परंपरांविरोधातही त्या लढा देत आहेत. पक्ष पातळीबरोबरच वैयक्तिक स्तरावरही त्यांचे काम सुरू आहे. प्रत्येक महिलेला तिचे स्वतंत्र अस्तित्व असते. महिलेचा संघर्ष हा जन्मापासून तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरू असतो. सर्वच स्तरातील महिलांना वेगवेगळा संघर्ष करावा लागतो. मात्र अडचणी, आव्हाने आणि संघर्षावर मात करून स्वत:चे अस्तित्व जपणे महत्त्वाचे आहे, असे रुपाली चाकणकर सांगतात.

मराठीतील सर्व सत्ताकारण ( Politics ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 09:35 IST

संबंधित बातम्या