Parth Pawar And Sunil Tatkare : अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत संघर्ष निर्माण झाला आहे. यामध्ये वारंवार पवार कुटुंबातील चेहरा चर्चेच्या केंद्रस्थानी येत आहे, तो म्हणजे पार्थ पवार यांचा. महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे पूत्र, राज्यसभा खासदार पार्थ पवार यांची भेट घेतल्यानंतर बिहारमधील नवनिर्वाचित आमदार आणि निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वात बदल करण्याचा सल्ला दिला आहे.

प्रशांत किशोर यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासमोर अडचणी येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक रचनेत बदल करताना केलेले ठराव सादर करण्याची नोटीस बजावली होती. या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्या विधानाने अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीवर नेमकं कोणाचं नियंत्रण राहणार आणि पक्षाची सूत्रे कोणाच्या हातात जाणार, हा मुद्दा पुन्हा प्रकर्षाने समोर येत आहे.

तटकरेंच्या फेरनियुक्तीला विरोध

दरम्यान, तटकरे यांच्या नेतृत्वाला आता जालन्यातील राष्ट्रवादीचे नेते भाऊसाहेब गोरे यांनी आव्हान दिले आहे. तटकरे यांची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी झालेली फेरनियुक्ती पक्षाच्या नियमांनुसार झालेली नाही, असा दावा करत गोरे यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.

गोरे यांच्या म्हणण्यानुसार, तटकरे यांच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ जुलैमध्ये संपला होता. मात्र, अजित पवार यांच्या निधनानंतर फेब्रुवारी २०२६ मध्ये सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती झाली. त्याच वेळी तटकरे यांचीही महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली. या प्रक्रियेत निवडणुकीची अधिसूचना काढण्यात आली नाही, निरीक्षक किंवा निवडणूक अधिकारी नियुक्त करण्यात आला नाही आणि इतर इच्छुकांना उमेदवारी अर्ज भरण्याची संधीही देण्यात आली नाही, असा दावा गोरे यांनी केला आहे.

तटकरे हे दिवंगत अजित पवार यांच्या जवळच्या विश्वासू नेत्यांपैकी एक मानले जातात. तटकरेंवर वाढणारा दबाव हा केवळ प्रदेशाध्यक्षपदाचा प्रश्न नसून पवार कुटुंब आणि राष्ट्रवादीचे संघटनात्मक नेतृत्व यांच्यातील संघर्षाचा भाग मानला जात आहे. या संघटनात्मक नेतृत्वात तटकरे यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल यांचीही महत्त्वाची भूमिका आहे.

दरम्यान, प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटनेत आणि राज्य नेतृत्वात बदल करण्याचा सल्ला दिला आहे. सुनेत्रा पवार आणि दिवंगत अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार पक्षात अधिक सक्रीय भूमिका घेत असताना प्रशांत किशोर हा सल्ला समोर आला आहे. मात्र, प्रशांत किशोर यांनी अशी कोणतीही शिफारस केल्याची माहिती आपल्याला नाही,असे तटकरेंनी स्पष्ट केले आहे.

अंतर्गत धुसफूस

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत मतभेद उघड होऊ लागले. मार्चमध्ये सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून मागणी केली की, अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पाठवलेले पत्रव्यवहार विचारात घेऊ नयेत, अशी मागणी केली होती. यातून त्यांनी एकप्रकारे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना साईडलाईन केले होते.

कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांनी सादर केलेल्या पक्षाच्या सुधारित घटनेवर सुनेत्रा पवार यांनी या पत्राच्या माध्यमातून आक्षेप घेतला होता. कार्याध्यक्षांचे अधिकार पक्षाध्यक्षांना समान अधिकार असल्याचे पटेल तटकरेंनी घटनेत नमूद केले होते.

याच काळात निवडणूक आयोगाला सादर केलेल्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीत तटकरे आणि पटेल यांची नावे नव्हती. नंतर पक्षाकडून ही केवळ लिपिकीय चूक असल्याचे सांगण्यात आले. मात्र, या घटनेमुळे दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या पक्षातील भूमिकेबाबत चर्चा सुरू झाली.

