सुहास सरदेशमुख

औरंगाबाद : उस्मानाबाद जिल्ह्यात महावितरणच्या व जिल्हा परिषदेच्या कामात अनियमितता झाल्या असून त्यांची चौकशी करावी, तसेच २०२१-२२ या वर्षातील कामास स्थगिती द्यावी ,अशी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या विनंतीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मान्यता दिली आहे. तसे पत्र मंत्री सावंत यांच्या स्वीय साहाय्यकांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. पालकमंत्री होण्यापूर्वीच सावंत यांनी आरोग्य विभागा व्यतिरिक्त अन्य सर्व विभागात लक्ष घालण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या स्वीय साहाय्यकास नियोजन विभागात बसण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना त्यांनी दिल्यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ देवेगावकर यांची बदली करण्यात आली.

हेही वाचा… एकनाथ शिंदे शिवसेना पक्षप्रमुख पदावर दावा करणार?

हेही वाचा… विश्लेषण: दसरा मेळाव्याची मुहूर्तमेढ केव्हा रचली? पहिल्या मेळाव्यात बाळासाहेबांना होती ‘ही’ भीती

उस्मानाबाद जिल्ह्यातील महावितरण विभागात अनेक कामात अनियमितता झाल्या आहेत. तसेच जिल्हा परिषदे अंतर्गत रस्त्यांच्या कामांचीही चौकशी करावी असे तानाजी सावंत यांनी सांगितले. तसेच नव्या वर्षातील कामांना अंतरिम स्थगिती देण्याची विनंती त्यांनी केली होती. आता या कामांना स्थगिती देण्याबाबत जिल्हाधिकारी , जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व महावितरणच्या अधीक्षक अभियंता यांना तसे आदेश देण्यात आले आहेत. ही कामे करणारे कंत्राटदार शिवसेना नेत्यांच्या मर्जीतील होते, असे सांगण्यात येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातून तानाजी सावंत व आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थन केले होते. तर आमदार कैलास पाटील यांनी शिंदे यांच्यासमवेत सुरतकडे जाण्यास नकार देत ते पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याकडे परतले. उस्मानाबादचे खासदार ओम राजेनिंबाळकर हेही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याने या जिल्ह्यात निधीच्या वाटपाचे राजकारण अजूनही सुरूच आहे.