पुणे : राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांच्या हाती पक्षाची सूत्रे आली आहेत. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्यादृष्टीने महत्त्वाचा असून, या जिल्ह्याची जबाबदारी ही कोणाच्या हाती सोपविणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदानंतर नियुक्ती जाहीर झाल्याने त्या आता पक्षाच्या सर्वेसर्वा झाल्या आहेत. पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्यादृष्टीने महत्त्वाचा मानला जातो. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या पक्षाने ७३ पैकी ५१ जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या दोन्ही ‘राष्ट्रवादी’ने एकत्रपणे लढविल्या होत्या. मात्र, जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाला देण्याचा पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे. त्यामुळे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि विविध समित्यांच्या अध्यक्षपदांसाठी इच्छुकांनी नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. ही सर्व प्रमुख पदे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे घेण्याची भूमिका पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून घेण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष, पंचायत समिती सभापती आणि उपसभापतींच्या नियुक्त्या या २० मार्चपूर्वी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी आपली या पदावर वर्णी लागण्यासाठी भेटी सुरू केल्या आहेत. मात्र, याबाबतच अंतिम निर्णय हा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या घेणार आहेत. त्यामुळे त्या जिल्ह्याचा कारभार कोणाच्या हाती सोपविणार, याबाबत उत्सुकता असणार आहे.
आमदारांचे कुटुंबातील दुसऱ्या पिढीसाठी प्रयत्न
जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत जिल्ह्यातील आजी-माजी आमदारांच्या कुटुंबातील सदस्य निवडून आले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षपदावर त्यांची वर्णी लावून दुसऱ्या पिढीला राजकारणात स्थिरस्थावर करण्यासाठी ‘माननीयां’नी प्रयत्न सुरू केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे या सलग दुसऱ्यांना निवडणुकीच्या रिंगणात होत्या. त्या जिल्हा परिषदेच्या इंदापूर तालुक्यातील बावडा गटातून उभ्या होत्या. त्या गेल्या निवडणुकीतून त्या मतदार संघातून निवडून आल्या होत्या. अंकिता यांचा विवाह शिवसेना (ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे बंधू बिंदुमाधव ठाकरे यांचे चिरंजीव निहार ठाकरे यांच्याशी झाला आहे. त्या पुन्हा या मतदार संघातून निवडून आल्या आहेत.
वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार बापू पठारे यांच्या दोन कन्या दीपाली गव्हाणे, रुपाली झेंडे या निवडून आल्या आहेत. गव्हाणे या शिरूरमधून, तर झेंडे या पुरंदर तालुक्यातून निवडून आल्या आहेत. माजी आमदार विलास लांडे यांची कन्या विनया मुंगसे या खेडमधून विजयी झाल्या.
शिरुरचे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे माजी आमदार पोपटराव गावडे यांचे चिरंजीव आणि बाजार समितीचे माजी संचालक राजेंद्र गावडे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून जिल्हा परिषदेच्या टाकळी हाजी गटातून विजयी झाले. माजी आमदार रमेश थोरात यांचे चिरंजीव तुषार थोरात, माजी आमदार काशीनाथ खुटवड यांचे चिरंजीव विक्रम खुटवड हे विजयी झाले आहेत.
राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे चिरंजीव श्रीराज भरणे हे पहिल्यांदाच निवडणुकीत उभे होते. मात्र, ते इंदापूर तालुक्यातील बोरी पंचायत समितीत निवडून आले आहेत.

