पुणे : ‘राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडील अर्थ खाते गेले असले, तरी राज्याची विकासकामे थांबलेली नाहीत. लवकरच अर्थ खाते आपल्याला परत मिळेल,’ असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे युवा नेते जय पवार यांनी केल्याने राज्याचे अर्थ खाते पुन्हा चर्चेत आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना हे खाते दिले जाणार का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

बारामती येथे पंचायत समितीचे सभापती किरण तावरे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आजी-माजी सदस्यांचा कृतज्ञता मेळावा आयोजित केला होता. त्या कार्यक्रमात जय पवार यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडील अर्थ खाते गेले असले, तरी विकासकामे थांबलेली नाहीत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यात चर्चा झाली असून, लवकरच अर्थ खाते आपल्याला मिळेल,’ असे वक्तव्य केले. त्यानंतर अर्थ खाते ‘राष्ट्रवादी’कडे पुन्हा कधी दिले जाणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले. त्यानंतर राज्याचा अर्थसंकल्प हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला. अजित पवार यांच्यानंतर महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला प्रतिनिधित्व देण्यासाठी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले. मात्र, अर्थ खाते अद्याप सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेले नाही. या पार्श्वभूमीवर जय पवार यांनी ‘अर्थ खाते लवकरच मिळेल,’ असे स्पष्ट केल्याने हे खाते पुन्हा चर्चेत आले आहे.

अजित पवार आणि अर्थखाते

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे २०१० ते २०२६ या काळात सत्तेत असताना बहुतांश त्यांच्याकडेच अर्थ खाते राहिले. २०१० ते २०१४ या काळात महाविकास आघाडीचे सरकार होेते. तेव्हा नोव्हेंबर २०१० ते सप्टेंबर २०१४ या कालावधीत अजित पवार यांच्याकडे हे खाते होते. २०२० ते २०२२ या कालावधीत शिवसेना (ठाकरे), तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार यांनी हे खाते सांभाळले. जुलै २०२३ मध्ये अजित पवार हे समर्थक आमदारांसह भाजप-शिवसेना (शिंदे) महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतर अर्थ खाते हे त्यांच्याकडे आले. हे खाते शेवटपर्यंत अजित पवार यांच्याकडेच राहिले. आता जय पवार यांच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे हे खाते देणार का, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.