हर्षद कशाळकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलिबाग– किल्ले रायगडावर ३५० वा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला असला चर्चा रंगली ती तटकरेंच्या नाराजीची. खासदार सुनील तटकरे हा कार्यक्रम अर्ध्यावर सोडून निघून गेले. राजशिष्टाचार पाळला जात नसल्याचा आरोप त्यांनी केला. गेल्या काही दिवसांमध्ये शिंदे-फडणवीस सरकारडून सातत्याने डावलण्यात येत असल्याची तटकरे यांची भावना झाली आहे.

शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सात ते आठ मंत्री उपस्थित होते. यावेळी आमदार भरत गोगावले यांनी सुरवातीला उपस्थितांना संबोधित केले. यानंतर तटकरे यांनी आपल्यालाही शिवाजी महाराजांबद्दल भावना व्यक्त करायच्या असल्याचे पालकमंत्री उदय सामंत यांना सांगितले. परंतू आमदार गोगावले यांच्यानंतर लगेचच सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना बोलण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेले तटकरे कार्यक्रम सोडून निघून गेले.

शिवराज्याभिषेक सोहळा राज्य सरकार च्या वतीने साजरा करण्यात आला होता. राज्य सरकार कडून जेंव्हा कार्यक्रम होतो तेंव्हा त्याला राजशिष्टाचार लागू होतो, मात्र काही सुमार बुध्दीची माणसे राजशिष्टाचार बाजूला ठेवून शासकीय कार्यक्रम हायजॅक करून स्वतःचे महत्व वाढवून घेण्याचा केविलवाणा प्रयत्न करत असतात असे टीकास्र खासदार सुनील तटकरे यांनी महाडचे आमदार भरत गोगावले यांच्यावरती सोडले.

सुनील तटकरे हे शांत आणि संयमी नेते म्हणून ओळखले जातात. पण तरीही शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर ते उद्विग्न झाल्याचे पहायला मिळाले. कारण गेल्या काही महिन्यापासून त्यांना शासकीय कार्यक्रमापासून सातत्याने डावलले जात आहे. खारघर येथे आयोजित महाराष्ट्र भुषण सोहळ्याला तटकरे यांना मंचावर स्थान देण्यात आले नाही. त्यामुळे निमंत्रितांसाठी राखिव जागेत बसून त्यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली. त्याच वेळी खासदार श्रीरंग बारणे यांना मात्र मंचावर स्थान देण्यात आले होते.

रोहा तालुक्यातील कृषी शाळेत कृषीमंत्री अब्दूल सत्तार यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमाचे काही दिवसांपुर्वी आयोजन करण्यात आले होते. मात्र या कार्यक्रमाचे निमंत्रण तटकरे यांना देण्यात आले नव्हते. त्यावेळीही तटकरे यांनी राजशिष्टाचार पाळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले होते. आता शिवराज्याभिषेक सोहळ्यात भाषण करण्यापासून रोखण्यात आल्याने तटकरे उद्विग्न झाले. त्यांनी जाहीरपणे याबाबत नाराजी व्यक्त केली.

महाविकास आघाडीच्या काळात शिवसेना आमदारांना सापत्न वागणूक दिली जात असल्याचा आरोप तिन्ही आमदारांकडून केला जात होता. तत्कालीन पालकमंत्री आदिती तटकरे या आमदारांच्या कामाचे श्रेयघेत असल्याचा आरोप भरत गोगावले सातत्याने करत होते. त्यामुळे सत्ताबदल झाल्यानंतर तटकरेंची कोंडी करण्याचे धोरण शिवसेना आणि भाजपच्या आमदारांनी स्वीकारले असल्याचे दिसून येत आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sunil tatkare upset raigad fort coronation shivaji maharaj program leave print politics news ysh
First published on: 05-06-2023 at 11:03 IST