पुणे : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय पदधिकाऱ्यांच्या यादीतून पुणे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना वगळले आहे. वळसे पाटील आणि पुणे शहरातील ‘राष्ट्रवादी’चे एकमेव आमदार चेतन तुपे या दोघांना आता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे. मात्र, अन्य कोणत्याही नेत्यांना ‘राष्ट्रीय’स्तरावर स्थान न मिळाल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ‘राष्ट्रवादी’च्या पुणे जिल्हा या बालेकिल्ल्याकडेच दुर्लक्ष केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी २९ एप्रिल रोजी निवडणूक आयोगाला दिलेल्या पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारी आणि राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीमध्ये पुणे जिल्ह्याला फारसे स्थान देण्यात आलेले नाही. ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. वळसे पाटील हे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे विश्वासू साथीदार होते. मात्र, तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेस दुभंगल्यानंतर वळसे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना साथ दिली. मात्र, आता ते ‘राष्ट्रवादी’चे पदाधिकारी राहिले नसून, केवळ कार्यकारिणीत त्यांना स्थान देण्यात आले आहे.
पुणे शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे एकमेव आमदार चेतन तुपे यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत समावेश आहे. मात्र, अन्य कोणत्याही नेत्यांना स्थान मिळाले नसल्याचे पुणे जिल्ह्यातील ‘राष्ट्रवादी’त सध्या नाराजी पसरली आहे.
बारामतीतील कोणालाही संधी नाही
पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकारी किंवा कार्यकारिणीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी त्यांच्या बारामती विधानसभा मतदार संघातील एकाही नेत्याला संधी दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याऐवजी अध्यक्षपदी त्या स्वत: तसेच सरचिटणीसपदी पार्थ पवार आणि सचिवपदी जय पवार यांचा समावेश करण्यात आला आहे. एकाच कुटुंबात तीन महत्त्वाची पदे देण्यात आल्यानेही ‘राष्ट्रवादी’मधून नाराजीचे सूर उमटू लागले आहेत.
पुणे जिल्हा कायम ‘राष्ट्रवादी’च्या पाठीशी
पुणे जिल्हा हा कायम राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या पाठीशी राहिला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, नगर परिषद, नगर पंचायत, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये ‘राष्ट्रवादी’ला यश मिळाले. त्यासाठी जिल्ह्यातील नेत्यांनी प्रयत्न केले. मात्र, जिल्ह्यातील एकाही नेत्याला ‘राष्ट्रीय’ स्थान देण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
