पुणे : अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्यासाठी ५०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना अजित पवार यांच्या आश्वासनाची पूर्ती करण्याचे महत्त्वाचे काम करावे लागणार आहे.
उपमुख्यमंत्री पदावर असताना अजित पवार यांनी बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून स्वत:चे नाव जाहीर करून निवडणूक लढविली आणि सत्ता काबीज केल्याने माळेगावची निवडणूक राज्यात चर्चेची ठरली. अजित पवार यांनी या कारखान्याच्या प्रचारसभेमध्ये बोलताना पॅनेल निवडून आले, तर माळेगावला ५०० कोटी रुपये देण्याचे जाहीर केले होते. ‘तुम्ही मला खुश करा, मी तुम्हाला खुश करतो’ असे वक्तव्य अजित पवार यांनी केले होते.
या कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचेही आश्वासन अजित पवार यांनी दिले होते. उपमुख्यंमत्री सुनेत्रा पवार यांना आता माळेगावकरांना खुश करण्यासाठी ५०० कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबरच अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर द्यावा लागणार आहे. या कारखान्याला देशातील क्रमांक एकचा कारखाना करण्याचे अजित पवार यांचे स्वप्न होते. या स्वप्नपूर्तीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना प्रयत्न करावे लागणार आहेत.
बारामतीच्या राजकारणाला दिशा देणारा कारखाना
बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामतीतील महत्त्वाचा कारखाना समजला जातो. राजकीय क्षेत्रांतील व्यक्तींना राजकारणाची दिशा देणारा हा कारखाना ठरला आहे. हा कारखाना आतापर्यंत ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या ताब्यात होता. अजित पवार यांनी हा कारखाना ताब्यात घेऊन निवडणूक प्रतिष्ठेची केली. अजित पवार हे अध्यक्षपदाचे उमेदवार होतेे. अजित पवार यांनी निळकंठेश्वर पॅनल उभे केले, तर त्यांच्याविरोधात ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे सहकार बचाव पॅनल होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बळीराजा पॅनेल होते. या पॅनेलचे नेतृत्त्व युवा नेते युगेंद्र पवार यांनी केले. अजित पवार यांच्या पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकून कारखाना ताब्यात घेतला. चंद्रराव तावरे वगळता सर्व उमेदवार हे निळकंठेश्वर पॅनेलचे निवडून आले. आता अजित पवार यांच्या निधनाने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची कारखान्याच्या अध्यक्षपदी बिनविरोध झाली आहे.
दरम्यान, नगरपालिका आणि पंचायत समितीच्या निवडणुकांपासून राजकीय समीकरणे बदलले आहेत. भाजपचे नेते रंजन तावरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाशी मैत्री केली आहे.
