आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदेसेनेत विलीन झालेल्या सहा बंडखोर खासदारांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बचावली… विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीमार करण्याचा प्रयत्न केल्यास भाजपाचा माज उतरवून टाकू, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिल्लीतून दिला… सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात बहुमताची हवा गेली असून ती हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली… आधी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्या, मगच आम्ही चर्चा करू, अशी आक्रमक भूमिका राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केली… दिल्लीतील आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना केला… या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…

शिंदे गटात गेलेले ६ खासदार गोत्यात?

शिवसेना ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देऊन शिंदेसेनेत गेलेल्या सहा बंडखोर खासदारांना सर्वोच्च न्यायालयाने कारणे दाखवा नोटीस बजावली. तसेच, त्यांच्या विलीनीकरणाला मंजुरी देणारे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनाही न्यायालयाने नोटीस धाडली. या नोटीसीवर दोन आठवड्यात उत्तर सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. ठाकरे गटाच्या सहा बंडखोर खासदारांमध्ये धाराशिवचे ओमराजे निंबाळकर, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, हिंगोलीचे खासदार नागेश आष्टीकर, वाशिमचे खासदार संजय देशमुख आणि ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांचा समावेश आहे. या सर्वांनी आपापल्या मतदारसंघातील विकासाचा मुद्दा उपस्थित करत गेल्या महिन्यात २२ जूनला शिंदेसेनेत जाहीर प्रवेश केला होता. त्याविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली. न्यायालयाने प्रकरणात गांभीर्य लक्षात घेऊन सर्व प्रतिवादींना नोटीस जारी केली. आता या प्रकरणाची सुनावणी दोन आठड्यांनी होणार असल्याचे समजते. या नोटीसीनंतर बंडखोर खासदार गोत्यात येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली.

मनोज जरांगे यांचा भाजपाला इशारा

विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीमार करण्याचा प्रयत्न केल्यास भाजपाचा माज उतरवून टाकू, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला. नीट पेपरफुटी प्रकरणात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी हजारो विद्यार्थ्यांनी सोमवारी संसद भवनाकडे मोर्चा काढला होता. त्यावेळी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर अमानुष लाठीमार केला. या घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटले असून आज मनोज जरांगे पाटील यांनी दिल्लीत जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यांच्याबरोबर शरद पवार गटाचे बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचाही समावेश होता. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना जरांगे म्हणाले, शांततेच्या आंदोलनात ताकद असल्याचे आम्ही सिद्ध करून दाखवले आहे. आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आहोत. फक्त आपली जागा सोडू नका. सगळा देश तुमच्यामागे आहे. तुम्ही दुसरीकडे गेलात तर आंदोलन मोडून टाकतील. पुढच्या काळात सरकारने विद्यार्थ्यांवर हात उचलला तर त्यांचा माज उतरवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

“सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात बहुमताची हवा गेली”

सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात बहुमताची हवा गेली असून ती हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपावर केली. दिल्लीत आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठीमाराचा तीव्र निषेध करताना ठाकरे म्हणाले की, सरकार ज्या क्रूरतेने या तरुणांशी वागत आहे, ते पाहून आता लोक उघडपणे म्हणू लागले की यांच्यापेक्षा तर इंग्रज चांगले होते. जे सत्तेत बसले आहेत, त्यांच्या डोक्यात बहुमताची हवा गेली आहे आणि ती हवा काढायला जनतेला वेळ लागणार नाही. स्वतःच्या ‘मन की बात’ लादणाऱ्या सरकारने लोकांची ‘जन की बात’ ऐकली पाहिजे. इंदिरा गांधींच्या काळात सोनम वांगचुक यांचे वडील उपोषणाला बसले होते, तेव्हा पंतप्रधान स्वतः त्यांना भेटायला गेल्या होत्या. अण्णा हजारेंच्या आंदोलनावेळी मनमोहन सिंह सरकारने विलासराव देशमुखांना चर्चेसाठी पाठवले होते. लोकशाहीत चर्चा करणे हे सरकारचे कर्तव्य असते, पण हे सरकार चर्चा सोडून हुकूमशाही लादत आहे, असा आरोपही ठाकरे यांनी केला.

विरोधकांनी पुन्हा संसद दणाणून सोडली

नीट परीक्षेतील गोंधळ आणि जंतर मंतरवर उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे पडसाद आज संसदेतही उमटले. गेल्या दोन दिवसांपासून विरोधकांनी या मुद्द्यांवरून सभागृह दणाणून सोडले. बुधवारीही इंडिया आघाडीच्या नेत्यांनी लोकसभा आणि राज्यसभेत अत्यंत आक्रमक भूमिका घेतली. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत सभागृहात नीट किंवा इतर कोणत्याही मुद्द्यावर चर्चा होऊ दिली जाणार नाही. निष्पक्ष चर्चेसाठी शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा आवश्यक आहे, असे मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी ठणकावून सांगितले. सभागृहातील वाढता गदारोळ आणि घोषणाबाजी पाहून सभापतींनी राज्यसभेचे कामकाज तीन वाजेपर्यंत, तर लोकसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात केले आहे. त्यामुळे बुधवारी या मुद्द्यांवरून संसदेत काय घडणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

मंत्री चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप

दिल्लीतील आंदोलन राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप भाजपाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीत माध्यमांशी बोलताना केला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे उद्घाटन मंत्री पाटील यांच्या हस्ते झाले. यानंतर माध्यम प्रतिनिधींनी बोलताना ते म्हणाले की, एखादा आंबा चोरला की फाशी नसते. समज देणे असते. नीट पेपरफुटी प्रकरणी संशयितांना अटक केली. त्यानंतर पुन्हा फेरपरीक्षाही घेण्यात आली आणि त्यांचे निकाल जाहीर झाले. पुढील प्रक्रिया सुरू आहे. तरीही याच विषयावरुन आंदोलन केले होत आहे. यामागे राजकारण आहे. संसदेचे अधिवेशन विस्कळीत व्हावे, महत्वाची विधेयके मांडली जाऊ नयेत असा हेतू यामागे आहे. समोर येत असणाऱ्या ध्वनी चित्रफितीवरू हे दिसत आहे. विरोधकांनी यांचे राजकारण करू नये. उठसूट राजकारण केल्याने देशाचे नुकसान होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा बिघडते, असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी दिला.