तेलंगणामधील भाजपा नेते जी. विवेकानंद यांनी बुधवारी भाजपाचा राजीनामा देऊन राहुल गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा प्रवेश केला आहे. पेड्डापल्ली लोकसभेचे माजी खासदार विवेकानंद यांनी ऑगस्ट २०१९ मध्ये भारत राष्ट्र समितीमधून भाजपामध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांची भाजपाच्या जाहीरनामा समितीमध्ये सदस्य म्हणून निवड करण्यात आली होती. ६६ वर्षीय विवेकानंद यांनी २००९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर पेड्डापल्ली लोकसभा मतदारसंघातून विजय मिळविला होता. मात्र, २०१४ साली भारत राष्ट्र समितीच्या बालका सुमन यांच्याकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. विवेकानंद यांचे वडील जी. वेंकटस्वामी यांनी पेड्डापल्ली लोकसभा मतदारसंघातून १९८९, १९९१ व १९९६ असा तीन वेळा विजय मिळविला होता. विवेकानंद हे विसाका इंडस्ट्रीजचे उपाध्यक्ष आणि व्ही६ तेलुगू वृत्तवाहिनी व तेलुगू वृत्तपत्राचे प्रवर्तक आहेत. त्यांनी २०१६ मध्ये भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला होता. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या सरकारचे सल्लागार म्हणून त्यांना नियुक्त करण्यात आले होते. २०१९ च्या निवडणुकीत तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी बीआरएस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन भाजपामध्ये प्रवेश केला. दुब्बका व हुजुराबाद या मतदारसंघातील पोटनिवडणुकीत भाजपाला विजय मिळवून देण्यासाठी त्यांनी नियोजन आणि धोरणआखणीत महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यासोबतच मुनुगोडू विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती; मात्र या मतदारसंघात बीआरएसकडून त्यांचा पराभव झाला. गेल्या काही दिवसांपासून विवेकानंद यांनी भाजपापासून अंतर राखण्यास सुरुवात केली होती. ते भाजपाच्या मंचावर किंवा कार्यक्रमात बरेच दिवस दिसले नाहीत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार- विवेकानंद आणि त्यांचे सुपुत्र जी. वामसी यांना काँग्रेस पक्षातर्फे तिकीट मिळण्याची अपेक्षा आहे. बुधवारी त्यांनी राहुल गांधी यांची भेट घेतली. विसाका इंडस्ट्रीजचे सहव्यवस्थापक संचालक म्हणून वामसी कार्यरत आहेत.