Who is Arun Lakhani BJP Candidate Vidhan Parishad Election : आगामी विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपाने आपल्या ११ उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली. या यादीत नागपूरमधील प्रसिद्ध उद्योजक अरुण लखानी यांचा नावाचा समावेश आहे. भाजपाने त्यांना वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अरुण लखानी हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही होणार असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच भाजपाने त्यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर ते राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

गडकरी-फडणवीसांचे अत्यंत निकटवर्तीय

राज्यातील विधान परिषदेच्या १७ जागांसाठी येत्या १८ जून रोजी मतदान पार पडणार आहे. त्यापैकी ११ जागांवर भाजपाने उमेदवार दिले असून त्यासंदर्भातील यादीही जाहीर करण्यात आली आहे. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेची उमेदवारी मिळालेले अरुण लखानी हे भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. विदर्भातील औद्योगिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांचा मोठा प्रभाव आहे. लखाणी यांचे सुपुत्र सारंग लखाणी यांचा साखरपुडा सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती हिच्याशी झाला आहे. त्यामुळे भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांच्या कुटुंबातील हे आगामी नाते या उमेदवारीच्या निमित्ताने सर्वपक्षीय नेत्यांमध्ये औत्सुक्याचा विषय ठरत आहे.

‘बाहेरचा उमेदवार’ म्हणत अनेकांकडून टीका

अरुण लखाणी हे वर्धा, चंद्रपूर किंवा गडचिरोली या तीनही जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्याचे रहिवासी नसल्याने त्यांच्या उमेदवारीवरून तर्कवितर्क लढवले जात आहेत. पारंपरिकदृष्ट्या या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व याच तिन्ही जिल्ह्यांपैकी मजबूत स्थानिक पकड असलेल्या नेत्यांनी केले आहे. त्यामुळे स्थानिक नेत्यांना डावलून ‘बाहेरच्या उमेदवाराला’ रिंगणात उतरवण्याच्या भाजपाच्या या निर्णयावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. भाजपाच्या संघटनात्मक रचनेत लखानी हे परिचित आणि प्रभावशाली नाव मानले जाते. सध्या ते भाजपाचे सहकोषाध्यक्ष असून दीर्घकाळापासून पक्ष संघटनेशी जोडलेले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोन्ही बड्या नेत्यांशी असलेले त्यांचे सलोख्याचे संबंध, पायाभूत सुविधा क्षेत्रातील त्यांचे मोठे काम आणि विदर्भातील त्यांचे सामाजिक उपक्रम हीच लखानी यांच्या उमेदवारीमागील मुख्य कारणे असल्याचे मानले जात आहे.

पेट्रोकेमिकल अभियंता ते यशस्वी उद्योजक

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे जन्मलेल्या अरुण लखाणी यांनी उद्योगक्षेत्रात प्रवेश करण्यापूर्वी पेट्रोकेमिकल अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. सध्या ते ‘विश्वराज एन्व्हायरनमेंट लिमिटेड’ या कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही कंपनी पाणीपुरवठा, सांडपाणी प्रक्रिया आणि रस्ते विकास प्रकल्पांच्या क्षेत्रात कार्यरत आहे. अरुण लखानी यांना सर्वात मोठी ओळख नागपूरमधील २४ तास पाणीपुरवठा प्रकल्पामुळे मिळाली. सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्यात आलेल्या हा प्रकल्प महापालिकेद्वारे २४ तास पाणीपुरवठा करणारा देशातील यशस्वी प्रयोगांपैकी एक मानला जातो.

सामाजिक कार्य, क्रीडा क्षेत्रात सक्रिय

उद्योग क्षेत्रातील कामगिरीबरोबरच अरुण लखाणी हे सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांमध्येही नेहमीच सक्रिय राहिले आहेत. विदर्भातील आदिवासी भागांत ५०० हून अधिक ‘एकल शिक्षक शाळा’ चालवणाऱ्या लक्ष्मणराव मानकर ट्रस्टचे ते प्रमुख आहेत. याशिवाय महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही ते काम पाहत आहेत. पवार कुटुंबासोबतच्या कौटुंबिक संबंधांमुळे त्यांच्या उमेदवारीची उत्सुकता अधिकच वाढली आहे. भाजपाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः फोन करून आपले अभिनंदन केल्याचे लखाणी यांनी सांगितले. होय, मला सुप्रिया सुळे यांचा अभिनंदनाचा फोन आला होता, असे सांगत त्यांनी राजकारण आणि वैयक्तिक संबंध हे नेहमी वेगवेगळे ठेवले पाहिजेत, असे स्पष्ट केले आहे.

पंतप्रधान मोदींना दिले लग्नाचे निमंत्रण

याच वर्षाच्या सुरुवातीला अरुण लखाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना सारंग आणि रेवती यांच्या लग्नाचे निमंत्रण दिले होते. या भेटीदरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासह दोन्ही कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. यादरम्यान विधान परिषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लखाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष नितीन नवीन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे आभार मानले. त्याचवेळी वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाशी आपला संबंध नसल्याच्या आरोपही त्यांनी फेटाळून लावला. लक्ष्मणराव मानकर ट्रस्टच्या सामाजिक कामाच्या माध्यमातून आपण वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली या तिन्ही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला असून तिथल्या लोकांशी आपला जवळचा संपर्क असल्याचे लखाणी यांनी ठामपणे सांगितले. त्यामुळे ‘बाहेरचे उमेदवार’ अशी होत असलेली टीका योग्य नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.