जुलै महिन्याच्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून प्रस्तावित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर एनडीएला पाठिंबा मिळू शकतो, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. त्याचवेळी तटकरे आणि पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तेव्हा राष्ट्रावदी काँग्रेसमधील मतभेद पुन्हा उफाळले. या बैठकीबद्दल आपल्याला का कळवण्यात आले नाही, यावरुन सुनेत्रा पवार नाराज झाल्या होत्या. यानंतर दुसऱ्याच दिवशी, पार्थ पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. सूत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या भविष्यातील संवादांबद्दल उपमुख्यमंत्र्यांना माहिती दिली जावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती.

दरम्यान, पक्षाचे उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांनीही एक पत्राच्या माध्यमातून आरोप केला की, “काही विशिष्ट लोक” पार्थ पवार यांची राजकीय कारकीर्द संपवण्याचा प्रयत्न करत आहेत.

यामध्येच रुपाली ठोंबरेंनीही सुनील तटकरेंचे नाव न घेता सूचक वक्तव्य केले. ‘प्रत्येक पदाची एक मुदत असते. चांगली कामगिरी केली तर पदोन्नती मिळते, तर कामगिरी खराब झाली तर मुदत संपण्याआधीच पद जाऊ शकते. लोकशाहीची संस्कृती म्हणजे पदाचा सन्मानाने त्याग करणे. मग पदाला चिकटून राहण्याची एवढी घाई का?’ असे रुपाली ठोंबरे म्हणाल्या.

दरम्यान, पार्थ पवार यांच्या जवळचे मानले जाणारे राष्ट्रवादीचे आणखी एक नेते उमेश पाटील यांनीही सोशल मीडियावर सूचक पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी पवार कुटुंबाशी निष्ठा ठेवण्याचे आवाहन केल्याचे दिसून येते.

तटकरे यांचे राजकीय वजन

तटकरे यांच्या गटाने या वादावर जाहीर प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, राष्ट्रवादीच्या एका ज्येष्ठ नेत्याने तटकरे यांची बाजू घेतली आहे. सुनेत्रा पवार यांनी तटकरे यांना राजीनामा देण्यास सांगितलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तटकरे ४० वर्षांहून अधिक काळ राजकारणात आहेत. त्यामुळे योग्य वेळी पद सोडणे आणि जबाबदारी पुढे कशी द्यावी हे ते जाणतात, असेही त्यांनी नमूद केले.

तटकरे हे अजित पवार यांचे विश्वासू आणि राष्ट्रवादीतील महत्त्वाचे ओबीसी नेते आहेत. त्यांनी राज्य सरकारमध्ये जलसंपदा, अर्थ, ऊर्जा, अन्न व नागरी पुरवठा तसेच नगरविकास यांसारखी महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. २०१५ ते २०१८ या काळात ते एकसंध राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष होते. २०२३ च्या पक्षफुटीनंतर त्यांच्यावर पुन्हा ही जबाबदारी सोपवण्यात आली.

रायगड हा त्यांचा पारंपारिक बालेकिल्ला असून त्यांनी २०१९ आणि २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक जिंकली. त्यांची मुलगी अदिती तटकरे यादेखील राष्ट्रवादीच्या नेत्या असून त्या राज्य सरकारमध्ये मंत्रिपदावर आहेत.

या घडामोडी पाहता, तटकरे हे पक्षासाठी महत्त्वाचे राहिलेले नाहीत हा मुद्दा महत्वाचा ठरत नाही, तर त्यांचे राजकीय वजन आणि अजित पवारांशी असलेली जवळीक या मुद्द्यांमुळे त्यांच्यावरील दबाव वाढत आहे. तर, राष्ट्रवादीत स्वतःची जागा निर्माण करू पाहणाऱ्या पार्थ पवारांसाठी जुन्या नेतृत्वाचा प्रभाव कमी करणे आणि पक्षावर स्वतःची पकड निर्माण करण्यासाठी तटकरे अडसर ठरु शकतात. म्हणून त्यांच्यावरील दबाव वाढत असल्याचे चित्र आहे.