अलिबाग– रायगड जिल्ह्यात महायुतीत शिवसेना शिंदे गटाची फरफट होत असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरेंच्या राजकारणापुढे जिल्ह्यातील शिवसेना नेते हतबल झाल्याचे सध्या पहायला मिळत आहे. कोकणातील विधान परिषदेची जागा शिवसेना आमदारांच्या विरोध असूनही पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाण्याची चिन्ह दिसू लागली आहेत. त्यामुळे कार्यकर्ते आणि स्थानिक नेत्यामध्ये अस्वस्थता पसरली आहे.

कोकणातील विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक लागली आहे. १०१८ मतदार सदस्य आमदाराचे भवितव्य ठरविणार आहेत. यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, नगरपालिका, नगरपंचायती आणि पनवेल महानगर पालिकेतील सदस्यांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेत पंचायत समितीतील १९७ महानगरपालिका, नगरपांलिका आणि नगरपंचायतीमधील ८२१ सदस्यांचा समावेश आहे. पक्ष निहाय मतांचा विचार केला तर शिवसेना शिंदे गटाचे ३०५, भाजपचे २७६ राष्ट्रवादी काँग्रेसचे १२७ काँग्रेसचे ५० तर शिवसेना ठाकरे गटाचे ५५ सदस्य आहेत. सहाजिकच शिवसेना शिंदे गटाच्या सदस्यांची संख्या जास्त असल्याने हा मतदारसंघ शिवसेनेला मिळावा अशी मागणी केली जात आहे.

पण अनिकेत तटकरे हे गेल्या वेळला याच मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्यामुळे यावेळीही मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडण्यात यावा अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांची आहे. सदस्य संख्या कमी असूनही ते या मतदारसंघावरील पक्षाचा दावा सोडण्यास तयार नाहीत. मुलगी आदिती प्रमाणे मुलगा अनिकेत तटकरे याचे राजकीय पुनर्वसन व्हावे हा त्यामागचा उद्देश आहे.

अनिकेत तटकरे यांच्या आधी या मतदारसंघातून सुनील तटकरे यांचे जेष्ठ बंधु अनिल तटकरे विधान परिषदेवर निवडून गेले होते. त्यामुळे पक्षाचे मताधिक्य महायुतीमधील इतर घटक पक्षांच्या तुलनेत कमी असले तरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचाच असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस कडून केला जात आहे. पण शिवसेना शिंदे गटाचा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस आणि अनिकेत तटकरे यांना सोडण्यास ठाम विरोध आहे. पण शिवसेना नेत्यांचा विरोध न जुमानता आपले राजकीय वजन वापरून तटकरे हा मतदारसंघ मिळवण्यात यशस्वी होण्याची चिन्ह दिसत आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे.

विविघ पक्षातील पक्षप्रमुखांशी असलेले वैयक्तीक संबध आणि राजकीय प्रगल्भता यामुळे तटकरे यांनी रायगड जिल्ह्यावरील त्यांची पकड सैल होऊ दिलेली नाही. लोकसभेचे सदस्य म्हणून दिल्लीच्या राजकारणात जाऊनही त्यांनी राज्यातील आणि रायगड जिल्ह्यातील राजकारणातील हस्तक्षेप कमी केलेला नाही. प्रशासकीय यंत्रणावरील पकड घट्ट ठेवली आहे. त्यामुळे जिल्ह्यात चांगला जनाधार असूनही शिवसेना शिंदे गटाला अंकीत ठेवण्यात तटकरे यांना कमालीचे यश आले आहे. आपले राजकीय वजून वापरून शिवसेना शिंदे गटाला जिल्ह्याच्या सत्ताकेंद्रांपासून दूर ठेवण्याची दक्षता त्यांनी घेतली आहे. त्यात अचूक यश मिळत असल्याचे विघान परिषद निवडणुकीच्या निमित्ताने पून्हा एकदा दिसून येत आहे.

शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता का?

रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे तीन आमदार आहेत. भरत गोगावले कॅबिनेट मंत्री आहेत. पण गेली दोन वर्ष त्यांना रायगडचे पालकमंत्रीपद शिवसेनेला मिळू शकलेले नाही. शिवसेनेला पालकमंत्रीपद देण्यास तटकरे यांचा विरोध यास कारणीभूत ठरला आहे. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक जिल्हा परिषद सदस्य निवडून आले. मात्र भाजपला सोबत घेऊन तटकरे यांनी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद शिवसेना शिंदे गटाला मिळू दिलेले नाही.

म्हसळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेना शिंदे गटात दाखल झाले. राजकीय उठावानंतर शिवसेनेचे जंजिरकर नगराध्यक्ष झाले पण चारच दिवसात तटकरे यांनी आपले राजकीय वजन वापरून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांची मोठीच अडचण झाली. आता सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांचे मतदार असलेल्या शिवसेना शिंदे गटाला उमेदवारी मिळू नये यासाठी सुनील तटकरे प्रयत्नशील आहेत. शिवसेना नेत्यांचा विरोध डावलून महायुतीकडून मुलाची उमेदवारी मिळवण्यात तटकरे जवळपास यशस्वी होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता आहे. पण स्थानिक नेते तटकरेंपूढे हतबल झाल्याचे दिसून येत आहे.