पुणे : बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्या. मात्र, त्यांच्या या विजयाला ‘यांपैकी कोणीही नाही’ (नोटा) या पर्यायाने गालबोल लावले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवार यांच्यात दोन लाख १८ हजार ३४ मतांचा फरक राहिला असताना, तिसऱ्या क्रमांकाची मते ही बारामतीकरांनी ‘नोटा’ला दिली. इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवरील (ईव्हीएम) ‘नोटा’ हे बटण दाबून ७७४ मतदारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह सर्व उमेदवारांना नाकारल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना २ लाख १८ हजार ९६९ मते मिळाली. दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवाराला अवघी ९३५ मते मिळू शकली. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २०१९ मध्ये भाजपचे तत्कालीन उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा एक लाख ६५ हजार २६५ मताधिक्याने पराभव केला होता. बारामतीतील हा मताधिक्याचा विक्रम उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मोडला. मात्र, तिसऱ्या क्रमांकाची मते ही बारामतीकरांनी ‘नोटा’ला दिल्याने या मतदारांनी सर्वच उमेदवारांना नाकारल्याने विक्रमी विजयाला गालबोट लागल्याचे दिसून आले.
या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे यांनी माघार घेतल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह २३ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये प्रमुख राजकीय पक्षाचा एकही उमेदवार नव्हता. नोंदणीकृत राजकीय पक्ष असलेल्या न्यू राष्ट्रीय समाज पार्टीचे सोलापूरमधील आर. वाय घुटूकडे यांना दुसऱ्या क्रमांकाची ९३५ मते मिळाली.
हिंदुस्थान जनता पार्टीचे जत येथील सतीश कदम यांना १७० मते मिळू शकली. उर्वरित २० अपक्ष उमेदवार होते. या सर्व उमेदवारांना नाकारून ७७४ मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय स्वीकारला. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकाची मते ही ‘नोटा’ला मिळाली. अपक्ष उमेदवारांपैकी चौथ्या स्थानावर अपक्ष विराज शिंदे हे राहिले. त्यांना ५३३ मते मिळाली. चंद्रकांत वाघमोडे यांना ४०३ मतदारांनी मतदान केले. ते पाचव्या स्थानावर राहिले.
करुणा मुंडेंना ३०१ मते
आमदार धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे या अपक्ष उमेदवार होत्या. त्यांना २४ व्या फेरीअखेर ३०१ मतदारांनी मतदान केले. तसेच ‘बिग बॉस मराठी’तील अभिजित बिचुकले यांना ३३३ मते मिळाली. ‘नोटा’सह या सर्व उमेदवारांना एकूण ४८६६ मते मिळवता आली. मात्र, सर्वांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.
१९ व्या फेरीत विक्रम मोडीत
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पहिल्या फेरीपासून आघाडीवर होत्या. पहिल्या फेरीत त्यांना ६५०० मते मिळाली. दुसऱ्या फेरीअखेर १६५४३ मते, तिसऱ्या फेरीत २६७७३ मते, पाचव्या फेरीअखेर ४४७९६ मते, सहाव्या फेरीअखेर त्यांनी ५० हजार मतांचा आकडा पार केला. त्यानंतर मताधिक्य वाढत गेले. १९ व्या फेरीत त्यांनी अजित पवार यांचा विक्रम मागे टाकला.
बारामतीचा कारभार ६४ वर्षांनी महिलेच्या हाती
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या विजयी झाल्यानंतर ६४ वर्षांनी बारामतीचा कारभार हा महिलेच्या हाती आला आहे. यापूर्वी १९६२ मध्ये बारामतीतून काँग्रेसच्या मालतीबाई शिरोळे या निवडून आल्या होत्या.
