पुणे : उपमुख्यमंत्री पदावर असताना अजित पवार यांनी बारामतीतील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून स्वत:चे नाव जाहीर करून निवडणूक लढविली आणि सत्ता काबीज केल्याने माळेगावची निवडणूक राज्यात चर्चेची ठरली. आता अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची रिक्त झालेल्या जागेवर संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यामुळे अजित पवार यांच्यानंतर सुनेत्रा पवार या माळेगाव कारखान्याचे अध्यक्षपद घेऊन सुत्रे हाती घेणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
माळेगाव सहकारी साखर कारखाना हा बारामतीतील महत्त्वाचा कारखाना समजला जातो. शेतकऱ्यांच्यादृष्टीने आर्थिक उन्नतीचा मार्ग, तर राजकीय क्षेत्रांतील व्यक्तींना राजकारणाची दिशा देणारा हा कारखाना ठरत आला आहे. त्यामुळे या कारखान्यातील हालचालींकडे बारामतीतील नागरिकांचेही लक्ष असते. गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे यांच्या ताब्यात हा कारखाना होता. अजित पवार यांनी यावेळची निवडणूक ही प्रतिष्ठेची केली. अजित पवार हे अध्यक्षपदाचे उमेदवार असल्याने निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
अजित पवार यांनी निळकंठेश्वर पॅनल उभे केले, तर त्यांच्याविरोधात ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे आणि रंजन तावरे यांचे सहकार बचाव पॅनल होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे बळीराजा पॅनेल होते. या पॅनेलचे नेतृत्त्व युवा नेते युगेंद्र पवार यांनी केले. मात्र, अजित पवार यांच्या पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकून कारखाना ताब्यात घेतला. चंद्रराव तावरे वगळता सर्व उमेदवार हे निळकंठेश्वर पॅनेलचे निवडून आले. आता अजित पवार यांच्या निधनाने त्यांच्या जागी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची बिनविरोध नियुक्ती झाली आहे.
राजकीय समीकरणांमध्ये बदल
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आणि भाजप नेते रंजन तावरे यांंच्यात कटुता निर्माण झाली. मात्र, नगर परिषदेच्या निवडणुकीत ही कटुता दूर होऊन त्यांच्यात मैत्री झाली. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि रंजन तावरे यांची जनमत विकास आघाडी यांच्यात युती झाली. माळेगाव बुद्रुक येथे पहिली प्रचार सभा घेऊन अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील १४ नगर परिषदा आणि तीन नगर पंचायतींच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यामुळे माळेगावमधील राजकीय समीकरणे आता बदलली आहेत.
रंजन तावरे यांनी अजित पवारांच्या ‘राष्ट्रवादी’शी मैत्री केल्याने विरोधक शिल्लक राहिला नसल्याचे चित्र आहे. अशा राजकीय परिस्थितीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या अध्यक्षपदाची जबाबदारी घेणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. संचालक मंडळाने त्यांनीच अध्यक्ष पदाची जबाबदारी घेण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री पदानंतर सुनेत्रा पवार या माळेगाव कारखान्याची सुत्रे हाती घेणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

