Sunetra Pawar Deputy CM राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल (शनिवार) महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका कार्यक्रमात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महायुतीकडून त्यांना उपमुख्यमंत्रिपद देण्यात आले आहे. सुनेत्रा पवारांसमोर ही नवीन मोठी जबाबदारी आहे. मुख्य म्हणजे ही जबाबदारी सांभाळत असताना त्यांना मोठ्या आव्हानांचादेखील सामना करावा लागणार आहे.

शनिवारी राष्ट्रवादी विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवड झाल्यानंतर सुनेत्रा पवार आता अजित पवारांच्या जागी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळण्यासाठी सज्ज आहेत. २०२४ पासून राज्यसभा खासदार असलेल्या सुनेत्रा पवार यांनी अलीकडेच सक्रिय राजकारणात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाच्या नेतृत्वाखालील युती सरकारचा भाग आहे आणि पक्ष अजूनही विभागलेला आहे. अशात त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत.

मित्रपक्षांबरोबरचे संबंध

सरकारमध्ये सुनेत्रा पवारांना सत्ताधारी आघाडीत राष्ट्रवादीचे स्थान सुरक्षित ठेवावे लागेल. अजित पवारांचे महत्त्वाच्या मंत्रालयांवर थेट नियंत्रण होते आणि ते भाजपाबरोबरचे पक्षाचे मुख्य वाटाघाटीकार म्हणून काम पाहत असत. सुनेत्रा पवारांना राजकारण, प्रशासकीय कामे, प्रशासन किंवा राजकीय वाटाघाटी यांचा अद्याप अनुभव नाही. पक्षाची मंत्रालयातील ताकद कमी होऊ नये आणि राष्ट्रवादीच्या आमदारांना युतीत समान भागीदार म्हणून वागणूक मिळत राहील याची खात्री करण्यासाठी त्यांच्यावर तत्काळ दबाव असेल. मंत्रिमंडळातील कोणताही फेरबदल किंवा खात्यांची अदलाबदल झाल्यास वरिष्ठ भाजपा नेत्यांशी वाटाघाटी करण्याची त्यांची क्षमता पाहिली जाईल आणि त्याकडे सर्वांचे लक्ष असेल.

भाजपा नेत्यांशी असणारे समीकरण

अजित पवारांचे वरिष्ठ भाजपा नेत्यांशी कामाचे थेट समीकरण होते. ते दोन्ही पक्षांमधील मुख्य दुवा मानले जात होते. त्यांची आमदारांवरील पकड, राजकारणातील त्यांचा दबदबा यांमुळे ते खाती, प्रकल्पांचा निधी व धोरणात्मक निर्णय यांवर ठामपणे वाटाघाटी करू शकत होते. सुनेत्रा पवारांकडे वाटाघाटींचा असा कोणताही अनुभव नाही. त्यांच्याकडे प्रशासकीय कामाचा, शैलीचा अभाव आहे, अशी धारणा निर्माण झाल्यास मंत्रिमंडळाचे निर्णय आणि धोरणात्मक बाबी यांमध्ये राष्ट्रवादीचा प्रभाव कमी होऊ शकतो.

पक्षाच्या अंतर्गत अशीही भीती व्यक्त केली जात आहे की, भाजपा पक्ष नेतृत्वाऐवजी वैयक्तिक मंत्र्यांशी व्यवहार करण्यास प्राधान्य देऊ शकतो आणि त्यामुळेच राष्ट्रवादीची सामूहिक स्थिती कमकुवत होण्याची शक्यता आहे. काही नेत्यांचे म्हणणे आहे की, सुनेत्रा पवारांना हे सुनिश्चित करावे लागेल की पक्षावर परिणाम करणारे निर्णय त्यांच्या कार्यालयामार्फतच घेतले जातील. युतीला अस्थिर करणारा संघर्ष टाळणे, हे त्यांच्यासमोरील सर्वांत मोठे राजकीय आव्हान मानले जात आहे.

राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते

पक्षामध्ये सुनेत्रा पवारांना अशा नेत्यांना सांभाळावे लागेल, ज्यांचा स्वतःचा जनाधार आहे आणि ज्यांची राजकीय कारकीर्द मोठी आहे. राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल, राज्यमंत्री छगन भुजबळ, रायगडचे लोकसभा खासदार सुनील तटकरे आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांसारख्या नेत्यांचा विविध क्षेत्रांत आणि संघटनात्मक स्तरावर मोठा प्रभाव आहे. फुटीनंतर अजित पवारांबरोबर आलेले अनेक नेते प्रामुख्याने सत्तेत राहण्यासाठी आले होते. आता नेतृत्वात बदल झाल्यामुळे निष्ठा आणि नियंत्रणाचे प्रश्न पुन्हा उपस्थित होऊ शकतात. मुख्य म्हणजे जर निर्णय सामूहिकपणे घेतले जाऊ लागले, तर याचा अधिक परिणाम दिसून येईल.

प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे व छगन भुजबळ यांसारखे वरिष्ठ नेते सुनेत्रा पवार किंवा त्यांचे पुत्र पार्थ आणि जय यांचे मार्गदर्शन स्वीकारतील का, हा मोठा प्रश्न आहे. अजित पवार यांची दोन्ही मुले सध्या राजकारणात आपला पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहेत. पार्थ यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला होता; तर जय पवार अजूनही राजकारणात पूर्णपणे सक्रिय नाहीत.

शरद पवार फॅक्टर

दुसरे आव्हान म्हणजे शरद पवार आणि शरद पवार गटाशी असलेले संबंध हाताळणे. विलीनीकरणाचे प्रयत्न पुन्हा सुरू झाले, तर सुनेत्रा पवारांसाठी ते मोठे आव्हान असेल. जर पक्षाचे विलीनीकरण झाले, तर शरद पवार आणि त्यांची कन्या सुप्रिया सुळे अपरिहार्यपणे महत्त्वाच्या पदांवर असतील. अजित पवार गटाशी संबंधित नेत्यांना अशी भीती आहे की, विलीनीकरणामुळे त्यांचा प्रभाव कमी होऊ शकतो आणि २०२३ च्या फुटीपूर्वीचे अंतर्गत मतभेद पुन्हा निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांना एकाच पक्षाच्या दोन प्रतिस्पर्धी गटांमध्ये संतुलन साधावे लागेल.

विलीनीकरणाची चर्चा

शनिवारी शरद पवारांनी संभाव्य राष्ट्रवादी विलीनीकरणावर आपले मौन सोडले. ते म्हणाले, “गेल्या चार महिन्यांपासून अजित पवार, जयंत पाटील व शशिकांत शिंदे विलीनीकरणाच्या चर्चेत सहभागी होते. आता एक दुर्दैवी घटना घडली आहे. असे दिसते की, ही प्रक्रिया आता थांबेल.” शरद पवारांची कार्यपद्धती आणि राजकीय रणनीतीवरील मतभेद यांमुळे राष्ट्रवादीत फूट पडली,असे सांगण्यात आले होते. आता शरद पवार पुन्हा मध्यवर्ती भूमिकेत आल्यामुळे अजित पवारांबरोबर असलेल्या नेत्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. त्यामुळे त्या सगळ्यांना एकत्र ठेवणे हे सुनेत्रा पवारांसमोर आव्हान असेल.