पुणे : बारामती विधानसभा मतदार संघ हा १९६७ पासून आतापर्यंत पवार कुटुंबीयांच्या ताब्यात राहिला असून, या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासमोर प्रभावी उमेदवार नसल्याने त्या किती मताधिक्य मिळविणार, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. आजवरचा या मतदार संघातील मताधिक्याचा विक्रम दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावावर आहे. ते २०१९ मध्ये एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने विजयी झाले होते. हा विक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मोडणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.

काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी उमेदवारी मागे घेतल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याविरोधात राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचा एकही उमेदवार नाही. नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे सोलापूरमधील आर. वाय घुटूकडे आणि हिंदुस्थान जनता पार्टीचे जत येथील सतीश कदम हे दोन उमेदवार आहेत. उर्वरित २१ अपक्ष उमेदवार आहेत. त्यामध्ये धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे, ‘बिग बॅस’मराठीतील अभिजित बिचुकले आणि बारामतीतील आठ स्थानिक उमेदवार वगळता अन्य उमेदवार हे बारामती बाहेरचे आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मताधिक्य किती असेल, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवारांचा विक्रम कोणता?

ज्येष्ठ नेते शरद पवार हे १९६७ मध्ये पहिल्यांदा या मतदार संघातून निवडून आले. त्यानंतर सलग सहावेळा त्यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्त्व केले. १९९१ मध्ये पहिल्यांदा अजित पवार यांच्याकडे या मतदार संघाचे नेतृत्त्व देण्यात आले. पहिल्याच निवडणुकीत ते ८६ हजारांच्या मताधिक्याने निवडून आले. त्यानतंर सलग आठ निवडणुकांमध्ये अजित पवार यांना बारामतीकरांनी भरभरून मते दिली. त्यापैकी तीन निवडणुकांमध्ये अजित पवार यांनी एक लाखांहून अधिक मतांनी विजय साकारला. २००९ मध्ये पहिल्यांदा अजित पवार हे एक लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी झाले. त्यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार रंजन तावरे यांचा एक लाख दोन हजार ७९७ मतांनी पराभव केला.

त्यानंतर २०१४ च्या निवडणुकीत त्यांचे मताधिक्य घटले होते. तेव्हा त्यांनी ८९ हजार ७९१ मतांनी भाजपचे उमेदवार बाळासाहेब गावडे यांना पराभूत केले होते. १९९१ नंतर पहिल्यांदाच भाजपने या मतदार संघात उमेदवार उभा केला होता. मात्र, भाजपला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर झालेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदार संघात अजित पवार यांनी विक्रम नोंदविला. त्यांनी एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांना चितपट केले. त्यानंतर २०२४ च्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांचा एक लाख ८९९ मतांनी पराभव केला. आता उपमुख्यमंंत्री सुनेत्रा पवार यांचे मताधिक्य किती असेल, अजित पवार यांच्या नावावर असलेला विक्रम त्या मोडणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.