मुंबई : उपमुख्यमंत्रीपदानंतर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या (अजित पवार) राष्ट्रीय अध्यक्षपदी येत्या १५ दिवसांत निवड केली जाईल, असे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी शुक्रवारी जाहीर केले. दुसरीकडे, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून सुनील तटकरे आणि शशिकांत शिंदे या दोन्ही गटांच्या प्रदेशाध्यक्षांमध्ये जुंपली आहे.

अजित पवार यांच्या पश्चात पक्षाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड होणार याची उत्सुकता होती. प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची चर्चा होती, पण त्यांनी इन्कार केला होता. दोनच दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या वेळी पक्षाची भविष्यातील वाटचाल आणि दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर चर्चा झाल्याचे समजते. या भेटीनंतर राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीच निवड होणार हे आता निश्चित झाले आहे.

सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी येत्या १५ दिवसांत निवड केली जाईल, असे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले. या संदर्भातील सर्व कायेदशीर प्रक्रिया पूर्ण करूनच निवड केली जाईल. सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी सर्व नेतेमंडळी ठाम उभी राहणार असून, पक्ष बळकट करण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी भाजपनंतर दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. लोकांचा विश्वास संपादन करून पक्ष अधिकाधिक वाढविण्याचा आमचा प्रयत्न राहिल, असे पटेल यांनी स्पष्ट केले.

शिंदे यांचा दावा, तटकरे यांचे प्रत्युत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात येणार होते. विलिनीकरण १२ फेब्रुवारी रोजी होणार होते. अदृश्य शक्तीच्या कारवाया, धमक्या व खोटे नाटे आरोप, कारस्थान करून केलेल्या आरोपांमळे अजित पवार यांना राष्ट्रवादीतून बाहेर पडून वेगळा गट स्थापन करावा लागला होता. अजित पवार यांना झालेली चूक दुरूस्त करायची होती. या विचाराने दादा मागील चार – पाच महिन्यांपासून कामाला लागले होते, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी पक्षाच्या मासिकातील लेखातून केला आहे. यामुळे दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

शिंदे यांच्या लेखातील काही वाक्यांवर सुनील तटकरे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर लेखी स्वरूपात किंवा तोंडी स्वरुपात असे आरोप करू नयेत. असे लिहण्यामागील त्यांचा हेतू काही मला कळू शकला नाही. भाजपबरोबरआपण असले पाहिजे, ही अजित पवार यांची भूमिका अनेक वर्षांपासूनची होती. २०१४ साली देखील तीच भूमिका होती. २०१६ – १७ मध्ये देखील होती, ज्याचा उल्लेख मी वारंवार केला आहे. त्यावेळी देखील चर्चा अंतिम टप्प्यात गेली होती.

२०१९ मध्ये अजित पवार यांनी स्वच्छपणे सांगितलं होते की,भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरकार स्थिर राहू शकते, केंद्रातून आपल्याला पूर्णपणे मदत होऊ शकेल. अजित पवार यांनी आपली इच्छा कधीही लपवून ठेवलेली नव्हती, असेही तटकरे यांनी म्हटले आहे. भाजपबरोबर जाण्याचा निर्णय पक्षातील सर्व नेतेमंडळींनी एकत्र बसून घेतला होता. यामुळे आम्ही आजही भाजपबरोबर आहोत व भविष्यातही भाजपबरोबर असू, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

कायदेशीर पेच

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनकरणावर कायदेशीर पेच आडवा येत असल्याचे अजित पवार गटाच्या नेत्यांचे म्हणणे आहे. अजित पवार व अन्य आमदारांच्या विरोधात शरद पवार गटाने पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरविण्यासाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या याचिकेचे भवितव्य काय, ही याचिका शरद पवार गट मागे घेणार का, अशा अनेक प्रश्नांची तड लावावी लागेल, असेही सांगण्यात आले.