आजच्या महत्वाच्या राजकीय घडामोडी : शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान ठाकरे गटाच्या वकिलांना सरन्यायाधीशांनी खडसावले… शिंदेसेनेत मोठी उलथापालथ झाली असून पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण अकोला जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली… कोकणातील शेतकऱ्यांना पोलीसी खाक्या दाखवणाऱ्या फडणवीसांना याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला… शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचे कौतुक कोणत्या उद्देशाने केले हे समजत नाही, असे विधान राष्ट्रवादीच्या नेत्याने केले… आनंद परांजपे यांच्या पक्ष प्रवेशानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद झाल्याच्या बातम्या निराधार असल्याचे स्पष्टीकरण मंत्री सामंत यांनी दिले. या सर्व घडामोडी सविस्तर जाणून घेऊ…
ठाकरेंच्या वकिलांना सरन्यायाधीशांनी खडसावलं
शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत असलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाची बाजू मांडणाऱ्या वकिलांनी हे प्रकरण अनेक दिवसांपासून प्रलंबित असल्याने त्यावर तातडीची सुनावणी होणे आवश्यक असल्याचे नमूद केले. त्यावर सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी स्पष्ट शब्दांत प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली. तुम्ही इथे न्यायालयात तारखेची मागणी करता आणि दुसरीकडे बाहेर तुमचे लोक ‘न्यायालय निर्णय देत नाहीये’ अशी बेजबाबदार विधाने करतात. हे वर्तन आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही सायंकाळी ४ वाजेपर्यंत सतत काम करत असतो. कोणी आम्हाला रिकामे बसलेले पाहिले तर आम्ही समजू शकतो. सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही, असे बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा, असा संताप सरन्यायाधीशांनी व्यक्त केला. या प्रकरणाची पुढची सुनावणी ३० जुलै रोजी होणार असल्याची माहितीही न्यायालयाने दिली.
शिवसेना शिंदे गटात मोठी उलथापालथ
शिंदेसेनेत मोठी उलथापालथ झाली असून पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण अकोला जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केली. जिल्हा कार्यकारिणीसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. अंतर्गत गटबाजी, एकमेकांची उणीदुणी काढणे, पक्षांतर्गत असमन्वय, विस्कळीत व मनमानी कारभार स्थानिक पदाधिकाऱ्यांना चांगलाच भोवल्याची चर्चा आहे. अकोला जिल्ह्यात शिंदे गटात काही आलबेल नसल्याचे चित्र सुरुवातीपासूनच आहे. गटातटाचे राजकारण शिगेला पोहोचले. पक्षातील अंतर्गत वाद वारंवार चव्हाट्यावर आले आहेत. जिल्हा कार्यकारिणी व्यापक करूनही पक्षाचा संघटनात्मक विस्तार झालेला नाही. निवडणुकांमधील अपयश, सातत्यपूर्ण गटबाजी, पक्षांतर्गत कुरबुरी, अंतर्गत कलहामुळे अखेर एकनाथ शिंदे यांनी संपूर्ण कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. शिंदेसेनेचे सचिव संजय मोरे यांनी या संदर्भात गुरुवारी प्रसिद्धी पत्रक काढले. या आदेशानुसार जिल्ह्यासह विविध आघाड्या बरखास्त झाल्या आहेत.
राजू शेट्टी यांचा देवेंद्र फडणवीसांना इशारा
मुंबईत आलेल्या कोकणातील शेतकऱ्यांना पोलीसी खाक्या दाखवणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना किंमत चुकवावी लागेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिला. राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज मुंबईत काजू आणि आंबा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एल्गार करण्यात आला. या आंदोलनात शेतकऱ्यांसाठी सर्व पक्षातील नेते एकवटले होते. मात्र, मोर्चाला परवानगी नसल्याचे सांगत मुंबई पोलिसांनी आंदोलनकर्त्यांची धरपकड केली. राजू शेट्टी यांना फरफटत नेण्यात आले, तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महादेव जानकर यांच्यासह मराठी भाषा केंद्राचे दीपक पवार यांनाही ताब्यात घेण्यात आले. त्यावर संताप व्यक्त करताना कोकणातील शेतकरी ५० वर्षांत पहिल्यांदा मुंबईत आला होता. मुख्यमंत्र्यांनी पोलीस खाक्या दाखवला, याचा आम्ही धिक्कार करतो आणि याची किंमत निश्चितच मुख्यमंत्री फडणवीस यांना चुकवावी लागेल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला.
शरद पवारांबाबत अनिल पाटील काय म्हणाले?
शरद पवार यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचे कौतुक कोणत्या उद्देशाने केले हे समजत नाही, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अनिल पाटील यांनी केले. तटकरे आणि पटेल यांचे नाव पक्षाच्या कार्यकारिणीतून वगळण्यात आलेले नाही. राष्ट्रवादीच्या वर्किंग कमिटीमध्ये पटेल हे दुसऱ्या स्थानी असून तटकरे हे तिसऱ्या स्थानी आहेत. त्यामुळे त्यांना वगळण्यात आले असे म्हणणे चुकीचे आहे, असेही अनिल पाटील म्हणाले. शरद पवार हे देशाचे नेते असून रुग्णालयात दाखल असल्याने ते बारामतीच्या पोटनिवडणुकीला उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आम्ही गेल्या पंधरा दिवसापासून प्रयत्नशील होतो. आजारपणामध्ये एखाद्याला भेटायचे असेल तर त्यात राजकारण आणण्याची आवश्यकता नाही. त्यांनी कोणत्या उद्देशाने सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांचे कौतुक केले, यावर मी बोलणे उचित ठरणार नाही, अशी प्रतिक्रिया अनिल पाटील यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली.
शिवसेना-राष्ट्रवादीत कोणताही वाद नाही : सामंत
आनंद परांजपे यांच्या पक्ष प्रवेशानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीत वाद झाल्याच्या बातम्या निराधार असल्याचे स्पष्टीकरण मंत्री सामंत यांनी दिले. परांजपे यांचा शिवसेनेतील पक्ष प्रवेश हा राष्ट्रवादी काँग्रेस नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर झाला आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशानंतर वाद होण्याची कारणच नाही. महायुतीत मित्र पक्षांनी युती धर्माचे पालन करावे, असे सामंजस्याने ठरले आहे. मात्र, एखादा पदाधिकारी स्वत:हून पक्ष सोडणार असेल, तर त्याने महायुतीतच राहावे ही आमची जबाबदारी आहे. परांजपे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांना स्वगृही परतण्याचे आवाहन केले होते. पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होत परांजपे यांनी पुन्हा स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
