पुणे : पुण्याच्या राजकारणातला ‘सबसे बडा खिलाडी’ अशी ओळख असलेले दिवंगत खासदार सुरेश कलमाडी यांच्या पुण्यातील सक्रिय राजकारणाला १९७८ मध्ये शिवाजीनगर विधानसभा मतदार संघात पराभवाने आरंभ झाला; पण १९८२ मध्ये राज्यसभेवर खासदार म्हणून संसदेत गेल्यावर त्यांनी सलग ३५ वर्षे मागे वळून पाहिले नाही. पुणे आणि कलमाडी हे राजकारणाचे समीकरण घट्ट जमले. मात्र, दिल्लीतील कॉमनवेल्थ क्रीडा स्पर्धेत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली २०११ मध्ये अटक झाल्यानंतर ही कारकीर्द थांबली आणि पुण्याच्या राजकारणाला दिशा देणारे हे नेतृत्व मुख्य प्रवाहातून बाहेर फेकले गेले. त्यानंतर पुण्यातील काँग्रेसचे पतन झाले, ते आजतागायत!
उच्चशिक्षितांनी राजकारणात येण्याचे प्रमाण कमी असलेल्या काळात सुरेश कलमाडी हे राजकारणाच्या प्रवाहात आले. त्यापूर्वी भारतीय हवाई दलात वैमानिक म्हणून काम केल्यानंतर १९७० च्या दशकात त्यांनी पुण्यात राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. अल्पावधीतच ते राजकारणात सक्रिय झाले.
‘पूना कॅफे हाउस’ राजकारणाचे केंद्रबिंदू
कलमाडी यांनी हवाई दलातून स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यांनी राजकारणात जम बसविण्यास सुरुवात केली. त्यांनी ज्येष्ठ समाजवादी नेते निळूभाऊ लिमये यांच्याकडून डेक्कन परिसरातील ‘पूना कॉफी हाउस’ हे विकत घेतले. पुण्यातील राजकीय व्यक्तींची गप्पा आणि राजकीय डावपेचांची आखणी पूना कॉफी हाउसमध्ये होत असे. या काळात कलमाडी यांची ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी परिचय झाला. पवार यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे ते युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झाले. १९७८ मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते.
राजकारणातील पहिला प्रयत्न अपयशी
काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी १९७८ मध्ये त्यांना पुण्यात शिवाजीनगर विधानसभा मतदार संघातून निवडणुकीला उभे केले. त्यांच्याविरोधात जनता पक्षाच्या शांती नायक या उमेदवार होत्या. कलमाडी यांना या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावे लागले. त्याअर्थाने पहिल्याच निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला. या निवडणुकीनंतर ते विधानसभा निवडणुकीला कधीही उभे राहिले नाहीत.
विठ्ठलराव गाडगीळ यांच्यानंतर कलमाडींकडे सूत्रे
पुण्यातील काँग्रेस आणि राजकारणावर दिवंगत खासदार विठ्ठलराव गाडगीळ यांचा प्रभाव होता. गाडगीळ यांचा गट हा पारंपरिक विचारांचा होता. १९९० च्या दशकात पुण्याच्या राजकारणात गाडगीळ आणि कलमाडी या दोन गटांत वर्चस्वाची लढाई सुरू झाली. गाडगीळ हे दिल्लीत काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते असल्याने त्यांचा दबदबा होता. कलमाडी यांची १९८२ मध्ये राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली आणि त्यांच्या राजकीय प्रवासाला प्रारंभ झाला. सलग तीन वेळा ते राज्यसभेवर निवडून गेले. दरम्यानच्या काळात कलमाडी यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून कार्यकर्त्यांची फळी तयार केली होती. गाडगीळ यांचा प्रभाव कमी होऊ लागल्यानंतर काँग्रेसने त्यांना १९९६ मध्ये पहिल्यांदा लोकसभेची उमेदवारी दिली आणि विजय साकारत त्यांनी पुण्याचे प्रतिनिधित्त्व केले.
‘पुणे विकास आघाडी’च्या प्रयोगातून यश आणि अपयशही
गाडगीळ आणि कलमाडी यांच्यातील मतभेद विकोपाला गेल्यावर कलमाडी यांनी काँग्रेस सोडून ‘पुणे विकास आघाडी’ स्थापन केली. १९९७ च्या महापालिका निवडणुकीत पुणे विकास आघाडीचे अनेक नगरसेवक निवडून आले. तेव्हा कलमाडी यांनी भाजप आणि तत्कालीन शिवसेनेशी छुती युती करून पुणे महापालिकेतून काँग्रेसला पायउतार केले. त्यानंतर ‘सबसे बडा खिलाडी, सुरेश कलमाडी’ हे पुण्याच्या राजकारणातील घोषवाक्य कायम चर्चेत राहिले. ‘पुण्याचा विकास’ हा त्यांचा परवलीचा शब्द होता.
वाजपेयींच्या सभेनंतरही पराभव
कलमाडी यांनी १९९८ मध्ये लोकसभेची अपक्ष म्हणून निवडणूक लढविली. त्यावेळी भाजपने त्यांना पाठिंबा दिला. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी त्यांच्यासाठी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या आवारात जाहीर सभा घेतली. त्यावेळी विठ्ठल तुपे यांनी त्यांचा पराभव केला. मात्र, त्यानंतर भाजपच्या पाठिंब्यावर राजकारणात यश मिळू शकणार नसल्याचे लक्षात आल्यावर ते स्वगृही परतले. त्यानंतर २००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकीत विजयी होऊन काँग्रेसच्या राजकारणात पुनरागमन केले.
फेस्टिव्हल, मॅरेथॉनने पुण्याचे नाव जागतिक पटलावर
पुण्याचा विकासाला त्यांनी ‘इव्हेंट मॅनेजमेंट’ची जोड दिली आणि पुण्याचे नाव जागतिक पटलावर नेण्याचे काम केले. सांस्कृतिक शहर असलेल्या पुण्याची ओळख त्यांनी ‘पुणे फेस्टिव्हल’च्या माध्यमातून जगभरात पोहोचविण्याचे काम केले. पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन सुरू करून त्यांनी क्रीडानगरी म्हणूनही पुण्याचे नाव उंचावण्याचे काम केले. पुण्यातील अनेक उड्डाणपूल, रस्ते आणि विमानतळ विस्तारीकरणात कलमाडी यांचे योगदान मोठे होते. दिवंगत पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारमध्ये ते रेल्वे राज्यमंत्री होते. त्या माध्यमातून त्यांनी पुण्यात रेल्वे विस्तारासाठी प्रयत्न केला.
राजकीय पतन
दिल्लीत २०१० मध्ये झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आणि त्यांना २०११ मध्ये त्यांना अटक झाली. त्यांना तिहार तुरुंगात ठेवण्यात आले. काँग्रेसनेही त्यांना निलंबित केले. त्यानंतर पुण्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा हा नेता मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला. त्याअर्थाने ते शोकांतिक राजकारणी ठरले.
