राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षांचे विलीनीकरण होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते सुनील तटकरे यांनी अजित पवार यांच्या निधनानंतर विलीनीकरणाची चर्चा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने थांबवली, तसेच याबाबतचा चेंडू त्यांच्याच कोर्टात असल्याचे संकेत दिले आहेत. तटकरे यांनी गुरूवारी (१६ जुलै) पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली.
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याशी बुधवारी बैठक झाल्यानंतर सुनील तटकरे यांचे वक्तव्य समोर आले आहे. सुनील तटकरे व राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली होती. या भेटीबाबत मला माहिती का देण्यात आली नाही, अशी विचारणा सुनेत्रा पवार यांनी तटकरेंना केली. या भेटीमुळेच विलीनीकरणाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २०२३ मध्ये फूट पडली होती. बहुसंख्य आमदारांना घेऊन अजित पवार हे महायुतीत सहभागी होऊन सत्तेत सामील झाले होते. दरम्यान, जानेवारीत त्यांचे विमान अपघातात निधन झाल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा सुरू झाल्या. या चर्चांमुळे सुनेत्रा पवार यांच्यासमोर एक आव्हान निर्माण झाले.
तटकरे काय म्हणाले?
“अजित पवार असताना दोन्ही पक्षांच्या विलीनीकरणाबाबत चर्चा झाल्या होत्या. त्यांनी (अजित पवारांनी) घेतलेल्या विलीनीकरणाच्या निर्णयाला आम्ही समर्थन दिले असते. पण, त्यांच्या निधनानंतर चर्चा थांबल्या. त्यांच्या (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार) नेत्यांनी राज्य पातळीवरील एका कार्यक्रमात विलीनीकरणाचा मुद्दा आता संपला आहे, असे घोषित केले. जर चर्चा पुन्हा सुरू झाली तर आम्ही आमचे मत मांडू”, असे तटकरे यांनी म्हटले आहे. विलीनीकरणाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू करण्याचा चेंडू शरद पवार यांच्या कोर्टात असल्याचे संकेत तटकरे यांनी दिले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते सुनील तटकरे यांनी विलीनकरणाबाबत चर्चा सुरू होती, हे सार्वजनिकरित्या कबूल केले आहे. अजित पवार हे विलीनीकरणाच्या दिशेने पाऊलं उचलत होते, असे स्पष्ट संकेत तटकरेंनी दिले आहेत. अजित पवार यांच्या निधनाच्या दुसऱ्याच दिवशी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने एक वृत्त प्रकाशित केले होते. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या विलीनीकरणाची घोषणा ८ फेब्रुवारी रोजी होणार होती, परंतु, त्याआधीच विमान अपघातात अजित दादांचे दुर्दैवी निधन झाले, असे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने प्रकाशित केले होते. विलीनीकरणाची चर्चा अंतिम टप्प्यावर पोहोचली होती, दोन्ही पक्ष त्याची तयारी करत होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर अधिकृतपणे विलीनीकरण होणार होते, असे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिले होते.
“जयंत पाटलांना भेटलो नाही”
वर्षा बंगल्यावरील मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेवर तटकरे म्हणाले, “आमच्या मतदारसंघातील कामांबाबत चर्चा करण्यासाठी आम्ही गेलो होतो. तिथे आम्ही जयंत पाटील यांना भेटलो नाही.” दरम्यान, त्याच रात्री राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे नेते जयंत पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली होती.
सुनेत्रा पवार यांच्याशी मतभेद असल्याचे वृत्त तटकरेंनी फेटाळले आहे. ते म्हणाले, “अजित दादांशी माझे खूप चांगले संबंध होते. तसेच सुनेत्रा वहिनींशीही आहेत. विसंवाद असल्याचा प्रश्नच नाही तसेच त्या माझ्यावर कोणत्याही मुद्द्यावर नाराज असण्याचेही कारण नाही.”
सुनेत्रा पवारांची तटकरे, पटेलांवर नाराजी
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनेत्रा पवार यांची सुनील तटकरे यांच्यासोबत बुधवारी सकाळी बैठक झाली. त्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यासोबत झालेल्या बैठकीबाबत माहिती का दिली नाही, असे त्यांनी तटकरेंना विचारले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्ष मतदारसंघांच्या फेररचनेच्या विधेयकाबाबत एनडीएला समर्थन देऊ शकतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असे तटकरेंनी सांगितले. आपला पक्ष व मुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद निर्माण होऊ नये म्हणून भेट घेतल्याचे तटकरेंनी सांगितले. त्या बैठकीबाबत आपल्याला पूर्वकल्पना देणे दोघांनाही (सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल) का महत्त्वाचे वाटले नाही, असे सुनेत्रा पवार यांनी विचारल्याचे सुत्रांनी सांगितले.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीत दोन गट?
सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीत दोन गट पडल्याचे दिसून येते. एक गट सुनेत्रा पवार व त्यांच्या मुलांशी जुळलेला असून तो सत्तेत आहे. तर पार्थ पवार यांच्या उदयानंतर दुसरा गट दुरावलेला आहे. सुनेत्रा पवार यांच्या निकवटवर्तीय असलेल्या सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, सुनील तटकरे यांच्या जागी उत्तर महाराष्ट्रातील एका नेत्याला नियुक्त करण्याचे नियोजन पार्थ पवार यांचे आहे. दरम्यान, सुनील तटकरे यांनी राज्यात पक्षाचे नेतृत्व करणार असल्याची भूमिका स्पष्टपणे मांडली आहे.
सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा देखील आहेत. त्यांच्या या पदाला आव्हान देणारी नोटीस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सच्चिदानंद सिंग यांनी पाठवली आहे. या नोटीशीला प्रत्युत्तर न देण्याची भूमिका पक्षाने घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात व्यवस्थित संवाद नसल्याने संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. पक्षाचे महिला प्रदेशाध्यक्ष तसेच युवक अध्यक्ष पद रिक्त आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा रूपाली चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतर या पदावर नव्याने नियुक्ती करण्यातही पक्ष अपयशी ठरला आहे. अर्थमंत्री पद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे होते, तेही या क्षणी राष्ट्रवादीपासून दूर असल्याचे दिसते. अजित पवार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदासह अर्थमंत्री पद होते. परंतु, आता अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आहे. विलीनीकरण झाल्यास पक्षाला बळकटी मिळून आमदारांमध्ये असलेली खदखद कमी होईल, अशी शक्यता आहे, परंतु त्याबाबत कोणीही उघडपणे भूमिका घेताना दिसत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार कुटुंबिय जोपर्यंत नेतृत्वाबाबत एकमताने निर्णय घेत नाही, तोपर्यंत परिस्थिती सुधारण्याची शक्यता कमी आहे.
