आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा दावा वर्धा येथील एका वकिलाने राज्यपालांना लिहिलेल्या पत्रातून केला… भाजपा व शिंदे गटात टोकाचा वाद रंगला असून मुख्यमंत्री फडणवीसांवर टीका करणाऱ्या आमदाराचा गोपीचंद पडळकरांनी समाचार घेतला… पंतप्रधान मोदींनी २०२७ च्या जनगणनेत ओबीसींची माहिती घेतली जाणार असल्याची घोषणा करून समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या माजी आमदाराने केला… नाशिकमध्ये शिंदे गट आणि भाजपाच्या युतीची शक्यता चर्चेत असतानाच अचानक मनसे व शिंदेसेनेत आघाडी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली… आमदार अमोल मिटकरी यांच्यानंतर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनीही दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
सुनेत्रा पवारांचा शपथविधी बेकायदेशीर?
अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना गोपनियतेची शपथ दिली. यादरम्यान सुनेत्रा पवार यांचा शपथविधी बेकायदेशीर असल्याचा दावा वर्धा येथील वकील हर्षवर्धन शोभा बाबाराव गोडघाटे यांनी केला आहे. त्यासंदर्भात राज्यपालांना पत्र लिहून त्यांनी काही नियमांचा दाखलाही दिला आहे. सुनेत्रा पवार यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ द्यावी, अशी मागणीही त्यांनी पत्रातून केवी आहे. त्यामुळे आता राज्यपाल नेमकी काय भूमिका घेणार? सुनेत्रा पवार यांना पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घ्यावी लागणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भाजपा-शिंदे गटात टोकाचे वाद
राज्यात जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांची धामधुम सुरू असताना सत्ताधारी महायुतीतील भाजपा व शिंदे गटातील नेत्यांमध्ये वाद उफाळून आला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर पळशी येथील जाहीर सभेतून शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान देणारे वक्तव्य केले होते. आमच्यासारखे २४३ आमदार असल्यामुळेच फडणवीस मुख्यमंत्री असल्याचे बाबर म्हणाले होते. इतक्यावरच न थांबता भाजपासह सगळे पक्ष आपणच चालवतो, असे विधानदेखील त्यांनी केले. त्यांच्या या विधानाचा भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी चांगलाच समाचार घेतला. सात वर्षांपूर्वी तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच राजकारणात आला. मुख्यमंत्र्यांवर टीका करण्याची तुमची पात्रता आहे का, असा प्रश्न पडळकर यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्या या टीकेला आता आमदार बाबर कसे प्रत्युत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा : राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींना कसे लक्ष्य केले? काँग्रेसची नेमकी रणनीती काय?
माजी आमदाराचा भाजपावर आरोप
पंतप्रधान मोदींनी २०२७ च्या जनगणनेत ओबीसींची माहिती घेतली जाणार असल्याची घोषणा करून समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे भंडाऱ्याचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांनी केला. प्रत्यक्षात केंद्र सरकारने तयार केलेल्या जनगणनेच्या अधिकृत फॉरमॅटमध्ये इतर मागासवर्गीय समाजासाठी स्वतंत्र रकानाच नसल्याने भाजपाचा खोटेपणा आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न उघडा पडल्याची टीकाही त्यांनी केली. काही दिवसांपूर्वी भाजपाने ओबीसींची जनगणना होणार म्हणून स्वतःचेच अभिनंदन करून घेत मोठा गाजावाजा केला. मात्र, जनगणना संचालनालयाने जारी केलेल्या ३१ प्रश्नांच्या यादीत कुठेही ओबीसींचा उल्लेख नसल्याचे वाघमारे यांनी म्हटले आहे. प्रश्न क्रमांक १३ मध्ये केवळ अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती असेच पर्याय असल्याने जो समाज या दोन्हीत बसत नाही त्याला सरळ ‘इतर’ मध्ये ढकलले जाणार आहे. मग ओबीसींची स्वतंत्र संख्या कशी कळणार? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
नाशिकमध्ये शिंदे गट आणि मनसेत युती
नाशिकमध्ये शिंदे गट आणि भाजपाच्या युतीची शक्यता चर्चेत असतानाच अचानक मनसे व शिंदेसेनेत आघाडी झाल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या नव्या युतीचे शिवसेना–मनसे आघाडी असे नामकरण करण्यात आले आहे. नाशिक महानगरपालिकेत मनसेच्या एकमेव नगरसेविका मयुरी पवार यांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्थायी समितीसह विविध समित्यांमधील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता असल्याने भाजपाची डोकेदुखी वाढणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेसोबत निवडणूक लढवलेल्या पवार सत्तास्थापनेपूर्वी शिंदे गटात गेल्याने नाशिकच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. भाजपाने मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत स्वबळावर बहुमत मिळवले आहे. मंगळवारी महाजन यांनी महापौर पदासाठी हिमगौरी आहेर-आडके आणि उपमहापौरपदासाठी मच्छिंद्र सानप यांची नावे जाहीर केली आहे. त्यामुळे शिंदे गटाला विरोधात बसावे लागणार आहे.
विमान अपघातावर शिंदे गटाच्या नेत्याचा संशय
आमदार अमोल मिटकरी यांच्यानंतर शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनीही दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर संशय व्यक्त केला आहे. २९ जानेवारी रोजी अजित पवार यांच्या विमानाचा बारामती येथे अपघात झाला होता. या अपघातात एकूण पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथामिक माहिती आहे. यादरम्यान अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी सर्वात आधी या विमान अपघातावर संशय व्यक्त केला. त्यांनी या विमान अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे. अमोल मिटकरी यांच्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनीदेखील या अपघातावर संशय व्यक्त केला आहे. अपघात सरळ दिसतोय; पण त्यांच्या लोकांनीच जर संशय घ्यायला सुरुवात केल्यास काहीतरी पाणी मुरतंय का हे बघावे लागेल, असे भरत गोगावले यांनी म्हटले आहे. याआधी मंत्री छगन भुजबळ यांनीही अपघातावर संशय व्यक्त केला होता. विमानाने दुसऱ्यांना घिरटी मारली आणि त्यानंतर ते अचानक तिरपे कसे झाले? असे भुजबळ म्हणाले होते.

