पुणे : राज्याचे दिवंंगत उपुमख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची धुरा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपविण्यात येण्याची शक्यता असतानाच पुणे जिल्ह्यातील पक्षबांधणीसाठी सुनेत्रा पवार या सक्रिय झाल्या आहेत. जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये विजयी झालेल्या सदस्यांशी संवाद साधल्यानंतर आता त्या अजित पवार यांच्याप्रमाणे ‘जनसंवाद ’ साधणार आहेत. त्यादृष्टीने पक्षाने तयारी सुरू केली असल्याने ‘राष्ट्रवादी पुन्हा’ नव्याने उभी राहणार आहे.
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर ‘राष्ट्रवादी’त दु:खाचे वातावरण असताना पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’ला भरघोस यश मिळाले. जिल्हा परिषदेत ७३ जागांपैकी ५१ जागा घेत ‘राष्ट्रवादी’ने सत्ता कायम राखली. या निवडणुकांमध्ये प्रचार न करतानाही ‘राष्ट्रवादी’ला सहानुभूती मिळाली. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’ने सत्ता काबीज केली.
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांनी जिल्ह्यातील पक्ष कामकाजाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. जुन्नर, खेड, आंबेगाव आणि मावळ तालुक्यांतील पक्षाच्या नवनिर्वाचित जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांनी शुक्रवारी त्यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांबरोबर विविध विषयांवर चर्चा केली. त्यामध्ये येत्या काही दिवसांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अध्यक्ष, उपाध्यक्षांसह विषय समिती सदस्यांची निवड होणार आहे. त्या बाबतीतही सुनेत्रा पवार यांनी संवाद साधला. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाहिलेले विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले.
जनसंवादाचे नियोजन
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘जनसंवाद’ उपक्रम सुरू केला होता. पुण्यापासून त्यांनी या उपक्रमाला सुरुवात करून नागरिकांशी संवाद साधला. आगामी काळात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पक्ष कार्यात सक्रिय होणार आहेत. त्यादृष्टीने ‘जनसंवाद’साठी ‘राष्ट्रवादी’ने तयारी सुरू केली आहे.
अजित पवार यांचे पुणे जिल्हा हे कार्यक्षेत्र असल्याने त्यांनी पालकमंत्री या भूमिकेतून जनसंवादातून थेट नागरिकांचे प्रश्न सोडविण्यावर भर दिला. या जनसंवादातून राज्यभरातील लाडक्या बहिणींबरोबरच लाडके भाऊ खुश आहेत की नाराज, याचा अंदाज त्यांनी घेतला. या जनसंवादातून लोकांचे पक्षाविषयक अभिप्रायही त्यांनी जाणून घेतले. तसेच नागरिकांच्या तक्रारींचे जागेवरच निवारण केले. त्यांनी ‘जनसंवादा’ला १३ सप्टेंबर २०२५ पासून पुण्यातील हडपसर विधानसभा मतदारसंघापासून आरंभ केला. त्यामध्ये पवार यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेवून अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रश्न मार्गी लावले. त्यामुळे जनसंवादाला भरघोस प्रतिसाद लाभला. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यादेखील जनसंवाद उपक्रम सुरू करणार असल्याचे ‘राष्ट्रवादी’च्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
या जनसंवादातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या नागरिकांशी संपर्क साधणार असल्याने आगामी काळात ‘राष्ट्रवादी पुन्हा’ उभी राहणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

