Deputy CM Sunetra Pawar राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल (शनिवार) महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत.
शनिवारी पहाटे सुनेत्रा पवार या त्यांचा मुलगा पार्थ पवारसह मुंबईतील त्यांच्या पतीचे अधिकृत निवासस्थान असलेल्या ‘देवगिरी’ येथे पोहोचल्या. सुनेत्रा पवार या महाराष्ट्र विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाच्या सदस्य नाहीत. तरीही शनिवारी दुपारी मुंबईत झालेल्या बैठकीत त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. पण, विधिमंडळाचे सदस्य नसताना एखादी व्यक्ती उपमुख्यमंत्री होऊ शकते का? त्याविषयी कायदा काय सांगतो? सविस्तर जाणून घेऊयात…
कायदा काय सांगतो?
कलम १६४(४) : भारतीय संविधानानुसार कोणतीही व्यक्ती राज्याच्या विधिमंडळाची सदस्य नसतानाही मंत्री (उपमुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री) म्हणून नियुक्त होऊ शकते. मात्र, हे पद टिकवून ठेवण्यासाठी, शपथ घेतल्यापासून सलग सहा महिन्यांच्या आत त्या व्यक्तीला विधानसभा किंवा विधान परिषदेचे सदस्य होणे अनिवार्य असते. जर ते या कालावधीत सदस्य झाले नाहीत, तर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागतो.
अनेक बड्या नेत्यांची उदाहरणे
भारतात याआधीही अनेक नेते आमदार नसतानाही मंत्री झाले आहेत. सुनेत्रा पवार यांच्याबाबतही तोच मार्ग वापरला जात आहे. अनेक बड्या नेत्यांनी सुरुवातीला विधिमंडळाचे सदस्य नसतानाही पदभार स्वीकारला होता :
- उद्धव ठाकरे (महाराष्ट्र) : २०१९ मध्ये त्यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली तेव्हा ते आमदार किंवा विधान परिषद सदस्य नव्हते. नंतर त्यांची विधान परिषदेवर निवड झाली.
- योगी आदित्यनाथ (उत्तर प्रदेश) : योगी आदित्यनाथ २०१७ मध्ये मुख्यमंत्री झाले तेव्हा ते खासदार होते. त्यानंतर ते विधान परिषदेचे सदस्य झाले.
- ममता बॅनर्जी (पश्चिम बंगाल) : २०११ मध्ये पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्या तेव्हा त्या खासदार होत्या.
- दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्य (उत्तर प्रदेश): २०१७ मध्ये या दोघांची उपमुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली तेव्हा ते सुरुवातीला विधिमंडळाचे सदस्य नव्हते.
- पृथ्वीराज चव्हाण (महाराष्ट्र) : मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती झाली तेव्हा ते केंद्रीय मंत्री होते. त्यानंतर त्यांनी पोटनिवडणूक जिंकून आमदारकी मिळवली.
सुनेत्रा पवारांसाठी पुढील मार्ग काय?
पक्षाचा एखादा विद्यमान आमदार आपल्या जागेचा राजीनामा देऊ शकतो, ज्यामुळे सुनेत्रा पवार त्या मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवू शकतील. अजित पवारांचे प्रतिनिधित्व असलेली बारामतीची जागा सध्या रिक्त आहे. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, त्यांची राज्यसभेची जागा त्यांचे पुत्र पार्थ यांना दिली जाऊ शकते.
सुनेत्रा पवार यांचा प्रवास
१८ ऑक्टोबर १९६३ रोजी महाराष्ट्रातील तेर (उस्मानाबाद/धाराशीव) येथे जन्मलेल्या सुनेत्रा पवार राजकीय वारसा असलेल्या कुटुंबातील आहेत. त्यांचे वडील बाजीराव पाटील हे ज्येष्ठ प्रादेशिक नेते होते आणि त्यांचे बंधू पद्मसिंह बाजीराव पाटील हे प्रभावशाली राजकारणी राहिले आहेत. त्यांनी औरंगाबादच्या एस.बी. कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी (बी. कॉम.) पूर्ण केली. १९८५ मध्ये त्यांचा विवाह अजित पवार यांच्याशी झाला.
सुनेत्रा पवार यांनी एक सामाजिक कार्यकर्त्या व पर्यावरणवादी म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांनी ‘एन्व्हायर्न्मेंटल फोरम ऑफ इंडिया’ची स्थापना केली असून, त्याद्वारे इको-व्हिलेज आणि शाश्वत विकासावर लक्ष केंद्रित केले जाते. त्यांनी बारामती हाय-टेक टेक्स्टाईल पार्कचे अध्यक्षपद भूषवले आहे. तसेच, त्या विद्या प्रतिष्ठानच्या विश्वस्त व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य म्हणूनही कार्यरत आहेत.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सुनेत्रा पवार राजकारणात फारशा सक्रिय नव्हत्या. त्या वर्षीच्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी बारामतीतून निवडणूक लढवली. परंतु, या प्रतिष्ठेच्या लढाईत नणंद आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली.
उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सुनेत्रा पवार काय म्हणाल्या?
सुनेत्रा पवार यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले, “आदरणीय अजितदादांनी आयुष्यभर शेतकरी, कष्टकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी जगण्याचा मंत्र दिला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेताना ‘शिव-शाहू-फुले-आंबेडकर’ यांच्या विचारांवर निष्ठा ठेवून कर्तव्यभावनेने ही जबाबदारी स्वीकारत आहे.”
त्या म्हणाल्या, “दादांच्या अकाली जाण्यानं वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या मनावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मात्र, त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रतिची प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे. त्यांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी अखंड प्रामाणिकपणे, पारदर्शकतेनं आणि लोकाभिमुखतेनं काम करीत राहीन.”

