मुंबई : विकास व निधीसंदर्भात केंद्राकडून इतर राज्यांना मिळणारा न्याय महाराष्ट्रालासुद्धा मिळावा, अशी अपेक्षा राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्याध्यक्ष व खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. सुळे यांच्या हस्ते पक्षाच्या प्रदेश कार्यालयात ध्वजवंदन करण्यात आले. राज्यात होत असलेल्या चुकीच्या गोष्टीविरोधात आवाज उठवा, असे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले. गेल्या वर्षापासून आपण संघर्ष करत आहोत. शेवटी सत्याचा विजय होणार आहे. महाराष्ट्राने लोकसभा निवडणुकीत मोठे यश दिले आहे. पण, यशाबरोबर जबाबदारीही आलेली आहे. प्रत्येकाने आपल्या जबाबदारीचे पालन करायला हवे. दिल्लीसमोर महाराष्ट्र कधी झुकला नाही, यापुढे झुकणार नाही, असे सुळे म्हणाल्या. हेही वाचा >>>BJP : भाजपा ‘वृद्धांचा’ पक्ष ? विरोधक तरुण नेत्यांना संधी देत असताना पार्टीसमोरचं वयोवृद्धांचं आव्हान? पुढचा काळही संघर्षाचा आहे. महागाई, बेरोजगारी महाराष्ट्रात कमी होताना दिसत नाही. महिलांवरचे अत्याचार वाढत आहेत. जे कार्यकर्ते भेटतात ते त्यांच्या मतदारसंघातील बेरोजगारीचा प्रश्न सांगत असतात. दुसऱ्या राज्याचे भले होत आहे, पण महाराष्ट्रातील तरुणांनासुद्धा रोजगारासंदर्भात न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सुळे यांनी केली.