आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : आम्ही एकनाथ शिंदे यांना अपात्र घोषित करू शकतो का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी शिवसेना ठाकरे गटाच्या वकिलांना सुनावणीदरम्यान विचारला… शिवसेना ही शिंदेंची होऊच शकत नाही, असा युक्तिवाद करताना धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवा, अशी मागणी ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात केली… गिरीश महाजन यांच्या नियुक्तीवर भाष्य करताना पालकमंत्रिपद न मिळाल्याने आपण लहान होत नाही, असा सणसणीत टोला मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला… पुढील दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि यूएईलालाही मागे टाकेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला… उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला असून सोलापुरातील महत्वाची नगरपंचायत पक्षाच्या ताब्यातून गेली….
‘धनुष्यबाण’ गोठवण्याची ठाकरे गटाची मागणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. यावेळी ठाकरे गटाच्या वतीने सलग पाचव्या दिवशी ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. शिवसेना आमदारांच्या अपात्रता प्रकरणात विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या चुकीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालय आम्हाला दिलासा देऊ शकते, असे मत त्यांनी मांडले. विधिमंडळ आणि राजकीय पक्षात काय फरक असते हेदेखील त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनात आणून दिले. तसेच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांचे होऊच शकत नाही. या पक्षावर सर्वस्वी उद्धव ठाकरे यांचाच अधिकार आहे, असे सिब्बल यांनी सांगितले. यादरम्यान शिंदेंच्या बंडानंतर राज्यपाल, विधानसभा अध्यक्षांनी घेतलेली भूमिका आणि त्यानंतरचा संपूर्ण घटनाक्रमही त्यांनी न्यायालयासमोर मांडला. युक्तिवाद अंतिम टप्प्यात असताना शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह तातडीने गोठवण्यात यावे, अशी मागणीही सिब्बल यांनी केली. आता त्यांच्या या मागणीवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
“आम्ही शिंदेंना अपात्र ठरवू शकतो का?”
आम्ही एकनाथ शिंदे यांना अपात्र ठरवू शकतो का? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी शिवसेना ठाकरे गटाच्या वकिलांना सुनावणीदरम्यान विचारला. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादानंतर वकील देवदत्त कामत यांनी ठाकरेसेनेची न्यायालयात बाजू मांडली. यावेळी त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर आपली भूमिका स्पष्ट करताना न्यायमूर्तींनी उलटपक्षी प्रश्न केला. विधिमंडळ आणि राजकीय पक्ष वेगळा आहे. निवडणुकीत उमेदवार राजकीय पक्ष ठरवत असतो. बंडखोरी झाली, त्यावेळी पक्षात कोण कोण होते हे अत्यंत महत्वाचे आहे. शिंदे पक्षात राहिले नाही तर त्यांच्यावर होणारे दावे कसे राहतील. इतर पर्यायांचा विचार केला पाहिजे होता, असे म्हणत देवदत्त कामत यांनी विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यावर न्यायमूर्ती बागची यांनी अध्यक्षांचा निर्णय कायद्याच्या विरोधात असेल, तर आम्ही तो आदेश रद्द करू शकतो. परंतु आम्ही शिंदे यांना ठरवू शकतो का? असा उलटपक्षी प्रश्न केला. त्यावर युक्तिवाद करताना निकालांमध्ये अपात्रता योग्य ठरवली गेली आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवता येऊ शकते, असे कामत यांनी नमूद केले. दरम्यान, न्यायालयातील या युक्तिवादाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे.
महाजनांच्या नियुक्तीवरून भुजबळांचा टोला
गिरीश महाजन यांच्या नियुक्तीवर भाष्य करताना पालकमंत्रिपद न मिळाल्याने आपण लहान होत नाही, असा सणसणीत टोला मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला. महायुतीतील संघर्षामुळे दीड वर्षांपासून रखडलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अखेर सुटला. भाजपाचे नेते, कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्रिपदाच्या शर्यतीत असलेल्या भुजबळ यांनी महाजनांना माझ्या शुभेच्छा असल्याचे सांगितले. तसेच पालकमंत्रिपद न मिळाल्याने आपण लहान होत नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) गटाचे जिल्ह्यात सात आमदार असल्याने सर्वाधिक आमदारांच्या बळावर नाशिकचे पालकमंत्रिपद मिळवण्यासाठी पक्षाने चांगलीच कंबर कसली होती. मात्र, ऐनवेळी पालकमंत्रिपदाची माळ गळ्यात महाजनांच्या गळ्यात पडल्याने भुजबळ समर्थकांमध्ये नाराजी पसरल्याची चर्चा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मोठा विश्वास
पुढील दोन वर्षांत महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सिंगापूर आणि संयुक्त अरब अमिरातीलाही (यूएई) मागे टाकेल, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. त्यांच्या या विधानाची संपूर्ण राज्यभरात जोरदार चर्चा रंगली आहे. इंडो-अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय परिषद २०२६ मध्ये फडणवीसांनी हजेरी लावली. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना भारत आणि अमेरिकेतील आर्थिक, तांत्रिक आणि धोरणात्मक भागीदारीच्या पुढील टप्प्यात महाराष्ट्र केंद्रस्थानी राहणार आहे, समृद्ध भारताच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र हे गुंतवणूकदारांचे पहिल्या पसंतीचे ठिकाण ठरेल. कृत्रिम बुद्धिमत्ता, विदा केंद्र, जागतिक सक्षमता केंद्र आणि आधुनिक पायाभूत सुविधांच्या माध्यमातून महाराष्ट्रात भविष्यातील अर्थव्यवस्थेसाठी सक्षम परिसंस्था उभारली जात असल्याचे फडणवीसांनी सांगितले. तसेच राज्याची अर्थव्यवस्था पुढील दोन वर्षांत सिंगापूर आणि यूएईलाही मागे टाकेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसला शिंदेसेनेचा जबर धक्का
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. सोलापूर जिल्ह्यातील वैराग नगरपंचायतीची सत्ता पक्षाच्या ताब्यातून गेली आहे. या नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगराध्यक्ष सुजाता डोळेसे, उपनगराध्यक्ष निरंजन भूमकर यांच्यासह १५ जणांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. बार्शी तालुक्यातील नूतन वैराग नगरपंचायतीसाठी पहिल्यांदाच फेब्रुवारी महिन्यात मतदान झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली होती. १७ पैकी तब्बल १३ जागांवर पक्षाने निर्विवाद विजय मिळवला होता. त्यामुळे नगराध्यक्ष होण्याचा मान राष्ट्रवादीकडून सुजाता डोळेसे यांना मिळाला होता. मात्र, अवघा सहा महिन्यातच त्यांनी पक्षाची साथ सोडली आहे. नगराध्यक्षांसह नगरसेवकांची फौजही शिंदेसेनेत गेल्याने आता वैराग नगरपंचायतीवर शिवसेनेची सत्ता असणार आहे. दरम्यान, माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्या पुढाकाराने हे पक्षप्रवेश घडवून आणल्याचे सांगितले जात आहे.
